सातारा 

‘​बी. बी. एफ. तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा’

जिल्हा कृषीअधिकारी काळे यांचे प्रतिपादन

सातारा (महेश पवार) :

खरीपचा हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. या हंगामात सोयाबीन, भुइमूग, भात, हायब्रीड इत्यादी पिकांची पेरणी केली जाते.या हंगामात  जिल्हा कृषी विभागाने एक नवीन उपक्रम राबवला आहे. यामध्ये सोयाबीनची आधुनिक लागवड पध्दतीचे मार्गदर्शन देण्याचे काम कृषी विभाग करत आहे. गावोगावी जावून बी. बी. एफ तंत्रज्ञानाच्या मदतीने सोयाबीन लागवड कशी फायदेशीर ठरत आहे. याचे मार्गदर्शन कृषी खात्याकडून देण्यात येत आहे.

‘बीबीएफ’ पद्धतींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

1)सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पावसामध्ये खंड पडल्यास निर्माण होणारी जमिनीतील पाण्याची कमतरता दूर करण्यास बीबीएफ पद्धत उपयुक्त ठरते.

2)‘बीबीएफ’ पद्धत पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवून मातीत ओलावा जास्त काळ टिकवून ठेवते, पडणार्‍या पावसाच्या पाण्यास उताराच्या दिशेने वाहून जाण्यास अटकाव करते व जमिनीची धूप कमी करून जमिनीतील ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.

3)‘बीबीएफ’ पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त झालेले पाणी सर्‍यांमधून वाहून नेले जाते व पीक पाण्यात डुंबून संपूर्ण नुकसान होण्यापासून बचाच होतो. याउलट, हे शेतातले पाणी शेतामध्येच मुरविल्यामुळे पावसाच्या दीर्घ खंडाच्या वेळी या जास्त झालेल्या पाण्याचा (ओलाव्याच्या स्वरूपात) पिकासाठी उपयोग होतो. या दोन्ही परिस्थितींवर ‘बीबीएफ’ने मात करता येऊन सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकते.

4)रुंद वरंब्यावर सोयाबीनची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणार्‍या खोड व मूळ कुजव्या रेागांचा प्रादुर्भाव टाळला जातो.

5)सोयाबीनची रुंद वरंब्यावर लागवड केली जाते, त्यामुळे सर्‍यांचा उपयोग करून आंतरमशागतीची कामे सुखकररीत्या करणे सोपे होते.

6)पिकाला पाणी देणे, ठिबक संचाचा पाण्यासाठी वापर करणे, तण नियंत्रण, कीटकनाशक फवारणी इ. कामे योग्य रीतीने करणे शक्य होते.

7)पिकामध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

​​या पध्दतीची लागवड केल्याने उत्पादनात वाढ होत असून शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फायदा होवू शकतो. असे कृषी अधिकारी काळे यानी सांगितले.

यावेळी हे मार्गदर्शन करताना आरे  ,पोगरवाडी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: