लेख

’24 तास अफलातून करमणूक’

– वामन प्रभू 
गोव्यात तुमच्या नेमके काय चाललंय असा प्रश्न फोनवर बोलताना माझ्या मुंबईतील एका मित्राने मला केला आणि  कसं काय जाणे ‘ 24 तास अफलातून करमणूक ‘असे शब्द माझ्या तोंडून निघाले. मी अनायसे सहज म्हणून ते बोलून गेलो होतो. उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ती. मी जे काही बोललो त्यावर नंतर विचार करायला लागलो तर मलाच मी उलट प्रश्न विचारला ‘असे काय मी चुकीचे बोललो ? ‘ . राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या  राजकीय पक्षांतून जो काही धमाका चालला आहे आणि  सर्वसामान्य लोकांचे त्यामुळे ज्या प्रकारे निखळ मनोरंजन होत आहे ते पाहिल्यास त्यास करमणूक म्हटले तर ते वावगे का ठरावे ? निवडणूक प्रक्रिया महिनाभरात संपणार आहे आणि पुढील महिनाभर निदान ही राजकीय करमणूक चालूच राहील अशीच चिन्हे दिसत आहेत. मागील साधारण महिनाभर सगळयाच राजकीय पक्षानी आपले स्वतःचे असे करमणूक चॅनल सुरू केले असून त्यावरून 24 तास लोकांची केवळ करमणूक आणि करमणूकच होईल याची हमी प्रत्येक पक्ष सध्या  देत आहे आणि रोज काही ना काही करमणुकीचे प्रकार कोणताही खंड न पडता वितरित केले जात आहेत. यालाच जर कोणी राजकारण म्हणत असतील तर म्हणोत बापडे .

 

आता या चॅनल्समध्ये झाडून लहान मोठ्या सगळ्याच राजकीय पक्षांचा कमी अधिक प्रमाणात  समावेश आहे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. काल परवा  स्थापन झालेल्या गोवा रेव्होल्युशनरी पार्टीपासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षापर्यंत सगळ्यानीच पूर्ण 24 तासांचे करमणूक चॅनल सुरू केल्याने निवडणूक काळात मनोरंजनासाठी आणखी कोणतेही राष्ट्रीय चॅनल पाहण्याची गरज गोमंतकियाना राहिलेली नाही असेच मागील 15-20 दिवसांत या वाहिन्यानी जे धमाकेदार भरगच्च करमणूक कार्यक्रम वितरित केले त्याआधारे म्हणता येईल. यातील काही एपिसोडनी तर कपिल शर्माच्या कोमेडी शोलाही मागे टाकले.

निव्वळ मनोरंजन हाच तरी सध्या बहुतेक राजकीय पक्षांच्या चॅनलांचा मोटो दिसतो. यात अर्थातच सोनिया-राहुल गांधी यांचा अखिल भारतीय (?)  काँग्रेसचा ‘ सोनीया’  , राजकारणातील पीतामह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘ टिकटिक ‘  , केजरीवालांचा मालकी हक्क असलेला ‘आमआदमी ‘  आदि चॅनल्सना सध्या चांगला टीआरपी मिळत आहे तर त्यामागोमाग तृणमूल काँग्रेसची ममता टीव्ही , भारतीय जनता पार्टीची ‘ कलर वाहिनी ‘  आणि  आपले स्थानिक म. गो. , गोवा फाॅरवर्ड , गोवा रेव्होल्युशनरी पार्टी , सुराज पार्टी आदिंच्या छोट्या छोट्या  चॅनलांचा क्रमांक लागतो.

विधानसभा निवडणुकीच्याआधी जनतेचे मनोरंजन करण्यात ज्या नेत्यांची भूमिका ब-यापैकी वठली  त्यात काँग्रेसच्या सोनिया टीव्हीचे लुईझिन फालेरो , रेजिनाल्ड लाॅरेन्स , रवि नाईक, प्रतापसिंग राणे. याच्यासह दुस-या फळीतील आग्नेल फर्नांडिस , जोसेफ सिकेरा अशा अनेक नेत्यांची नांवे घेता येतील तर भाजपच्या वाहिनीसाठी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो हे घुसमटलेल्या नायकाच्या भूमिकेत लोकांच्या खूपच पसंतीस आले. त्यानंतर कार्लुस आल्मेदा, एलिना सालढाणा आणि प्रवीण झांटये आदि भाजप कलाकारांची नावे घेता येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ टिकटिक ‘ वर प्रथम आपले चर्चिल आलेमाव फारच गाजले आणि नंतर ममता टीव्ही वरही त्यानी लुईझिनच्या साथीने  आपल्या कारनाम्यानी लोकानाना चांगलेच रिझवले. लुईझिनला प्रथम लवू मामलेदार यानीही चागली साथ दिली परंतु ममतादिदीनी सुदिन ढवळीकर आणि कंपनीबरोबर भागीदारी केल्यानंतर लवूसह दोन तीन कलाकार पुन्हा ‘सोनिया ‘ चॅनलवर दिसू लागले. भाजपच्या कलर चॅनलवर विशेष प्रभाव टाकू न शकणारे कार्लुस आल्मेदा काँग्रेसमध्ये,  एलिना  सालढाणा  तृणमूलमध्ये तर प्रवीण झांटयेनी म. गो. च्या ‘दीपक ‘ वाहिनीची वाट धरली. गोवा फाॅरवर्डच्या ‘टिम टिम ‘  चॅनलमधून जयेश साळगावकरसारख्या प्रतिभावंत आणि गुणी कलाकाराने थेट भाजपसारख्या मोठ्या चॅनल्समध्ये एंट्री घेत फाॅरवर्डचे मालक विजय सरदेसाई यांना धक्का दिला.

रोहन खंवटे यानी मागील दहा वर्षे एकट्याने पर्वरीचा राजकीय रंगमंच चांगलाच गाजवला होता त्यांनीही अखेर भाजप चॅनलने दिलेली ऑफर स्वीकारली. आता ते नव्या भूमिकेत त्या चॅनलवर दिसू लागले आहेत. रोहन खंवटेच्या पावलावर पाऊल ठेवून प्रियोळचे प्रति संभाजीराजे गोविंद गावडे यानीही भाजप चॅनलमध्ये प्रवेश मिळवला आणि तेथून आता ते एका नव्या भूमिकेत जनतेसमोर येणार आहेत. सांगे येथील प्रसिद्ध कलाकार प्रसाद गावकर यानी तर लोकाना रिझवताना ईकडून तिकडे घेतलेल्या ऊड्यांवर तर सगळेच जाम खूष आहेत. गोवा फाॅरवर्ड, काँग्रेस, तृणमूल आणि  परत काँग्रेस असा केवळ तीन महिन्यातील त्यांची कलागिरी ही , करमणुकीचा निकष लावला तर या काळातील सर्वोत्तम अशा तीन सादरीकरणात मोडावी लागेल. म.गो. एंटरटेनमेंट चॅनलचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर आणि बंधू दीपक यांनी करमणुकीच्या जगतात आपले स्वतःचे असे नाव केले आहे. भाजप आणि  काँग्रेसच्या चॅनलवर आलटून पालटून दिसणा-या या कलाकारांनी यावेळी गोव्याची हद्द ओलांडून कोलकत्ता गाठले आणि  तृणमूलच्या ममता दिदीनी त्याना मोठ्या मोबदल्यात आपल्या चॅनलवर घेतल्याने त्यांचेही कार्यक्रम आज जोरात चालू आहेत . त्यांचे काही प्रतिभावान आणि गुणी कलाकारानी भाजप चॅनलमध्ये स्थलांतर केल्याने  आपल्या वाहिनीचे काय होईल यांची चिंता त्याना आता लागून राहिली आहे.

प्रातिनिधिक चित्र

भाजपच्या कलर वाहिनीवर सुरू झालेले आणि काँग्रेसच्या चॅनलवरून प्रसारित झालेले मायकल लोबो यांचे तुफान ईनोदी नाटक मात्र सध्या  बरेच गाजत आहे आणि पुढील बरेच दिवसही त्याची चर्चा चालू राहू शकते . पत्नीप्रेमासाठी पती कोणता सर्वोच्च त्याग करू शकतो हाच या नाटकाचा विषय आहे आणि  स्वतः मायकल या नाटकाचे निर्माते , दिग्दर्शक , अभिनेते अशा सगळ्याच बाजू सांभाळतात. स्वतः  डिलायला लोबो या नायिकेच्या भूमिकेत मायकलला साथ करतात तर  आग्नेल फर्नांडिस, जोसेफ सिकेरा हे खलनायकांच्या भूमिकेत लोकांची दाद मिळवताना  दिसतात. काँग्रेसच्या सोनिया टीव्हीवर सध्या या नाटकाचे एक एक अंक क्रमाने सादर होत असून दिगंबर कामत ( माईन माफिया ) विजय सरदेसाई ( फाॅर्मेलिन माफिया) , गिरीश चोडणकर  यांचीही महत्वाची भूमिका  या नाटकात आहे असे आग्नेल फर्नांडिस , जोसेफ सिकेरा सांगतात. भाजप चॅनलच्या निर्मात्याना मात्र मायकलचा घेतलेली एक्झिट आपल्या चॅनलसाठी फायदेशीर ठरेल असे वाटते आणि  आपल्या काही यशस्वी कलाकारांसह  त्यांनी आपले करमणुकीचे  कार्यक्रम पुढे चालूच ठेवले आहेत.

राष्ट्रवादी चॅनलचे सर्वेसर्वा शरद पवार याना तशी विनोदी भूमिका जमत नाही पण तेही निवडणुकीतील राजकीय करमणुकीच्या कार्यक्रमात मागे राहिलेले  दिसत नाहीत. गोव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, म.गो., गोवा फाॅरवर्ड, शिवसेना अशी महाआघाडी स्थापन करण्याकरिता  चर्चा करत असल्याचे सांगत त्यानी एक मोठा विनोदी कार्यक्रम सादर केला आहे. आता ज्या काँग्रेसने पवाराना हाकलले होते त्या काँग्रेसशी  आणि गोव्यातील राष्ट्वादीचा एकमेव आमदार चर्चिल आलेमाव पूर्ण विधीमंडळ पक्षासह ज्यानी पळवला त्या तृणमूलशीच शरद पवार यानी चर्चा करणार असल्याचे सांगून जो जोरदार  धमाका ऊडवला त्याची तर सांगता सोय नाही. विधानसभा सचिवालयात मागील काही दिवस आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी लागलेल्या आमदारांच्या रांगाही प्रत्येक चॅनलवर लोकानी पाहिल्या. सभापतीनी पहिल्या दोघा तिघा आमदारांचे स्वतः होऊन  स्वागत केलेले दिसले मात्र नंतर होणारी गर्दी पाहून त्यानी सचीव नम्रता ऊलमनकडेच ती जबाबदारी सोपवली. आठ नऊ आमदारांची राजीनामापत्रे स्वीकारणा-या पहिल्या विधीमंडळ सचीव हा विक्रमही नम्रताच्या नावे आता नोंद झाल्याचीही माहिती मिळते.

काल परवा स्थापन झालेल्या गोवा रेव्होल्युशनरी पार्टीने गोवा सुराज पार्टीला निवडणूक चिन्हावरून कसे गंडवले यावर आधारित नवा एपिसोडही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रत्येक पक्षाचे चॅनल आपापल्या क्षमतेने सध्या लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानापर्य॔त निदान ही राजकीय  करमणूक चालूच राहणार आहे हे येथे वेगळे सांगायची गरज नाही.

(पूर्वप्रकाशित)
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: