देश-विदेश

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे. गेल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.

“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.

दुसरीकडे, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: