Homeलेख

मानसिक आरोग्याविषयीच्या ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

– रूचिका वर्मा


 ज्या गोष्टी समोर दिसतात किंवा जाणवतात त्यांना बहुतेक वेळेला, ज्या गोष्टींना स्पर्श करता येत नाही किंवा ज्या दिसून येत नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. आरोग्य व स्वास्थ्याच्या बाबतीत तर हे जास्त खरे आहे. आपण खूपदा आरोग्य किंवा ज्यांचा परिणाम सहज दिसून येतो किंवा ज्यांचे मोजमाप करता येते अशा आजारांवर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसारख्या सहज दिसून न येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विशेषतः कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या महामारीच्या या काळात तर त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. चांगली गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात आहे आणि लोकही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत घेत आहेत.


 आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी तुम्हाला पुढील 5 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे –
 


तुम्ही एकटे नाही : मानसिक आरोग्याच्या समस्या भेदभाव करत नाहीत. म्हणजेच कोणतीही सामाजिक- आर्थिक परिस्थिती, भौगोलिकता किंवा लिंग असले, तरी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. भारतात मानसिक आरोग्याशी संबंधित दुर्लक्षित समस्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. ही आव्हाने कोविड-19 महामारीमुळे आणखी तीव्र झाली आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आणि केवळ मानसिक आजार आहे म्हणून तुम्ही स्वतःला एकटे ठेवता कामा नये.

 


लक्षणांवर नजर ठेवा : इतर कोणत्याही ठळक लक्षणे असलेल्या, सहज मोजमाप करता येण्यासारख्या, रक्ताची चाचणी किंवा स्कॅनच्या मदतीने निदान करता येणाऱ्या शारीरिक समस्यांप्रमाणे मानसिक आरोग्याच्या समस्या इतक्या सोप्या नसतात. असे असले, तरी माहीतगार व्यक्तीला काही लक्षणे वारंवार दिसल्यास मदतीची आवश्यकता असल्याचे लक्षात येऊ शकते. वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणे वेगळी असली, तरी त्यातील सर्वात महत्त्वाच्या लक्षणांमध्ये खूप जास्त काळजी करणे किंवा भीती वाटणे, खूप निराश किंवा दुःखी वाटणे, गोंधळ होणे आणि मूडमध्ये वारंवार बदल होणे यांचा समावेश होतो.

 गरज असेल तेव्हा व्यावसायिक सल्ला घ्या : ज्याप्रमाणे मधुमेह किंवा हृदयाच्या आजारावर तुम्ही स्वतः घरीच उपचार करणार नाही, त्याचप्रमाणे मानसिक आजारावर उपचार करतानाही ‘डु इट युअरसेल्फ’ (डीआयवाय) असा दृष्टीकोन ठेवू नये. त्याऐवजी मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने हाताळण्यासाठी व्यावसायिक मदत आणि गरजेप्रमाणे औषधे घ्यावीत.

 


खर्चाची काळजी करू नका :  मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्याची गरज लक्षात घेत इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI) ऑगस्ट 2018 मध्ये विमा कंपन्यांना मानसिक आजाराकडेही इतर कोणत्याही आजाराप्रमाणे पाहाण्याचे आणि आरोग्य विमा योजनेअंतर्गत मानसिक आजार कव्हर करणे बंधनकारक केले. बहुतेक आरोग्य विमा कंपन्या मानसिक आजारासाठी हॉस्पिटलायझेशन कव्हर करतात, मात्र थोड्याच कंपन्या मानसोपचारतज्ज्ञांसारख्या मानसिक आरोग्य सल्लागारांचे ओपीडी उपचार कव्हर करतात. तेव्हा आता तुम्हाला मानसिक आरोग्याचे उपचार करताना त्याच्या खर्चाची काळजी करण्याची गरज नाही.

 हे कायमस्वरुपी नसते: लक्षात ठेवण्याजोगी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहुतेक वेळेस मानसिक आजार कायमस्वरुपी नसतो. तेव्हा त्यासोबत जगण्याऐवजी त्यावर उपचार करण्याला प्राधान्य द्या. तुमचे मानसिक आरोग्य बदलू शकते हे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.


मानसिक आरोग्याशी संबंधित काही गैरसमजुतींमुळे याविषयाशी संबंधित बहुतेक चर्चा छुपेपणाने केली जाते. मात्र, मानसिक आरोग्याला मुख्य प्रवाहात आणून चर्चा करणे आणि त्याचा त्रास असलेल्यांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. या जागतिक मानसिक आरोग्य दिनी व्यक्त होण्याचा आणि मनःशाती मिळवण्याचा निर्धार करूया.

(लेखिका फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मुख्य विपणन अधिकारी आहेत. )

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: