लेखसातारा 

कोण होणार जिल्हा बँकेचा कारभारी ?

– अभयकुमार देशमुख

जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आत्तापर्यंत २१ पैकी तीन संचालक बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. आता राहिलेल्या १८ जागांसाठी सर्वच राजकीय नेत्यांची जुळवा जुळव सुरु आहे. त्यातच आता रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसू लागल्या आहेत. यामध्ये सातारच्या दोन राजेंमध्ये एक दिवसही एकमेंकावर टिका केल्याशिवाय जाताना दिसेना.


कोणाच्या मर्जीतले किती संचालक जिल्हा बॅंकेत प्रवेश करणार याचा अजून कोणाला अंदाज लावता येत नाही. शिवेंद्रराजे भोसलेंनी राष्ट्रवादीशी जुळवून घेवून पुन्हा बॅंकेत आपले वर्चस्व कसे राहिल याची जुळणी केली आहे.

तर खटावमध्ये पुन्हा एकदा आमचं ठरलंय टिमने डोके वर काढले आहे. यामध्ये प्रभाकर देशमुख गट सोडला तर कॉंग्रेसचे रणजीतसिंह देशमुख आणि माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी प्रभाकर घार्गेंच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे. सद्या प्रभाकर घार्गे वादाच्या भव-यात अडकले आहेत. असं असलं तरी त्यांच्या गटाची ५२ मते, रणजितसिंह देशमुख यांची २२ मते तर येळगावकर यांची ६ मते अशी एकून मिळून ८० मते घार्गे गटाकडे असल्याचा दावा त्यांचे समर्थक करताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नंदकुमार मोरेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. तर भाजपचे आमदार जयकुमार यांनीही त्यांना बाजूला सारण्याचा विचार करणाऱ्या नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी कंबर कसली आहे.

दुसरीकडे सर्वात जास्त चर्चेत असलेल्या कराड सोसायटी मतदारसंघात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघाबाबत उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्यामध्ये कोणताच समजोता न झाल्याने दोघांनीही सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरले आहेत. एकून या मतदारसंघात १४० मतं आहेत. पैकी उंडाळकर समर्थक त्यांच्याकडे ८० मतं असल्याचा दावा करत आहेत. तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थकही विजयला पुरेशी मतं असल्याचा दावा करताना दिसत आहेत. बाळासाहेब पाटील हे राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

तर उदयसिंह पाटील यांच्या वडिलांचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असं असलं तरी कराड सोसायटी मतदारसंघात अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या पारंपारिक मतदारसंघातून यंदा कोण जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून जाणार याची चर्चा गावागावात घडताना दिसत आहे. एकुनच संपूर्ण जिल्ह्यात रणधुमाळी सुरु असून जिल्हा बॅंकेचे पुढचे कारभारी कोण असणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: