गोवा 

 ‘​२०२२ निवडणुकीसाठी ‘हे’ आहे भाजपचे मिशन’​

मडगाव ​:
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकांचा विश्वास घालवला आहे व त्यामुळेच गोव्यात परत सत्ता स्थापन करणे भाजपला शक्य नाही. पक्षांतरांना प्रोत्साहन देणे व फॅमिली राज हेच २०२२ च्या विधानसभा निवडणूकांसाठी भाजपचे मिशन असणार आहे असे दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी म्हटले आहे.

सन २०२२ मध्ये गोव्यात कॉंग्रेस पक्षच सत्ता स्थापन करणार आहे याचा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. गोमंतकीयांनी पुर्ण बहुमत देवुन कॉंग्रेसचे स्थिर सरकार आणावे व भाजपचा डाव हाणुन पाडावा असे आवाहन ज्यो डायस यांनी केले आहे.

समोर दिसणाऱ्या दारुण पराभवाने भाजप गोंधळला असुन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या क्रोनी क्लब तर्फे पुरस्कृत काही संघटना व राजकीय पक्ष भाजपनेच आता मैदानात उतरविले आहेत. गोवा भांडवलदारांना विकणे हे एकमेव ध्येय समोर ठेवुन ह्या संघटना व राजकीय पक्ष वावरत आहेत. कॉंग्रेस पक्ष त्यांचा कुटील डाव कदापी सफल होऊ देणार नाही असा इशारा ज्यो डायस यांनी दिला आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पक्षांतराला पुर्णविराम देण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत व प्रभावी करण्याची मागणी करणारा ठराव विधानसभेत दाखल केला होता. परंतु, केवळ पक्षांतरे व अलोकशाही मार्गाने सत्ता स्थापन करण्याची सवय झालेल्या भाजप सरकारने तो ठराव दाखलच करुन घेतला नाही. यावरुन भाजप फोडाफोडीचे राजकारण, पक्षांतरे, फॅमिली राज यांना प्रोत्साहन देतच राहणार व जनादेश डावलुन सत्तेत राहण्याचा प्रयत्न करणार हे उघड झाले आहे.

पक्षांतराला कायमचा पुर्णविराम द्यावा म्हणुन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दाखल केलेल्या ठरावाबद्दल भाजपवाले गप्प आहेत. भाजपचे आता संसदेत बहुमत आहे. पक्षांतराला आळा घालुन लोकशाही बळकट करण्याचे भाजपला खरेच वाटत असल्यास त्यांनी पक्षांतर बंदी कायदा कडक करण्याचे विधेयक आगामी सत्रात संसदेत संमत करावे अशी मागणी ज्यो डायस यांनी केली आहे.

स्व​त:​ला “पार्टी व्हिथ अ डिफरंस” म्हणणारा भाजप आता फुटिर, जोडपी तसेच इतर पक्षातुन आयात केलेल्या उमेदवारांना टिकीट देणार आहे. आज भाजपकडे त्यांचे स्वत​:​चे नेतृत्व नाही. गोमंतकीय जनता या सर्वांना येत्या विधानसभा निवडणूकीत योग्य धडा शिकवणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: