लेख

या बकरी ईदला आपण ‘असे’ करू शकतो का?

– अस्लम जमादार 

जगभरातून दरवर्षी सुमारे 25 लाखांहून अधिक हज यात्रेकरु बकरी ईदच्यादरम्यान मक्कावारी करतात. परंतु कोरोनामुळे या दोन वर्षांमध्ये या वरील भाविक मुकले आहेत.2021 हजसाठी सौदि अरेबियाने फक्त स्थानिक आणि ज्यांनी कोरोना लसीकरण केले आहे, अशा फक्त साठ हजार भाविकांना हज यात्रा अर्थात मक्का प्रवेशासाठी मुभा दिली आहे.

प्रेषितांनी हजारो वर्षापूर्वी स्पष्ट संकेत दिले होते, जर एखादा भूभाग, प्रदेश- प्लेग अथवा महामारीमुळे ग्रासला असेल तरत्या भागात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात यावे. आपल्यामुळे इतरांना कसलाही संसर्ग होणार नाही, हा त्या मागचा खरा मतियार्थ. नेमका हाच उद्देश समोर ठेवून सौदी-अरेबियानेहि कोविड काळातिल हज यात्रेसाठी नियमावली बनवली आहे. यामागचे संकेत सर्वच स्थानिक आणी परदेशी यात्रेकरुंची सुरक्षा हाच सर्वोत्तम आहे.

हजला जाण्याची ज्यांची मनिषा होती, ते या तांत्रिक अडचणीमुळे जाऊ शकत नसले तरी, बकरी ईदचा खरा उद्देश सफल होऊ शकतो आणि त्यामागचे पुण्य आपल्या पदरात पडत येऊ शकते. खरे तर बकरी ईदचा खरा संदेश आहे, त्याग, बलिदान. पण सद्यकाळात आपण यापासून खूप दूर गेलो आहोत. बकरी ईद म्हणजे केवळ प्राण्याची हत्या करून मांसाहार करणे एवढेच आपण मर्यादित झालो आहोत. त्यामुळे बकरी ईदचा खरा उद्देश साध्य कारण्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे.म्हणूनच पुण्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक चळवळीने २००५ सालापासून प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे.

यानुसार सर्वप्रथम मुस्लिमाना देण्यात येणारे हज अनुदानचा पर्दाफाश करत हे हजारो कोटींचे अनुदान सर्व धर्मासाठी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरण्यात यावे अशी सूचना आणि कल्पना केंद्र सरकार व हज विभागाला दिली, त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर हि कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. पुरोगामी मुस्लिम संघटना आता बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान आणि प्लाझ्मादान आदी उपक्रम राबवत आहेत. सध्या हे प्रमाण कमी असले तरी, आगामी काळात हे चित्र नक्कीच अधिक मोठे होऊ शकते.

जोडीलाच अजून एक विचार म्हणजे, वर्षाकाठी सुमारे दीड लाख भाविक हजयात्रेसाठी जातात. त्यांचा प्रति माणसी चार लाख रुपये खर्च अपेक्षित धरला, तरी पुढील आवाहन करावेसे वाटते.

प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५ हाजीं एकत्र आले तर, हि रक्कम एक कोटी इतकी होते. आणि या रक्कमेतून आपल्याच गावासाठी एखादे सुसज्ज कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल उभारणीसाठी मदत केली तर केवळ एकच नाही तर शंभरवेळा हजदर्शन केल्याचे पुण्य पदरात पडू शकेल. अर्थात असा विचार मनात येणे आणि तो कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्नशील जेव्हा आम्ही मार्गस्थ होऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने बकरी ईद साजरी करण्याचे आणि मोहम्मद पैगंबर यांचे सच्चे अनुयायी असल्याचे सिद्ध होऊ शकेल.

(लेखक परिवर्तन– अल्पसंख्यांक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: