गोवा 

‘केजरीवाल मॉडेल हेच गोव्याला पुढे नेऊ शकते’

पणजी :
केजरीवाल मॉडेल हेच गोव्याला पुढे नेऊ शकते, असे आपचे नेते महादेव नाईक यांनी आज सांगितले. माध्यमांना संबोधित करताना नाईक म्हणाले की, दिल्लीचे वीज मंत्री सत्येंद्र जैन आणि निलेश काब्राल यांच्यातील वादविवाद तसेच ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याबाबतची पक्षाची घोषणा आणि शून्य वीज कपातीमुळे सत्ताधारी भाजप पक्ष आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. दिल्ली भेटीचा अनुभव सांगताना नाईक म्हणाले की, दिल्ली शासनचे मॉडेल म्हणजेच केजरीवाल यांचे शिक्षण मॉडेल आणि आरोग्य मॉडेल गोव्यातही उत्तम प्रशासन आणू शकते.
त्यांनी सांगितले की, गोवेकर आपच्या कार्याकडे आकर्षित झाले आहेत आणि म्हणूनच पक्षाला पाठिंबा देत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणूक २०२२साठी आम आदमी पार्टी उत्सुक आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपने केलेल्या कामाचे कौतुक करताना आपचे नेते महादेव नाईक म्हणाले की, भाजप झोपी गेले असताना कोरोनाच्या काळात फक्त आप गोवेकरांच्या पाठीशी उभे राहिले. दुसऱ्या लाटे दरम्यान गावोगावी लोकांची ऑक्सिजन पातळी तपासण्यापासून त्यांच्या ऑक्सिमित्र मोहिमेद्वारे घरोघरी मोफत रेशन पोहचविण्यासाठी आपने केलेल्या कामांची त्यांनी प्रशंसा केली.

“केवळ आम आदमी पक्षच गोव्यातील तरुणांच्या समस्या सोडवू शकतो आणि म्हणून पक्षाला समर्थन देण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी मी येथे आहे,” असे आप नेते महादेव नाईक म्हणाले.

“आपच्या स्वयंसेवकांनी दुसऱ्या लाटे दरम्यान दिवस -रात्र काम केले ते जनतेने पाहण्याची गरज आहे,असे नाईक म्हणाले.

नाईक यांनी नोकऱ्या आणि गोव्यातील वाढत्या बेरोजगारीसाठी भाजपवर वार केला. गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये १.५ लाख नोंदणी  झाल्याचे सांगताना, सावंत सरकार नोकऱ्या देण्याचा विचार करत नाही, असे ते म्हणाले.

“आमच्या तरुणांचा कोण विचार करणार? सरकारने बेरोजगारीचा हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी गोवेकरांनी केली होती. पण त्याऐवजी भाजप सरकार त्यांच्या राजकीय नौटंकीमध्ये व्यस्त आहे आणि त्यांच्या १०,००० नोकऱ्या केवळ जाहिराती आहेत, ज्या अद्याप आलेल्या नाहीत. व्होट बँकेच्या हेतूने आजच्या तरुणांची दिशाभूल करण्यासाठी भाजप काम करीत आहे, “असे नाईक पुढे म्हणाले. भाजप सरकारच्या युक्तीला बळी पडू नये असा इशारा त्यांनी तरुणांना दिला.

बहुजन समाजासाठी आरक्षण वाढवण्यासाठी नाईक यांनी त्यांच्या समाजकल्याण मंत्रीपदाच्या कार्यकाळात काम केले आहे. हे आरक्षण त्यांनी १९.५% वरून २७% केले होते आणि जवळपास ३.५८ लाख लोकांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण योजनांचा लाभ झाला होता.

फक्त शिरोडा आणि फोंडाच नाही तर संपूर्ण गोव्यामध्ये आपचा विस्तार वाढत आहे. पक्षाप्रती गोवेकरांचा प्रतिसाद खरोखरच जबरदस्त आहे. आणि महादेव नाईक यांच्या समावेशामुळे आणखी बरेच लोक पक्षाला पाठिंबा देतील”, असे आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे म्हणाले.

महादेव नाईक यांच्या प्रवेशामुळे फोंड्यातील पक्षाचा पाया मजबूत होईल. राजकारणातील त्यांचा ३५ वर्षांचा अनुभव आम्हाला आणि पक्षाला बळकट करेल,” असे आप गोवाचे उपाध्यक्ष सुरेल तिळवे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: