सातारा 

वडूजमध्ये होणार हुतात्मा अभिवादन भव्य कार्यक्रम

​​वडूज​ (अभयकुमार देशमुख) :
भारत देश आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी 75 वे वर्ष साजरे करीत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व आपल्या संसाराची होळी करुन स्वातंत्र्य आंदोलनात झोकून दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी वडूज येथे जेष्ठ नेते पृथ्वीराजचव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रणजित देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी म्हटले आहे की, 9 ऑगस्ट 1942 ला मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर स्वातंत्र्य चळवळीचा व्यापक, अंतिम लढा सुरु झाला. ब्रिटिशांनी महात्मा गांधी, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल व पक्षाच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना अटक केली. परंतू देशातील सामान्य जनतेने हा लढा आपल्या हाती घेऊन देशव्यापी आंदोलन सुरु केले. सातारा जिल्ह्यातील जनतेने या लढ्यात दिलेले योगदान फार मोठे होते. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात या लढ्याची गौरवगाथा म्हणून नोंद आहे. प्रती सरकारच्या रुपाने सातारा जिल्ह्यातील जनतेने इंग्रजांची परकीय राजवट झुगारून स्वातंत्र्याचा पाहिला बिगुल सातारच्या भूमीवर वाजविला होता. या ऐतिहासिक लढ्यातील सुवर्ण अक्षरांनी वर्णन करावी अशी घटना वडूज येथे घडली आहे. 9 सप्टेंबर 1942 ला हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावर इंग्रज अधिकाऱ्याने अमानुषपणे गोळीबार केला. या गोळीबारात खटाव तालुक्यातील नऊ स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. वडूजच्या या ऐतिहासिक मोर्चाच्या आठवणी आजही अंगावर रोमांच उभ्या करतात.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जगविण्यासाठी व त्यांना त्रिवार वंदन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून 9 सप्टेंबर रोजी वडूज येथे भव्य कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये वडगाव ते वडूज पदयात्रा, वडूज येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन, हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, वडूज मोर्चात शाहिद झालेल्या नऊ हुतात्म्यांच्या कुटुंबातील वारसांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती रणजित देशमुख यांनी पत्रकात दिली आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असलेली संयोजन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देशमुख यांनी दिली.

चौकट : 9 सप्टेंबर च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व माण-खटाव विधानसभा मतदार संघातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शनिवार, दि. 28 ऑगस्ट रोजी, दुपारी 12 वाजता हरणाई सह. सूत गिरणी, येळीव येथे आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी श्री. विनायकराव देशमुख व श्री. अभय छाजेड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील निमंत्रित प्रमुख कार्यकर्त्यांनी या बठकीस उपस्थित राहावे असे आवाहन रणजित देशमुख यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: