गोवा 

गोमंतकीय हादरले ; दिवसभरात ७१ कोरोना बळी

पणजी:
राज्यात कोविडची (goa covid) दुसरी लाट खूपच प्रखर बनली आहे. कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच राज्यात आज आजवरचे सर्वाधिक म्हणजे एकूण ७१ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने गोमंतकीय हादरले आहेत. यापूर्वी १ मे रोजी गोव्यात ५४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ५१ रुग्ण दगावले. पण आज तब्बल ७१ रुग्ण आपल्या जीवाला मुकल्यामुळे राज्यात हळहळ आणि भीती व्यक्त होत आहे. राज्यात आज ३४९६ नवे रुग्ण सापडले असून, आजचे ७१ रुग्णांसह १४४३ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या घटनेवर प्रातिक्रिया देताना सांगितले की, ‘सरकारचा मृतांचा आकडा घोषीत करण्यात घोळ चालुच असताना आज गोव्यात ७१ नवे कोविड रुग्ण दगावले. भाजप सरकारची संवेदनशीलता कधीच मेली आहे. आरोग्यमंत्र्यानी भाकीत वर्तवल्याप्रमाणे २०० ते ३०० मृत होण्याच्या दिवसाची सरकार वाट पाहत आहे का? आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे  भाकीत खरे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत कोणतीच कृती न करता वाट पाहत आहेत का?’ असा खोचक प्रश्न देखील  विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारला तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची सवय जडली असुन, त्यामुळेच आज ऑक्सिजन पुरवठ्याची आणिबाणी तयार झाली आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाजमाध्यमांवर संदेश टाकून प्राणवायुची मागणी करीत आहे हे धक्कादायक आहे. एप्रिलमध्ये मृत पावलेल्या कोविड रुग्णाची नोंद आज होते यावरुनच सरकार दरबारी सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसते. अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: