मुंबई 

‘महाराष्ट्राचा रुग्णदूत’ मंगेश चिवटे

–   रणवीर राजपूत
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करणाऱ्या मंगेश चिवटे यांचा आज जन्मदिवस. राज्यभरातील रुग्णांना सुयोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या वैद्यकीय मदत कक्षाच्या या युवा संकल्पकाबद्दल त्यांच्या सहकाऱ्याने व्यक्त केलेली हि भावना… 

समाजातील गोरगरीब निराधार,निर्धन अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य हा मूलभूत प्रश्न सोडविणे अतिशय अवघड जाते.परिणामस्वरूप अनेकांना आपले नाहक जीव  गमवावे लागतात,ही वस्तुस्थिती आहे.कारण त्यांच्याकडे एवढा पैसा नसतो,ज्यातून ते आपल्या गंभीर आजारांवर महागड्या शस्त्रक्रिया करू शकतील.यावर ठोस तोडगा काढून निर्धन लोकांचे जीव वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे नगरविकास तथा ठाण्याचे पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती झाली.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी सदर कक्षासाठी आपल्या पसंतीची एक सक्षम टीम उभी केली.त्या क्षणापासून मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्ण सेवेची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ झाली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद उराशी बाळगून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा अश्वमेघ चिवटे यांनी हाती घेतला.आईवडिलांची शिकवण होती की,जीवनात गोरगरीब, निराधार लोकांना मायेचा ओलावा देऊन भगवंताने दिलेले मानवी जीवन सार्थक करावे.तोच जीवन मंत्र आत्मसात करून चिवटे सरांनी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा केल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.

आज राज्यातील हजारो गोरगरीब लोकांना वैद्यकीय कारणासाठी अर्थसहाय्य मिळत आहे,त्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मुळ संकल्पना मंगेश चिवटे यांचीच आहे.माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्यात युती सरकार स्थापन झाले. रुग्णसेवेची आवड असलेले पूर्वाश्रमीचे पत्रकार मंगेश चिवटेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील रुग्णांच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ची संकल्पना मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. चिवटेसरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अल्पावधीतच यश येऊन १७ मार्च २०१५ पासून या योजनेतून पात्र व गरजू रुग्णांना निधी देण्यास प्रारंभ झाला.इतकेच नव्हे तर,चिवटेंच्या शिफारशीने या कक्षाच्या प्रमुखपदी ओमप्रकाश शेटे यांची नेमणूकही झाली. खरं तर,सरकारदरबारी चिवटेंच्या शब्दाला एवढा मान असणे,ही त्यांच्या रुग्णसेवेची खरी पावती आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.उल्लेखनीय बाब म्हणजे आजवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सुमारे ५३ हजार हून अधिक निराधार रुग्णांवर शस्त्रक्रिया अन् वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.वास्तवात चिवटे यांच्या प्रयत्नातून उभारले गेलेले हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरली असून, त्यातून अनेक रुग्णांमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.याचे सर्वस्वी श्रेय चिवटे यांना जाते.
shivsena
चिवटे यांच्या वाढदिवशी त्यांचा अल्प परिचय करून घेणे क्रमप्राप्तच ठरते. चिवटे यांचा जन्म १५ जून १९८८ रोजी स्वातंत्र्य सैनिक साथी मनोहरपंत चिवटे(आजोबा) यांच्या देशप्रेमी घराण्यात झाला.त्यांची करमाळाचे(जि.सोलापूर) पहिले नगराध्यक्ष म्हणून  ओळख आहे.चिवटे यांच्या पिताश्रींचे नाव नरसिंह मनोहरपंत चिवटे तर,मातोश्रींचे मंदाकिनी नरसिंह चिवटे.तर पत्नीचे नाव शिल्पा मंगेश चिवटे.मंगेश हे शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले गेले.त्यांचे शालेय शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात,तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी.कॉलेज मध्ये झाले.त्यांनी मराठी या विषयात एम.ए.करून त्यानंतर बी.एड.उत्तीर्ण केलं.याशिवाय चिवटे यांनी पत्रकारिता विषयात पदवी संपादन केली.एवढे शिक्षण घेऊन ते थांबले नाहीत.त्यांनी मुंबई येथील के.सी.कॉलेजमध्ये लॉ फॅकल्टीची दोन वर्षे पूर्ण करून ते आता शेवटच्या वर्षाला आहेत. त्यांना गड किल्ल्यांचा प्रवास करून त्या विषयात संशोधन करण्याचा छंद आहे.त्यांनी आतापर्यंत ५० गडकिल्ल्यांना भेटी दिल्या असून,पन्हाळगड ते पावनखिंड हा प्रवास गेल्या १० वर्षांपासून सातत्याने करत आहेत. खरं तर,कक्ष प्रमुख चिवटे हे गाढे शिवभक्त असून,शिवकालिन इतिहासाचे सच्चे अभ्यासक आहेत.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या यशस्वी घोडदौडनंतर याच धर्तीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना मंगेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. शिंदे याना सदर संकल्पना मनस्वी पटल्याने त्यांनी त्यास लगेच मंजुरी दिली.त्याची परिणती म्हणजे १७ नोव्हेंबर २०१७ रोजी कोपरी, ठाणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना झाली.अन् राज्यातल्या गोरगरीब लोकांसाठी आरोग्याची कवाडं उघडलीत. सदर कक्षाची रूपरेषा आवडल्याने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार १७ नोव्हेंबर २०१८ रोजी दादर येथील शिवसेना भवनमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा शुभारंभ झाला. याचं श्रेय चिवटेंच्या उत्तम रुग्णसेवेला जाते. मंगेश यांच्या रुग्णसेवेतील नेत्रदीपक कामगिरीने प्रभावित होऊन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगेश चिवटे यांचा गौरवपूर्ण सत्कार केला. खरं तर हीच त्यांच्या रुग्णसेवेची फलश्रुती होय.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात काम करण्याआधी मंगेश चिवटे हे स्टार माझा, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, साम टिव्ही,आयबीएन लोकमत अशा ख्यातनाम दूरचित्र वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले अन् त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर चिवटेनी रुग्णसेवा करण्याचा संकल्प केला.दरम्यान पत्रकारिता करत असताना विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते शरद पवार,नितीन गडकरी,गोपीनाथ मुंडे,विलासराव देशमुख,अशोक चव्हाण,आर.आर.पाटील यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या, हे वाखाणण्याजोगे आहे. याशिवाय २६/११ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अन् त्याप्रसंगी तत्कालिन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे सीएसटी स्टेशनवर झालेलं आगमन या थरांरक प्रसंगांची दृश्ये चिवटे़ंनी टिपली होती,हे त्यांच्या साहसीवृत्तीचे प्रतिक आहे.आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांना भारतरत्न मिळावा,त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारावे आणि त्यांचा जयंती दिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा करावा,यासंदर्भात आयबीएन  लोकमत चॅनलवर प्रसारित केलेल्या त्यांच्या बातमीवर थेट राज्य विधानसभेत चर्चा झाली.अशा साहसी अन् महत्वपूर्ण कव्हरेज करणाऱ्या चिवटेंचे सर्वच क्षेत्रांतून कौतुक झाले. आजही त्यांच्या रुग्ण सेवेतील प्रशंसनीय कामगिरीची माहिती मिळावी यासाठी मुलाखती घेण्यास मुंबई व ठाणे येथील मराठी,हिंदी चॅनलचे प्रतिनिधी हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात येत असतात,ही त्यांच्या कामगिरीची खरी पावती आहे.त्यांच्या एकूण रुग्णसेवेच्या कामांची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिफारसीने त्यांची राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

shivsenaरुग्णसेवा हेच जीवन ध्येय हा निर्धार करून चिवटे यांनी एकनाथ शिंदे अन् खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकही निर्धन व्यक्ती महागड्या वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये,यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न वैद्यकीय क्षेत्रातील  तरुण-तरुणींना पथदर्शक ठरतील, हे निश्चित. महत्वाचे म्हणजे चिवटेना पावलोपावली मदत करण्यासाठी त्यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची सक्षम व कृतिशील टीम रात्रंदिवस मेहनत घेत असते,हे कौतुकास्पद आहे.टीम स्पिरीटमुळे ह्या मदत कक्षाच्या रुग्णसेवेची कीर्ती राज्यासह बेळगावपर्यंत पोहोचली आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कोरोनापासून बेळगाव व आसपासच्या सीमाभागात राहणाऱ्या बांधवांचा बचाव व्हावा,याउद्देशाने दहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर चिवटेनी स्वतः बेळगावला जावून तेथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. याबद्दल सीमाभागातील मराठी बांधवांनी एकनाथ शिंदे आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला धन्यवाद दिले.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बेळगाव येथील एका पंधरा दिवसांच्या नवजात बालकाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी  मदत कक्षाच्या मदतीने शिवसेनेच्या रुणवाहिकेतून त्यास रातोरात मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आणून त्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.त्यामुळे त्या बाळाला खऱ्या अर्थाने नवजीवन प्राप्त झाले.सदर बालकाच्या पालकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शतशः आभार मानले. वास्तवात मदत कक्षाच्या रुग्णसेवेची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.मागच्या काळात बेळगाव येथील मराठी बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला होता.त्याच्या निषेधार्थ तेथे राज्यातून रवाना झालेल्या शिवसेनेच्या पथकात चिवटे देखील सामील झाले होते, ही स्तुत्य बाब आहे. अन्यायाची चीड अन् न्यायाची चाड असलेल्या चिवटे यांना मराठी भाषेसह मराठी भूमिपुत्रांचा देखील अभिमान आहे, याचा प्रत्यय येतो.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या नेत्यांना अन् खुद्द शिवसैनिकांना शिकवण आहे की, जातपात,धर्म,पंत याच्या पलीकडे जाऊन जनसेवा करावी.सामाजिक कार्य करताना जातपात-धर्म आड येता कामा नये.या धर्तीवरच शिवसेनाप्रमुखांच्या नावाने स्थापित झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्था कोरोना महामारीच्या काळात तनमन धनाने सर्वधर्मसमभाव राखून रुग्ण सेवा करत आहेत,याचा आम्हा महाराष्ट्रीय लोकांना सार्थ अभिमान आहे.त्यामुळे केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर,आख्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे  अन् मंगेश चिवटे यांचे नाव रुग्णसेवेसंदर्भात गौरवाने घेतले जात आहे,ही ठाणे जिल्ह्यातील लोकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

खरं तर, मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाचे खरे शिल्पकार आहेत.या मदत कक्षाच्या अविरत परिश्रमातून  हजारो गोरगरीब कुटुंबातील लहान-मोठ्या सदस्यांचे जीव वाचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून तर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून  कोरोनाकाळात फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांची म्हणजेच डॉक्टर्स, नर्सेस,पोलीस,पत्रकार,सफाई कामगार यांची मोफत अँटीजन टेस्ट करून घेतली.कोरोना काळात लॉकडाऊनमुळे छोट्या अन् मध्यम उद्योगातील लोकांचे अतोनात हाल होऊन त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे दुरापास्त झाले होते.अशा बिकट परिस्थितीत मदतीचा हात देत रिक्षा चालक,घरकाम करणाऱ्या महिला,डबेवाले,तृतीयपंथी सदस्यांना अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.यास्तव त्यांनी शिवसेनेचे आभार मानले.   याशिवाय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अपंगांना लॉकडाऊन काळात उपासमारीची पाळी येऊ नये,यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. राज कारणातून समाजकारण करण्याचे बाळकडू बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिल्याने डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ह्या संस्था मोठ्या हिमतीने कोरोनाशी लढा देऊन लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, यालाच खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणतात.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या अथक प्रयत्नांतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ गेल्या साडे तीन वर्षांपासून मिळवून देत आहेत,ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.हे कक्ष समर्थपणे कक्ष प्रमुख म्हणून आपली भूमिका पार पाडत असते.ज्या योजनांचा लाभ सदर मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मिळत आला आहे,त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सहाय्यता निधी,श्री सिद्धिविनायक ट्रस्ट,लालबागचा राजा ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, कारो ट्रस्ट,चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन,जय गणेश ट्रस्ट यांच्यामार्फत हे कक्ष संबंधित गरजू रुग्णांना निधी उपलब्ध करुन देत असते.इतकेच नव्हे तर,स्व.आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या जय अंबे मा ट्रस्ट आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे थेट पात्र रुग्णांसाठी निधी उपलब्ध करून देतात.त्यामुळे त्यांच्यात जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण होत असते.वरील सर्व योजनांचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचविण्यासाठी चिवटे हे कक्षाचे प्रमुख या नात्याने निरंतर प्रयत्नशील असतात, जेणेकरून निराधार लोकांना आपली महागडी ऑपरेशन्स मोफत वा अल्प दरात करणे शक्य व्हावेत.चिवटे यांचे एकच लक्ष्य आहे की,राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रुग्ण सेवेचे कार्य पोहोचावे, म्हणजे शहरी व ग्रामीण भागातील गरजू लोकांनी वरील ट्रस्ट च्या माध्यमातून आपली मेजर ऑपरेशन्स करून घ्यावीत व आपले आरोग्य सर्वदृष्टीने सुदृढ ठेवावे,या उद्देशाने चिवटे हे आपल्या पदाचा लाभ गोरगरीब,निर्धन लोकांना करून देत आहेत. खरं तर, यापेक्षा मोठं समाधानच नाही,असे त्यांचे प्रांजळ मत आहे

मंगेश चिवटे यांचे कठोर परिश्रम,चिकाटी व रुग्ण सेवेची दुर्दम्य इच्छा व गोरगरीब लोकांविषयी  कणव  असल्यामुळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत सुमारे १५०००हून अधिक शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत.त्यात कॅन्सर,ब्रेन ट्युमर,किडनी,लिव्हर इन् बोनम्यारो ट्रान्सप्लांट,बायपास,मोतीबिंदू, एजिओप्लास्टी,कोकलीयर इमप्लांट,लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रांचे ऑपरेशन आदी तत्सम शस्त्र क्रियांचा समावेश आहे. सुखरूपपणे बरे झालेले हेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदाने घरी परतून सर्व मान्यवरांना दुवा देत लाख लाख धन्यवाद दिले.खरं तर,हीच गोरगरीब रुग्णांची दुवा अन् पावलोपावली दिलेले आशिर्वाद या त्रय मान्यवरांना आडवे आल्याने त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्याचे दृष्टोत्पत्तीस आले आहे.

shivsenaशिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या टीममध्ये कला,वाणिज्य व विज्ञान शाखेचे पदवीधर असून, त्यांना माहिती तंत्रज्ञान, मराठी,इंग्रजी,हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान आहे.त्यांच्यातील सभ्यता,संभाषणातील गोडवा,आत्मविश्वास, चिकाटी,कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा अन् रुग्णसेवेची आवड वाखाणण्याजोगी आहे.सदर मदत कक्षाला लोकाभिमुख करण्यात त्यांची भूमिका प्रभावी ठरली आहे,असे जनमानसाचे मत आहे.या सर्वदृष्टीने सक्षम असलेल्या टीममध्ये माऊली धुळगंडे,स्वरूप काकडे,राम राऊत,अरविंद मांडवकर,प्रसाद सूर्यराव,रविंद्र ननावरे,राहुल भालेराव,सागर झाडे,हृषिकेश देशमुख,विलास काळण,रोहित वायभासे,नितीन हिलाळ,दिपाली चव्हाण,गोविंद कुमार, शिवाकांत निषाद ही युवा शक्ती पूर्णक्षमतेने रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे.आज रुग्णसेवेचे लोण 20 जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे,याचे मनस्वी आनंद व समाधान आहे,असे सांगून ना.एकनाथ शिंदे यांनी  विश्वास व्यक्त केला आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रुग्णसेवेचा विस्तार लवकरच आख्या महाराष्ट्रात पसरून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत वा अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

आजवर मदत कक्षाच्या माध्यमातून ११०हून अधिक महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्यात ४ लाख ५० हजारहून जास्त नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय ठाणे शहरात रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबीर आयोजित करून रिक्षा चालकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले.या शिबिरास रिक्षाचालकांनी व्यापक प्रतिसाद देत चिवटे सरांना लाख लाख धन्यवाद दिले.या शिबिरात दरम्यान चिवटेंना कोरोनाची लागण झाली होती.तथापि त्याला भिक न घालता,त्यावर सहजपणे मात केली. या मदत कक्षाने राज्याची सिमा लांघून केरळ राज्यात महापुराने पिडित झालेल्या लोकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करून तेथे सुमारे ७५ हजार लोकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले,ही प्रशंसनीय बाब आहे.या ठिकाणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अन् मंगेश चिवटे उपस्थित होते. यास्तव महाराष्ट्र सरकारचे अन् मान्यवरांचे केरळच्या नागरिकांनी शतश: आभार मानले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आता आपल्या कामांचा  विस्तार करण्याचा मानस  केला आहे.रुग्णसेवेसह अन्य सामाजिक सेवा करण्यात रस दाखविला आहे.खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात नुकत्याच उद्भवलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे  कल्याण,अंबरनाथ, मलंगगड आदी ठिकाणी घरांची मोठी पडझड होऊन छताचे पत्रे उडाले.या पार्श्वभूमीवर मदत कक्षाच्यावतीने नुकसान ग्रस्तांना पत्रे वाटून सुखद दिलासा दिला.तेथील स्थानिकांनी खासदार अन् मदत कक्षाचे मनस्वी आभार मानले. इतकेच नव्हे तर,शिवराज्याभिषेक दिनी चिवटेंच्या नेतृत्वाखाली  मदत कक्षाची टीमने रायगड किल्ल्यावर प्रस्थान करून तेथील गाईड्स आणि सुरक्षा रक्षकांना गणवेश,जॅकेट्स,बुट, ट्रेकिंग,खुर्च्या आदी महत्वाचे साहित्याचे खासदार संभाजी राजे अन् शहाजी राजे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.याबद्दल महाराजांनी चिवटे आणि टीममधील सदस्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांचा ऑक्सिजनअभावी नाहक  बळी जाऊ नये,या उद्देशाने मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे धाराशिव,करमाळा तसेच राज्यातील अन्य ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला.याशिवाय शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी क्षेत्रातील रुग्णांसाठी अल्प दरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली.याबद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त करून दोन्ही सेवाभावी संस्थांना धन्यवाद दिले.

(लेखक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाण्याच्या  प्रसिध्दी विभागामध्ये कार्यरत आहेत.)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: