कला-साहित्य

नित्यानंदी नित्या!

- अनंत अग्नी

आज नित्याचा पहिला स्मृतीदिन. संघर्षातून कर्तृत्व घडवणार्‍या एका अस्सल युवा कार्यकर्त्याचा आज स्मरण दिवस. युवकांना सदैव प्रेरणा देत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्याने आपले विद्यार्थी, तरुणाई, आप्तस्वकिय, मित्रमंडळी यांना उर्जा देत चळवळीचे सहयात्री केले त्या नित्यानंदी नित्याचा आज आठवण दिवस.
अंत्रुज म्हालांतल्या वाडी-ताळावले येथील लहानशा आणि संस्कारी घरात नित्या 14 जून 1972 रोजी जन्माला आला. नित्याला दोन बहिणी-अनिता, सरिता, दोन भाऊ – स्वर्ण, बाबलीन. नित्या या सगळ्यांमध्ये मोठा. आणि परिवातले हे मोठेपण नित्याने सदैव सांभाळले.
महाविद्यालयीन वयात नित्या एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिध्द होता. ज्युडो आणि खो-खो सारख्या खेळात त्याने गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले. बी.ए., एम.ए. झाल्यानंतर ‘नेट’ परिक्षा उत्तीर्ण झालेल्या अत्यंत मोजक्या प्राध्यापकांमध्ये तेव्हा नित्याचा समावेश होता. असे असले तरी नित्याला प्राध्यापकाची नोकरी सहजासहजी मिळाली नाही. साखळीचे सरकारी महाविद्यालय, पिलारचे फादर आग्नेल महाविद्यालय, काणकोणचे मलिक्कार्जून महाविद्यालय आदींमध्ये नित्याने सुरुवातीला कंत्राटीपध्दतीने काम केले. 2005 मध्ये कुंकळ्ळीच्या सि.इ.एस. महाविद्यालयात सुरुवातीला कंत्राटी आणि नंतर कायमस्वरूपी पध्दतीने नित्याला नोकरी मिळाली.
नित्याने आपल्या नायक परिवारासोबतच आपले मित्र, कोंकणी चळवळीतले सहकारी, विद्यार्थी यांना नेहमीच आपलेसे केले होते. त्याचा मित्रपरिवार खूप मोठा. तो अजातशत्रूच होता. असा हा भला माणूस वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी सगळ्यांना सोडून गेला.
1 मे 2020.रात्री साडे अकरा वाजता फोन आला. ‘भाई, नित्याक जिवाक बरें दिसना. बेगीन ताच्या घरा पाव.’ माझे घर नित्याच्या घरापासून अवघ्या दोन-तीन मिनिटाच्या अंतरावर. पण त्यादिवशी ती तीन मिनिटे आयुष्यातील सगळ्यात दुर्दैवी क्षण घेऊन आली होती. नित्याला ह्दयविकाराचा झटका आला होता आणि तो जमिनीवर कोसळला होता. आम्ही पोचेतो त्याचा शेजारी अँथनी आणि त्याच्या घरच्यांनी त्याला शुध्दीवर आणण्याचे सगळे प्रयत्न केले होते. थोड्याच वेळात आम्ही त्याला ‘हॉस्पिसीयो’मध्ये दाखल केले. आणि बाहेर मी, पुर्णा, प्रशांत, चेतन, रुपा, नित्याची पत्नी दिपा असे सगळेच डॉक्टरांनी बाहेर येऊन ‘भिवपाची गरज ना, ही इज ओके’ असे सांगण्याची चिंताग्रस्त चेहर्‍याने अस्वस्थ होऊन वाट पहात होतो. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. आम्ही सगळे त्यांच्याकडे धावलो. त्यांनी सांगितले, ‘सॉरी, ही इज नो मोअर’. आमच्यासाठी त्या क्षणी सगळे जगच थांबल्यासारखे झाले. आकाश कोसळणे म्हणजे काय ते आम्ही त्या क्षणामध्ये अनुभवले.
30 वर्षांपासून नित्याची आणि माझी मैत्री. राजभास आंदोलनानंतर काही प्रमाणात मरगळ आलेल्या कोंकणी चळवळीमध्ये नुकत्याच नव्या पिढीचा शिरकाव झाला होता. कोंकणी भाशा मंडळाच्या सहाय्याने राजू नायक, श्रीधर कामत, प्रशांत नायक, पुर्णानंद च्यारी, संदेश प्रभुदेसाई हे सगळे तरुण गोव्यातील विद्यार्थी आणि युवावर्गाला कोंकणी चळवळीमध्ये सक्रीय करण्यासाठी प्रयत्नशील होते. कोंकणीच्या प्रत्यक्ष चळचळीत आम्ही त्यावेळी सहभागी झालो. आमच्याही नकळत आमची अशी मैत्री झाली की, त्यानंतर आम्ही एकमेकांशिवाय आमचे सामाजिक आयुष्य असो किंवा कोंकणी चळवळ याचा कधी विचारच केला नाही. वैयक्तिक आयुष्यामध्ये तर सख्ख्या भावाएवढेच प्रेम दोघांनी एकमेंकाना दिले.
कोंकणी परिषदा, संमेलने, युवा महोत्सव मग ती कुठेही आयोजित होऊ दे, आम्ही त्या ठिकाणी एकत्र गेलो नाही आणि एकाच खोलीत राहिलो नाही असे कधीच झाले नाही. कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्हाला एकमेकांची साथसोबत होतीच. माझ्या आयुष्यातील कसलेही गुपीत त्याला सांगावे, कधी कोणाबद्दल काही वाईट वाटले तर त्याच्यासोबत बोलून मन हलके करावे आणि कितीही मोठे संकट आले तरी त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी अशी आमची मैत्री होती. कधी कामाचा जास्तच ताण आला तर त्याच्यासोबत घालवलेल्या थोड्या वेळात माझा सगळा मानसिक, शारिरीक ताण विरघळून जात असे.
रवीन्द्र केळेकर ज्ञानमंदिर आणि विद्याभुवन कोंकणी शाळेच्या व्यवस्थापन समितीचा तो सहकारी. शाळेच्या यशाचा त्याला खूप अभिमान! ‘आमच्यो शाळा खंयच्यान खंय पावल्यो न्हय‘ असे अभिमानाने सांगायचा…
सुरुवातीच्या काळात आम्ही पुर्णानंदाच्या नेतृत्वाखाली गोवा हितराखण मंचाची स्थापना केली. गोंय आणि गोंयकारपणाचा मुद्दा घेऊन आम्ही बरीच आंदोलने केली. आंदोलनाचा भाग म्हणून कुठल्याही कार्यालयात जाऊन तिथे निषेधाचा गोंधळ घालताना नित्याला कधी भिती वाटली नव्हती. राजभास कायदावर अंमलबजावणी करावी, यासाठी गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना तिथे पत्रके उडवण्याची हिंमत वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी दाखवणारा तो आमचा निर्भीड सेनानी होता.
कोंकणी भाशा मंडळ आणि तो शिकवत असलेले कुंकळ्ळीचे सि.ई.एस. महाविद्यालय
ही त्याची श्रध्दास्थाने. आपल्या विद्यार्थ्यांचे त्याला प्रचंड कौतुक. जणू काही त्याची लहान भावंडच. त्या विद्यार्थ्यांना त्याने स्वखर्चाने कर्नाटक, केरळमध्ये झालेल्या कोंकणी संमेलनाला घेऊन गेला होता. ‘हो म्हजो कोंकणी चळवळींतलो इन्वेस्टमेंट, हींच भुरगीं फाल्यां कोंकणी चळवळीक मेळटलीं’ असा विश्वास तो व्यक्त करत असे. त्याचा हा विश्वास आज मोठ्या प्रमाणात खरा ठरलेला दिसत आहे. त्याचे अनेक विद्यार्थी कोंकणी चळवळीत सक्रीय झालेले आहेत. त्याने कुंकळ्ळी, केपे भागामध्ये विविध युवामंडळे घडवली. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कोंकणी भाशा मंडळ, भांगराळे गोंय अस्मिताय, दक्षिणायन, अखिल गोंय प्राध्यापक संघटना सारख्या संस्थांनी नित्याने कोंकणी चळवळीला दिलेल्या योगदानाची कदर केली.
कोंकणी चळवळीत हिंदू-ख्रिस्ती, रोमी-नागरी, ब्राह्मण-बहुजन, ज्येष्ठ-कनिष्ठ असले कसलेच वाद असू नयेत असे त्याला सदैव वाटायचे. आणि त्यासाठी तो अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असे.
एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात आली तर ती कायमसाठीच त्याची होऊन जायची. त्याचे कोल्हापूरचे मित्र विश्वास, भाऊ हे त्याचा किती आदर करायचे हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. मुंबईपासून ते कोचीपर्यंतच्या कोंकणी चळवळीतले अग्रणी आणि कार्यकर्ते या सगळ्यांचा तो जिवाभावाचा मित्र होता. गोव्यात तर त्याचा मित्रपरिवार नाही असे एकही गाव नाही. ‘आमी कोंकणी चळवळींत आयले तेन्ना आमकां आमच्या जाणटेल्यांनी उर्बा दिली, वाट दाखयली देखीन आमी हांगा पावले. आतां नव्या दमाच्या तरनाट्यांक उर्बा दिवपाचें काम आमचें’ असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या या वृत्तीमुळेच युवा महोत्सवामध्ये आलेले पंधरा-सोळा वर्षाचे नवतरुणांना त्याचा लळा लागत असे, आणि ते त्याचेच होऊन जात.
तो अष्टपैलू होता. पण त्याचा मूळ पिंड मात्र कार्यकर्त्याचा. तो उत्तम आयोजक, कुशल संघटक, प्रभावी वक्ता, सृजनशील कवी, लेखक. ‘आमी बरोवंक लागिल्ले जाल्यार आमकांय घडये लेखनाचे पुरस्कार बी मेळूं येताले न्ही रे’ असे तो विनोदाने म्हणत असे. पण त्याने कधीच कसल्याच पुरस्काराची, पदाची, कौतुकाची अपेक्षा बाळगली नाही. मित्र आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेले प्रेम आणि स्थान हाच सगळ्यात मोठा पुरस्कार असे तो मानत असे. ‘आमी पयशे व्हडले जोडले ना आसत, पूण आमी इश्ट खूब जोडले न्हय रें’ असे तो अभिमानाने म्हणायचा. आणि ते खरेही होते. राज्यातले मोठमोठे डॉक्टर, व्यावसायिक, उद्योगपती, वकिल, लेखक त्याचे खास मित्र होते.
आपले घर त्याला विशेष प्रिय. आपली भावंडे, आपली पत्नी, तिच्या माहेराच्या आठवणी सांगताना त्याची तहानभूक हरपायची. आणि पत्नी, भावंडांसोबत बोलताना आम्हा मित्रांबद्दल तो भरभरून सांगायचा. मित्रपरिवारावर त्याचे निरातिशय प्रेम होते.
नित्याने गरिबी खूप जवळून अनुभवली होती. त्यामुळे कोणी गरजवंत त्याच्या नजरेतून कधीही सुटत नसे. अशा कित्येकांना त्याने आर्थिक आधार दिला होता. त्याच्या या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला असला तरी, त्याने आपली दात्याची भूमिका नेहमीच सचोटीने पार पाडली.

nityanad nayak
लेखक आणि नित्यानंद नायक

मैत्रीसाठी त्याला वयाचे बंधन कधी लागले नाही. तो जसा माझा मित्र होता तसाच माझ्या मुलाचा अनिशचाही मित्र होता. ‘तुवें मरे अनीशासारखें जावंक जाय’ असे तो त्याच्या मुलाला आर्याला सांगत असे. मुले त्याला आवडायची. आर्य तर त्याचा जीव की प्राण. पत्नी दिपाचा, तिच्या हुशारीच्या त्याला खूप अभिमान. तिचे कौतुक करताना त्याला शब्द कमी पडायचे. तिच्या वकिलीचे खाजगी कार्यालय सजवताना त्याने खूप एवढा बारिकसारीक विचार केला होता की त्याच्या कल्पकतेचे कौतुक वाटावे.
त्याला स्वप्ने पहायला आवडायची. त्याला डॉक्टरेट मिळवायची होती. त्यासाठी त्याने गोवा विद्यापीठात त्यासाठी नोंदणी केली होती. चार वर्षांनी आपल्याला डॉक्टरेट आणि मग नोकरीमध्ये बढती मिळेल हा विचार त्याला आनंद द्यायचा. कधी मस्करी करण्याचा मूड झाला तर मी त्याला ‘डॉक्टर नित्या’ म्हणायचो आणि त्याला ते आवडायचेदेखील.
त्याचा स्वत:चा एक खास शब्दसंग्रह होता. त्याची रचनादेखील त्यानेच केली होती. उदाहरणार्थ, एखादा कार्यक्रम करायचा झाल्यावर तो म्हणायचा, ‘फार करया’, एखाद्याने चांगले सादरीकरण केल्यावर ‘क्लासा क्लास’ अशा शब्दांत अभिप्राय तो नोंदवायचा. कोणी त्याला काही काम सांगितल्यावर, ‘हय रे पुता, करया तुजें काम’. एखादी बैठक झाल्यावर घरी जायची वेळ झाली की, ‘चला, आमी गेल्ले बशेन करया न्ही’ असे म्हणायचा पण ‘टेक कॅर’ म्हटल्याशिवाय कधीच निरोप घ्यायचा नाही.
फोटोग्राफी त्याचा छंद. त्याने काढलेल्या जुन्या वडिलोपार्जित घरांच्या फोटोचे एक पुस्तक दिल्लीतल्या एका नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले होते. छोट्या पक्षांचे फोटो काढून त्यांची माहिती मिळवण्याचा छंदही त्याला होता. त्यासाठी तो रानावनात खूप भटकायचा.
मडगावात राहत्या घराच्या मागे त्याने लहानशी परसबाग तयार केली होती. त्यामध्ये विविध प्रकारची फूलझाडे, फळझाडे, म्हशींग, केळी आदी लावून त्यांची निगा तो राखत असे. केळी, म्हसगांच्या शेंगा मित्रपरिवार-आप्तस्वकीयांना देतानाचा त्याला होणारा आनंद अवर्णनीय असे.
माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे जास्त महत्वाचे असे म्हणतात. माणसाच्या जगण्याच्या लांबीपेक्षा त्याच्या आयुष्याची रुंदी जास्त मौल्यवान. पण असे काहीही असले तरी वयाच्या सत्तेचाळीशीमध्ये कोणी असा आपला निरोप घेऊ शकत नाही.
नित्या, मरण हे एकच अटळ सत्य. पण ते असे वेदनादायी असू नये. तुझे असणे, तुझ्या प्रेमळ जगण्याच्या मधुर आठवणी आम्ही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपू आणि तुझ्या स्वप्नातली कोंकनी चळवळ पुढे घेऊन जाऊ. आणि हिच तुझ्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त वाहिलेली खरी आदरांजली होय!
(मूळ कोंकणी पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!