कला-साहित्य

ग्रेस दुर्बोध आहे… 

- अनिरुद्ध प्रभू

कविता किंवा कुठलाही कलाविष्कार हा दोन प्रकारांनी समजून उपभोगता येतो. उपभोगणे हाच योग्य शब्द आहे कारण रसिकता हा एक प्रकारच्या भुकेचाच प्रकार आहे असं मला वाटतं. अन्यथा एखाद्या विशिष्ट् कलाकाराच्या किंवा शैलीच्या कलाकृतींना पाहून / ऐकून / वाचून मनाला शांती मिळते किंवा तशी अन्य प्रकारची मानसिक अवस्थेला स्थैर्य देणारी अवस्था प्राप्त होते हे शक्य नाही. या उपभोगाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे समीक्षा आणि दुसरं म्हणजे रसग्रहण. या दोन्ही व्यवस्था कुठल्याही प्रकारच्या कलाकृतीला लागू होतातच. फरक असतो ते त्या विशिष्ट कलाकृतीच्या रचनाव्यवस्थेशी, आकृतिबंधाशी आणि अर्थात ते सादर करणाऱ्या कलाकाराशी आपण रसिक म्हणून किती आणि कुठल्या पातळीवर जाणीव, ज्ञान, अशा पातळ्यांवर जोडले जातो, आणि त्या जोडले जाण्याची तीव्रता किती असते. बऱ्याच वेळा या जोडले जाण्याच्या प्रक्रियेत कलाकृतीच्या मूळ अर्थाचा संबंध कमी येतो किंवा उशिरा येतो किंवा येतच नाही. दुसऱ्या पद्धतीत सांगायचं झालं तर इतर बाह्य आणि द्वितीय स्तरावरील रचनाव्यवस्थांचा प्रभाव अधिक असल्याने, रसिक म्हणून आपली उपभोगी दृष्टी बाह्य आवरणावर खिळून राहिल्याने किंवा तिथेच आपली उपभोगाची क्षमता पूर्ण झाल्याने किंवा सीमित झाल्याने आपण मूळ अर्थाकडे पोचत नाही किंवा दुर्लक्ष करतो. कालांतराने जेव्हा या बाह्य आवरणाची मजा सतत घेऊन किंवा अन्य कुठल्याही कारणाने निघून जाते किंवा कमी होते आणि आपली नजर त्या कलाकृतीच्या मूळ अर्थाच्या दिशेने जाते, आपण समोर दिसत असलेल्या मूळ माध्यमांद्वारे विचार करू लागतो, ही माध्यमं म्हणजे कविता किंवा गाणं असेल तर शब्द, चित्र असेल तर आकृतिबंध किंवा फटकारे, सिनेमा असेल तर दृष्ट मांडण्याची पद्धत आणि त्यामागचा हेतु आणि त्यांची शृंखला, तेव्हा हे सगळं दुर्बोध आणि सुबोध या चक्रात अडकतं. तिथे चूक म्हटलं तर आपली असते किंवा कुणाचीच नसते.
काही वर्षांपूर्वी ग्रेसच्या पहिल्या स्मृतिदिनी झालेल्या कार्यक्रमात महेश एलकुंचवार त्यांच्या मनोगतात सांगतात, ‘सुबोधता किंवा दुर्बोधता आपल्या अनुभव, ज्ञान, त्यांच्यामुळे निर्माण झालेली आकलन क्षमता यांच्या जिवावर स्वत:ला केंद्रस्थानी ठेऊन काढलेल्या वर्तुळावर आधारित असते. वर्तुळाच्या आत जे पडतं ते सुबोध आणि जे नाही पडत ते दुर्बोध इतकं साधं गणित आपण रसिक म्हणून लावून मोकळे होतो. पण समोर असलेली, आपण दुर्बोध म्हणून लेबल लावलेली कलाकृति समजून घेण्यासाठी आपलं वर्तुळ मोठं करण्याच्या भानगडीत आपण पडत नाही.’ रसिक, आस्वादक, समीक्षक अशा सगळ्याच लोकांना हे लागू होतं. ते वर्तुळ मोठं न करता येण्याची, न करण्याची अनेक कारणं असतात पण त्याचा फटका अनेक अभिजात, तत्कालीन सामाजिक किंवा कलाधारीत अवस्थेच्या मुख्य, दुय्यम मुख्य आशा कुठल्याच प्रवाहात न बसणाऱ्या पण वेगळ्या आणि अभिजात कलाकारांना आणि त्यांच्या रचनांना याचा फटका बसतो.
graceग्रेस या फटक्याचा मोठा बळी आहे. आपण आपलं मोठं न करू शकलेलं वर्तुळ त्याच्या मागे एक प्रमुख कारण आहेच पण तितकंच त्याच्या मूळ रचेनवर अप्रतिमपणे चढवलेल्या बाह्य आवरणात अडकून पडणं हे ही एक महत्वाचं कारणं आहे. मंगेशकरांनी ग्रेसच्या कवितांना दिलेली नवीन रुपडी प्रचंड मोहक असल्याने ती सर्वत्र पसरली, आणि कदाचित फक्त पुस्तकांच्या किंवा कार्यक्रमांच्या जोरावर जिथवर कवि म्हणून ग्रेस पोचू शकले नसते त्याहीपेक्षा कित्येक कोस लांब ते पोचले याबाबत कुठलीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही परंतु त्या मोहकतेत आणि त्यात दाखवलेल्या शब्दांच्या स्वरूपात रसिक म्हणून आपण इतके गुंतलो की त्या पलीकडे ग्रेस समजून घ्यावे असं आपल्याला वाटलं नाही, आणि ज्यांना वाटलं, ज्यांनी प्रयत्न केले त्यातल्या बहुतांश लोकांना त्यातली मोहकात उघडपणे न दिसल्याने, जाणवल्याने (जी तिथे मुळातच वेगळ्या स्वरूपात होतीच) ग्रेस वर दुर्बोध असा शिक्का बसला.
आज ग्रेसचा जन्मदिवस. त्याच्या दुर्बोधतेवर विचार करताना मला या टिप्पणा मागच्या विचारांनी लिहू वाटलं आणि ते मी इथे व्यक्त केलं. कदाचित माझ्याआधी सुद्धा कुणीतरी या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहिलेलं असू शकतं, आणि जर नसेल तर यानिमित्ताने का होईना पण जर या दृष्टिकोणावर छोटीशी आणि तात्कालिक चर्चा जरी झाली तर पुष्कळ अशी माझी धारणा आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: