गोवा 

‘गोमंतकीयांना डावलून परप्रांतियांचे भले करण्याचे भाजपचे धोरण ‘

पणजी :
गोव्यात दररोज पाच हजार लोक विवीध कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी येतात ह्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याने भाजप सरकारचे गोमंतकीयांना डावलुन परप्रांतियांचे भले करण्याचे धोरण उघड झाले आहे असे कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

गोव्यात येणाऱ्यांवर आपले सरकार निर्बंध घालु शकत नाही असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शनच केले आहे. भाजप सरकारला लोकांच्या आरोग्य संपधे पेक्षा धन संपधा महत्वाची हे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा मान्य केले आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

गोव्यातील भाजप सरकारने गोमंतकीयांना डावलुन परप्रातियांना गोव्यात नोकऱ्या मिळवून दिल्या हे आता मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले आहे. आज गोव्यात हजारो शिक्षीत नोकरीसाठी याचना करताना भाजप सरकार गोव्याबाहेरील  लोकांना रोजगार मिळवून देत आहे हे धक्कादायक आहे. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासुन गोव्यात बिगर-गोमंतकीयांसाठी सर्व काही उपलब्ध करुन दिले आहे.

गोमंतकीयांना डावलुन, बाहेरच्याना रोजगार देणाऱ्या सर्व कंपन्या व उद्योगांवर सरकारने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. भाजपचे  भांडवलशाही धोरण यातुन स्पष्ट दिसते असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

कोविड महामारीत केवळ उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानेच भाजप सरकारला कर्फ्यु लावणे भाग पडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजपर्यंत केवळ गोमंतकीयांना डावलुन व प्रसंगी त्यांच्या जीवाशी खेळ मांडुन शेजारील राज्यांना मदत करण्याचे धोरण राबविले आहे.

गोमेकॉत ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण तडफडुन मरत असताना, गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गला प्राणवायुचा पुरवठा करीत होते. आता, गोमंतकीयांना प्राधान्य न देता परप्रातियांना कोविड लसीकरण घेण्याची परवानगी भाजप सरकारने दिली आहे. गोमंतकीयांचा उपयोग मात्र गिनीपिग सारखा करुन भाजप सरकार माया जमवित आहे असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

कामगार व रोजगार मंत्री जेनिफर मोंसेरात यांनी गोव्यातील रोजगार संधी बद्दल सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रीका जारी करावी जेणेकरुन गोव्यातील किती उद्योगांत परप्रांतीय काम करतात हे लोकांना कळेल. सरकारने गोमंतकीयांना खासगी कंपनीत रोजगार देण्यासाठी कोणती पाऊले उचलली याची माहिती मंत्र्यानी लोकांसमोर ठेवावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याबाहेरील कोण कोणत्या राज्यात आपले नक्की कोणावर प्रेम आहे हे गोमंतकीयांना सांगावे. डॉ. प्रमोद सावंतानी आपल्या प्रेमप्रकरणांमुळे गोव्याचे हित नेहमी गहाण ठेवले आहे.

आज मुख्यमंत्रीच जेव्हा बाहेरुन दररोज पाच हजार लोक गोव्यात नोकरीसाठी येतात हे मान्य करतात त्यावेळी गोव्यात वास्तव्य करुन सुमारे १५ ते २० हजार बिगर गोमंतकीय लोक विवीध आस्थापनांत नोकरी करीत असतील हे स्पष्ट आहे. गोमंतकीयांवर हा घोर अन्याय असुन, भाजप सरकारला गोवेकरांचे काहिच पडलेले नाही हे उघड होत आहे.

भाजप सरकारने गोमंतकीयांच्या भवितव्याशी खेळु नये. कोविड महामारीत सरकारने केवळ स्थानिकांच्या भल्याचा विचार करावा अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: