महाराष्ट्र

​शनिवारपासून मिळणार रिक्षाचालकांना सरकारचे अर्थसहाय्य 

मुंबई​ (अभयकुमार देशमुख) :​
राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून (दि. २२ मे) सुरु होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु होत आहे.

कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयसीआयसीआय’बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना २२ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षा चालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे.

रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: