लेख

सर्वस्व समर्पित करणारे क्रांतिसिंह नाना पाटील !

-डॉ.श्रीमंत कोकाटे

आपल्या देशाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्व आयुष्य समर्पित केले, त्यातील अत्यंत प्रखर योद्धा म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील! क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या आजोळी गावी झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र. वडिलांचे नाव रामचंद्र पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वाडवडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यामुळे बालपणीच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गळ्यात पांडुरंगाची माळ पडली. वारकरी संप्रदायाचे तत्वनिष्ठ संस्कार क्रांतिसिंना बालपणापासूनच मिळाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे शिक्षण नरसिंगपूर, दुधोंडी या ठिकाणी झाले.

सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी नोकरी करावी, असे वडिलांना वाटायचे. तर आजीची इच्छा होती त्यांनी गावातच राहावे व पैलवान व्हावे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि ते तलाठी झाले. सुर्ली, वाठार या ठिकाणी त्यांनी तलाठी म्हणून काम केले. दरम्यान त्यांचा विवाह झाला, परंतु जोपर्यंत पत्नीला शिकवत नाही, तोपर्यंत मी पत्नी म्हणून व्यवहार करणार नाही. असा निर्धार त्यांनी केला. त्या काळामध्ये मुलींनी शिकणे म्हणजे अधर्म बांधला जात होता. अशा काळात क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपल्या पत्नीला स्वतः शिकविले. क्रांतिसिंह नाना पाटील यांना एक कन्यारत्न आहे त्यांचे नाव क्रांतीविरांगणा हौसाक्का पाटील असे आहे. त्यांनीदेखील पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.

त्या काळात सर्वत्र सत्यशोधकी जलसे होत असत. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा प्रसार गावागावात जलसाच्या माध्यमातून केला जात होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बालवयापासूनच महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार ऐकले होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या व्यक्तिमत्ववरती होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पुरोगामी विचारांची पेरणी केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरती सत्यशोधक चळवळीचा प्रचंड प्रभाव होता. तलाठी म्हणून काम करत असताना क्रांतिसिंह नाना पाटील हे सत्यशोधक विचारांचा प्रचार करायचे. तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व देखील जे जनतेला पटवून सांगायचे. भास्करराव जाधव हे निवडणुकीला उभे असताना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भास्करराव जाधव यांचे समर्थन केले. त्यामुळे तत्कालीन शासन व्यवस्थेने क्रांतिसिंह नाना पाटील यांना तलाठी पदावरून निलंबित केले. वरिष्ठ अधिकारी म्हणाले “तुम्ही माफी मागा आम्ही तुम्हाला नोकरीवरती घेतो.” तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाले “तुम्ही लुटारू आहात. तुम्ही जुलमी आहात. त्यामुळे तुम्ही माफी मागायच्या लायकीचे नाहीत”  असा बाणेदारपणा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे होता.

नोकरी गेली. आजीचे निधन झाले. पत्नीचे निधन झाले. क्रांतिसिंह नाउमेद न होता त्यांनी आपल्या स्वतःच्या जमीनीचा आणि वाड्याचा वाटा आपल्या दोन भावाला वाटून दिला. कन्या हाऊसाक्का यांना त्यांच्या आजोळी म्हणजे दुधोंडी या ठिकाणी ठेवले आणि क्रांतिसिंहनी पूर्णवेळ स्वातंत्र्यासाठी झोकून दिले. 1930 सालच्या सविनय कायदेभंग आंदोलनात उडी घेतली. क्रांतिसिंहांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. जुलमी इंग्रजांचे राज्य नष्ट व्हावे आणि जनतेला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ब्रिटिशांची रेल्वे लुटणे, पोस्ट खाते लुटणे, भूमिगत राहून स्वातंत्र्याचे आंदोलन छेडणे, यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील निष्णांत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडले . क्रांतिसिंह नाना पाटील यांना पकडून देण्यासाठी त्या काळात इंग्रजांनी पाच हजाराचे इनाम जाहीर केले. आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या क्रांतीसिंह नाना पाटलांना पकडण्यासाठी इंग्रजांनी चोहोबाजूंनी वेढा टाकला, पण मोठ्या कौशल्याने इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन क्रांतिसिंह नाना पाटील निसटले. छत्रपती शिवाजी राजांचा क्रांतिकारक वारसा क्रांतिसिंह नाना पाटलांनी चालविला.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. गावोगावी प्रशिक्षण वर्ग चालू करणे, गरिबांना न्याय मिळवून देणे, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडाबंदी, बिन खर्चाचे विवाह करणे, संपूर्ण दारूबंदी, जुगार बंदी, गुन्हेगारांना शिक्षा, स्त्रियांना संरक्षण, वाचनालय सुरु करणे, काळाबाजार रोखणे, सावकारशाही नष्ट करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्य प्रतिसरकारने केले. इंग्रजांच्या काळात संपूर्ण देशभर जुलमी राजवट असताना सातारा, सांगली परिसरात सामान्य जनतेचे सरकार म्हणजेच प्रतिसरकार होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तरुणांचे संघटन बांधले. युवकांची एक आघाडी स्थापन केली त्या आघाडीला तुफान सेना असे नाव दिले. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड, नागनाथ नाईकवाडी हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे तरुण तडफदार, निर्भीड, लढवय्ये शिलेदार होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत राहुन जनतेला अधिकार मिळावेत यासाठी संघर्ष केला. त्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या त्यागातून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. क्रांतिसिंहना वाटले आता स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे जनतेचे कल्याण होणार! परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. तत्कालीन काँग्रेसवरती खेर, देव-देवगिरीकर या सनातनी विचारांच्या ब्राह्मणांचे वर्चस्व होते. कष्टकरी, शेतकरी, मजूर, स्त्रियांचा विकास व्हावा हा कार्यक्रम त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे कॉंग्रेसमधील केशवराव जेधे, कर्मवीर भाऊराव पाटील, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत इत्यादी मंडळींनी 3 ऑगस्ट 1947 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी कामगार पक्षात आले. क्रांतिसिंह नाना पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे धुरंदर, लढवय्ये, स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेते होते. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.

क्रांतिसिंह नाना पाटील हे 1957 साली सातारा आणि 1967 साली बीड येथून दोन वेळा खासदार झाले. जनमाणसाच्या हक्क अधिकारासाठी संसदेत मराठी भाषेतून आवाज उठवणारा महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ! केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य नव्हे, तर जनतेला शैक्षणिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आवाज उठवला.

गोवा मुक्तीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. बेळगाव कारवार हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांना सिमोगा या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला. मुंबई गुजरातला देण्याचा मोरारजीभाई देसाई, पंडित नेहरू त्यांचा डाव होता तोडाव क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊ साठे शाहीर गव्हाणकर इत्यादी शूरविरांनी उधळून लावला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये उडी घेतली. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी त्यांनी आवाज उठविला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील यांना नऊ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांच्या हक्क अधिकारासाठी आंदोलन केले.

क्रांतिसिंह नाना पाटील हे अत्यंत संवेदनशील मनाचे होते. ते अत्यंत स्वाभिमानी होते. प्रखर राष्ट्रवादी होते. पण त्यांचा राष्ट्रवाद हा सत्यशोधक विचारांचा होता. त्यांनी सनातनी व्यवस्थे विरुद्ध आवाज उठविला. त्यांनी अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला. मरीआईचा गाडा घेऊन गेलात म्हणून कॉलऱ्याची साथ जाणार नाही, कॉलऱ्याची साथ जाण्यासाठी औषध उपचार घेतला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. म्हसोबाला नवस बोलून तुम्हाला यश मिळणार नाही, तर प्रयत्न केल्यानेच यशाच्या शिखरापर्यंत जाता येते, हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुरोगामी विचार होता. “प्रातर्विधीच्या प्रसंगी हाताने आपण स्वच्छता बाळगली, म्हणून आपण हाताचा त्याग करत नाही.त्यामुळे काबाडकष्ट करणारा मागासवर्गीय समाज हा आपला भाऊ आहे. तो आपला शत्रू नाही. तो आपला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करा.” हा समतावादी विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा होता.

मुलांप्रमाणेच मुलींना देखील शिक्षण दिले पाहिजे, त्यांना हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मुलगी देखील वंशाचा दिवा आहे,ही नाना पाटील यांची भूमिका होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. भाजी, भाकरी, झुणका हा त्यांचा आहार होता. ज्या गावाला जायचे त्याच गावात मुक्काम करायचे. ते महान स्वातंत्र्यवीर होते. दोन वेळा खासदार होते. त्यांचा लौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होता. परंतु त्यांनी कधी घमेंड बाळगली नाही, अहंकार ठेवला नाही, बडेजाव दाखवला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.

क्रांतिसिंहांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण संकटाने ते नाऊमेद झाले नाहीत. संकटावर मात करून त्यांनी विजय संपादन केला. त्यांच्या जीवनात अनेक आनंदाचे क्षण आले, पण ते आनंदाने हुरळून गेले नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक लोकांना मदत केली. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्ते उभे केले. क्रांतिसिंह नाना पाटील समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांची जडणघडण वारकरी संप्रदाय आणि सत्यशोधक चळवळ या विचारातून झाली. त्यांनी ब्राह्मणेतर पक्ष, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष असा प्रवास केला. परंतु ते विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ होते.

क्रांतिसिंह नाना पाटलांचा दरारा देशभर होता. काशीचे पंडे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव ऐकले की भाविक भक्तांना अत्यंत सन्मानाने वागणूक द्यायचे. क्रांतिसिंह नाना पाटील दोन वेळा खासदार होते. देशाचे महान नेते होते. परंतु राजकारण हे व्यक्तिगत संपत्ती कमावण्याचे साधन नाही, तर लोकसेवा आणि समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. या तत्त्वाने क्रांतिसिंह नाना पाटील राहिले. अशा महान वीराला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: