गोवा 

काँग्रेसने केले माजी मंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

पणजी :

भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणी एफआयआर का दाखल केला गेला नाही असा प्रश्न महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांनी शुक्रवारी पणजी महिला पोलिसांना विचारला. शुक्रवारी त्यांनी महिला पोलिस स्थानकावर जाउन या संदर्भात प्रश्न केले.यावेळी काँग्रेस समर्थकांनी मिलिंद नाईक यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध मतदारसंघातील गटातील महिला यावेळी उपस्थित होत्या. भाजपचे नेते व मुरगावच्या आमदारावर गुन्हा का दाखल झाला नाही, याचे उत्तर महिला पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी देऊ शकले नाहीत.

“ काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी १५  डिसेंबर रोजी मिलिंद नाईक यांच्या विरोधात सेक्स स्कँडल प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता एक महिना उलटून गेला तरी अद्याप पोलिसांनी केस नोंद केलेली नाही.‘ असे बीना नाईक म्हणाल्या.

संकल्प आमोणकर यांचा भाजप सरकारकडून छळ केला जात आहे आणि पीडितेने केलेल्या तक्रारीच्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी क्रायम ब्रांचकडे बोलावले जात आहे असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, पीडितेने बिहार पोलिस ठाण्यात संकल्प आमोणकर विरोधात तक्रार दाखल करताच, ती मुरगाव पोलिस ठाण्यात हस्तांतर करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. “त्याच वेगाने गोवा पोलिसांनी मिलिंद नाईकवर गुन्हा दाखल करायला हवा होता. गोवा पोलिसांनी असे का केले नाही.” असा प्रश्न बिना नाईक यांनी केला.

महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे, मात्र भाजप सरकार मिलिंद नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. “गुन्हेगारांना संरक्षण दिल्यावर गोव्यात महिलांना सुरक्षित कसे वाटेल” असाही प्रश्न बीना नाईक यांनी केला.

अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी बोलताना जर  पोलीस मिलिंद नाईक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात अपयशी ठरल्यास न्यायालयात धाव घेणार असे सांगितले.

“संकल्प आमोणकर यांना मुरगावात चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप त्यांना गुन्हे शाखेत बोलावून त्रास देत आहे.” असे म्हार्दोळकर म्हणाले.

काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. “हे पोलिस अधिकारी भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. ” असे ॲड. म्हार्दोळकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: