लेख

सुसंस्कृत, कर्तृत्ववान लोकनेता !

– डॉ.श्रीमंत कोकाटे

राजकारण वाईट नाही,सुसंस्कृत,कर्तृत्ववान लोक राजकारणात आले पाहिजेत. विद्यमान महाराष्ट्राच्या राजकारणातील आदर्श,सुसंस्कृत, कर्तृत्ववान, लोकप्रिय, दीपस्तंभ, आधारस्तंभ भाई गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले.ते 11 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य अर्थात आमदार होते.

आबासाहेब हे अत्यंत संयमी, विवेकी,मृदू स्वभावाचे होते.ते पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी मतदार संघात कधीही दुजाभाव केला नाही.आपल्या राजकीय विरोधकांशी ते कधीही आकसाने, द्वेषाने,असूयेने वागले नाहीत.त्यांनी कधीही भेदभाव केला नाही.सांगोला हा धनगर-मराठा प्रभुत्व असणारा तालुका परंतु आबासाहेबांनी जातीय ध्रुवीकरणाला थारा दिला नाही.प्रत्येकाचे काम करणे,सर्वांना चांगल्या कामासाठी मदत करणे हा संसदीय लोकशाहीचा संकेत त्यांनी कायम पाळला.

आबासाहेब आजन्म शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पक्षनिष्ठा त्यांनी कधीही सोडली नाही.एका महिन्यात तीन चार पक्ष बदलणारांनी गणपतराव देशमुख यांच्या जीवनचरित्राचे पारायण करावे,इतके ते विचारांशी,जनतेशी आणि पक्षाशी एकनिष्ठ होते.त्यांना एका दिवंगत बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री करण्याच्या अटीवर पक्षांतर करण्याचा आग्रह केला होता.परंतु त्यांनी तो आग्रह नम्रपणे नाकारला.

आबासाहेब जेवढे कर्तव्यकठोर होते तितकेच ते विनयशील होते.अतीव ध्येयवादातून येणारा हटवाद किंवा अतीव कर्तृत्वातुन येणारा अहंकार त्यांच्याकडे नव्हता. सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यात त्यांनी कृष्णा नदीचे पाणी आणले.सांगोल्याची डाळिंब युरोपच्या बाजारपेठेत पाठवली. सांगोल्याची सूतगिरणी सुप्रसिद्ध उभारली. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.

आबासाहेब हे अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्त्व होते.अत्यंत साधी राहणी पण भूमिका ठाम असे.मी त्यांना अनेक वेळा भेटलो.त्यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त मी प्रमुख वक्ता होतो. बहुतेक वेळा घरचाच जेवणाचा डबा यासायचा त्यात भाजी-भाकरी सोबत असायची.आजही तेच घर,तीच खुर्ची,तोच,टेबल कायम आहे.त्यांनी अनेक वेळा रेल्वे,एसटीने प्रवास केला. ते 11 वेळा आमदार होते,पण आमदारकीचा कधीही बडेजाव, घमेंड बाळगली नाही.

जनतेची ईच्छा असताना देखील 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी नम्रपणे नाकारली.सर्वानुमते उमेदवार द्यावा, हा त्यांचा आग्रह होता,तर तालुक्यातील जनतेने तुम्ही किंवा कुटुंबातीलच उमेदवार देण्याचा आग्रह धरला.आबासाहेब हे तत्त्वनिष्ठ, सुसंस्कृत, कर्तृत्ववान, प्रगतिशील नेते होते.त्यांना दीर्घायुष्य लाभले. त्यांचे आज दुःखद निधन झाले.महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा काळाआड गेला,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: