लेख

चुकीची दुरुस्ती आणि मनाचा मोठेपणा

-नरेंद्र सावईकर

भूमिपुत्र बिलावरून बराच गदारोळ माजला. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर बिलातील भूमिपुत्र हा शब्द वगळणार असल्याचे जाहीर केले तसेच सदर बीलातील तरतुदी संदर्भात सूचनाही मागवल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अभिनंदन.

ज्यांचा हेतू स्पष्ट व पारदर्शक असतो तेच चूक मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणा दाखवतात. भाऊसाहेब बंदोडकरांच्या काळातील कुळ व मुंडकार कायदे सोडले तर काँग्रेस पार्टीच्या सरकारांच्या काळात गोव्यातील सामान्य माणसाला संरक्षण व हक्क देणारे कोणते कायदे केले? डॉ. प्रमोद सावंत यांनी व त्यांच्या सरकारने सामान्य गोंयकाराला त्याच्या घराची मालकी देण्याचे उद्दिष्ट ठेऊन कायदा करण्याचा किमान प्रयत्न तरी केला. भूमिपुत्र या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला तो एसटी समाजातील कार्यकर्ते व नेत्यांनी. मुख्यमंत्र्यांनी त्यांची भावना समजून तो शब्द वगळण्याचे जाहीरदेखील केले व सदर कायद्यासंबंधी सूचनाही मागवल्या. मालकीहक्क देण्यासंबंधीचे कायदे करताना अडचणी असणारच. पण हे कायदे करण्याच्या हेतूविषयी कोणाच्या मनात शंका असू नये व म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे.

चूक मान्य करण्याची वेळ जर काँग्रेसवर आली तर गोव्यातील कॅसिनोची सुरुवात, २००७ ते २०१२ काळातील बेधुंद खाणव्यवसाय, कोंकण रेल्वेसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाला केलेला विरोध व त्यामुळे गोंवेकरांना त्या रेल्वेसेवेचा लाभ घेण्यात झालेला उशीर, मांडवी व झुआरी या दोन्ही ठिकाणचे नवीन पूल बांधण्यास झालेली दिरंगाई इत्यादी अनेक विषयांसाठीची चूक मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणा काँग्रेस पार्टी दाखवेल? किमान तेवढी तरी सद्बुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी.

समाजाच्या व सर्वसामान्य माणसाच्या विकासाची तळमळ असलेली व्यक्तीच चूक सुधारून दुरुस्ती करण्याची जाहीर भूमिका घेऊ शकते व डॉ. प्रमोद सावंत यांनी हेच केले आहे. हा कायदा कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येवो पण तो अस्तित्वात येण्यासाठी केलेले प्रयत्न हे मात्र निश्चितच अभिनंदनीय आहेत!

 

 (लेखक भाजपचे माजी खासदार आहेत.)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: