गोवा 

‘युवक बदलवू शकतात सरकारचा चेहरा’

पणजीः

गोव्यातील भाजपने लोकशाहीचा खून करून मागील दाराने सत्ता मिळविली आहे. म्हणून आता युवकांवर लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याची आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सरकारचा चेहरा बदलण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा प्रभारी अखिलेश यादव यांनी येथे केले.

जुने गोवे येथील पंचायत सभागृहात झालेल्या गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या कुंभारजुवे गट समितीच्या बैठकीत यादव बोलत होते. कोविड साथ काळातील नियमांचे पालन करत कुंभारजुवे मतदारसंघातील युवकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

यावेळी राज्याचे अध्यक्ष वरद मार्दोळकर, कुंभारजुवे गटाध्यक्ष विशाल वळवईकर, हिमांशू तिवरेकर, सचिव ग्लेन काब्राल, सांत आंद्रेचे अध्यक्ष साईश आरोसकर आदी उपस्थित होते.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, लोकांना दिलासा देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी गोव्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. सध्याच्या भाजप सरकारने लोकांची मुस्कटदाबी चालवलेली असून, नको असलेले प्रकल्प जनतेच्या इच्छेविरूध्द लादले जात आहेत. कोविड काळात निरपराध अशा तीन हजार लोकांच्या मृत्यूला हे सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोविड काळात गरीब गरजू पेशंटना आॕक्सिजन सिलेंडर, अन्न तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याबद्दल यादव यांनी कोविड योध्दे म्हणून वरद मार्दोळकर, जनार्दन भंडारी, साईश आरोसकर, हिमांशू तिवरेकर, ग्लेन काब्राल यांच्यासह इतर युवा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
विशाल वळवईकर व वरद मार्दोळकर यांनी यावेळी भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचत कार्यकर्त्यांना संबोधित केले.

या बैठकीला कुंभारजुवे महिला गट काँग्रेस अध्यक्ष मारिया ख्रिस्टिना वारेला, डिजिटल सदस्यत्व समन्वयक लाॕरेन्स कुटो, ख्रिस्तोफर मिनेझिस, मानूएला गोम्स, सुहेल हळर्णकर, प्रशांत वळवईकर, राज शर्मा आदी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन सुकूरो मिनेझिस यांनी केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: