google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

प्रबोधनाचा वैचारिक खजिना

– सुलोचना पटवारी

  ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे डॉ. सुधीर देवरे यांचं पुस्तक असून ते त्यांच्या इतर सकस आणि भाषेवरच्या लिखाणासोबतच ब्लॉगवर तत्कालीन, वर्तमान काळाशी निगडीत समस्यांचं सडेतोड़, तळमळीनं वैचारिक लिखाण करतात. वाचक विचार करायला प्रवृत्त होतील असं तरीही खूप जड नसलेलं हे मर्मभेदी लेखांचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचत  असताना मला आतापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा नव्यानं उलगडा झाला. तसेच देशहितासाठी आणि देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तरुण पिढीनं काही गोष्टी अंमलात आणणं किती आवश्यक आहे, याचं संपूर्ण विवेचन लेखकानं केलेलं आहे. पुस्तकात अशा अनेक विषयांना स्पर्श केला असला तरी पैकी काही लेखांच्या निमित्तानं माझी स्वत:ची काही मतं या पुस्तकातील लेखांवर मांडली आहेत, त्यांचं विवेचन.

‘भारताचा दैवाधीन पारंपरिक शेतकरी’ या लेखात शेतकरी देवावर भरोसा ठेवून शेती करतो, कर्ज काढणं हे त्याचं भागदेय आहे. त्यामुळंच भारतीय शेतकरी मागं पडलाय. त्यानं आता आधुनिक शेतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मराठवाडा विभाग सोडला तर इतर ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते. यासाठीच शासनानं कृषी महाविद्यालये सुरू केली आहेत. त्याचा फायदा बरेच विद्यार्थी घेताना दिसतात. त्यामुळं शेती संबंधी ज्या खुळचट कल्पना होत्या त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकर्‍यांनी पारंपरिक आणि व्यापारी अशी दोन्ही पिकं शेतीत घ्यायला हवी, एकच एक नको.

      ‘दहशतवाद’ ही एक आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय समस्या बनून राहिली आहे. यांमुळं देशाची एकात्मता संपुष्टात येते, तसेच दोन उभय देशात शत्रूत्व निर्माण होतं. देशांच्या अंतर्गत हालचाली संशयात्मक होतात. देशांत तणाव निर्माण होतो. हे टाळायचं असल्यास देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची किंमत समजली पाहिजे. त्यासाठी पंचायतीमध्ये अशा योजना अंमलात आणून देशाची एकात्मता अखंड ठेवण्याचे प्रयत्न व्हावेत. 

  आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे ओलांडली. या निमित्तानं काय विशेष निर्णय घेतले जात आहेत? देशाचा काय विकास होत आहे? आपण खरचं आत्मनिर्भर होत आहोत की महत्वाच्या सार्वभौम बाबी विकून आयतं खाण्याचा प्रयत्न करीत आहोत? लोकांना किमान आपण चांगले रस्ते तरी देऊ शकतो का? 

      ‘पत्रकारिता’ हा आजच्या युगात चर्चेचा विषय आहे. बरेच जण पोटासाठी म्हणूनच पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारतात की काय? (अपवाद वगळून). त्यांना सत्य आणि असत्य यांविषयी काहीही देणंघेणं नसतं. पत्रकारिता आज हवी तशी इमानदार राहिली असती किंवा पत्रकारांनी कोण्या लफंगी- कलंकी राजकारणी नेत्यांची भीडभाड ठेवली नसती तर आज आपल्या भारत देशाचं चित्र वेगळंच राहिलं असतं. एकंदरीत भ्रष्टाचार हा फक्त नावालाच उरला असता. पण दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचं पेव फुटतंय. आपला भ्रष्टाचार चांगुलपणाचा आणि दुसरा करतो तो भ्रष्टाचार तुरूंगाचा अशा काही बाबी राजरोस समोर येत आहेत. 

      आजकाल नवीन पिढीला बोलीभाषेची लाज वाटते. आपली भाषा बोलायला कमीपणा वाटू लागला. पोट भरण्याची भाषा म्हणजे इंग्रजी असं एक नवं समीकरण निर्माण झालंय. त्यामुळं इंग्रजी भाषेचं प्रमाण अवास्तव वाढलेलं दिसतं. इंग्रजी भाषा शिकणं हा गुन्हा नाही पण बोली- भाषेचा तिरस्कार करून तिचा अपमान करून जर कोणी इंग्रजी भाषा शिकत असेल तर तो अप्पलपोटेपणा आहे असं म्हणावं लागेल. म्हणून शासनानं इंग्रजीसोबत बोलीभाषा शिकवायचं शाळेत सक्तीचं करायला हवं. ”इंग्रज गेले पण भाषेचं शेपूट ठेवून गेले” अशी अवस्था भारतीयांची झाली आहे. जपानसारख्या प्रगत देशात देखील इंग्रजीसोबत मातृभाषेला महत्व दिलं आहे आणि तिथलं शिक्षण देखील मातृभाषेतच दिलं जातं. अहिराणी भाषा या पुस्तकामुळं पहिल्यांदा वाचनात आली.

  ‘दिवाळी’ हा शब्द “देव-अली” या शब्दाचा अपभ्रंश होऊन निर्माण झाला आहे. यामुळे हा सण हिंदूंचा जितका आहे तितकाच मुस्लिम लोकांचा आहे. तसेच रमजान ईद यांमध्ये राम, हा शब्द / नाव आहे. त्यामुळं हा सण देखील दोन्ही धर्म साजरा करू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी दोन धर्मांशी मिळत्या जुळत्या आहेत, असं मला वाटतं.

       फास हा शब्द आठवला की आपल्या गळ्याभोवती अडकवलेली दोरी आठवते. पण याचे अनेक अर्थ होतात. प्रत्येक भारतीय तो कोणत्याही धर्माचा- जातीचा असो, त्याला वैचारिक फास असतोच. त्यामुळं काही ठिकाणी भलं होतं, काही ठिकाणी नुकसान होतं. जसं मी कोण्या जातीचा? कोण्या धर्माचा? कोणत्या परंपरेचा? हा देखील फासच. त्यामुळं व्यक्ती वैयक्तिक आणि सरकार देशाचा विकास करू शकत नाही. त्यासाठी आपण फक्त भारतीयच असण्यासोबत ‘मानव’ही असायलं हवं! हा वैचारिक फास आजच्या पिढीला अत्यंत गरजेचा आहे.

‘पर्यावरण दिन’ साजरा करण्यामागं चांगला हेतू आहे. बरेच जण आता वृक्ष लागवड करीत आहेत. जनजागृती होत आहे.  हुंडा घेणं- देणं गुन्हा आहे. कायदा महत्त्वाचा आहेच, पण लग्नांत अफाट पैसा खर्च केला जातो, मुलीचं लग्न कमी खर्चात व्हायला हवं. मुलीनं स्वावलंबी असलं पाहिजे. मुलीनंही आईबापांच्या ऋणात असायला हवं कायम. केवळ आपल्या संसारात गुंग होऊ नये.

     आज शासकीय साहित्य संमेलनं आयोजित होतात पण लोकांचा यामध्ये कितपत सहभाग आहे याचा विचार करायला हवा. मी ९५ वं साहित्य संमेलन पाहिलं. संमेलनात सांगणारेच खूप, ऐकायला कोणीही नाही. संमेलनात एकूण ४२ समित्या होत्या. त्यामध्ये ‘श्रोता समिती’ या समितीची भर टाकायला हवी होती. तसेच दिवसभर इतके भरगच्च कार्यक्रम की सर्वसामान्य प्रेक्षक भांबावून जातो. जावं तरी कोणत्या सभागृहात? त्यामुळं साहित्य संमेलन पंधरा दिवसाचं असलं तर एकावेळी एकच कार्यक्रम मनापासून ऐकता येईल असं मला वाटतं.

      आजपर्यंत मी महात्मा गांधी यांच्याबद्दल लोकांनी जितका आदर केलेला पाहिलाय तो कोणाबद्दलच नाही. पण अलीकडे काही राजकीय पक्ष- संघटना दहशतवाद्यांना हिरो मानायला लागलीत की काय अशी शंका येते. म्हणून इतक्या थोर हिंदू नेत्याची हत्त्या करणार्‍या माथेफिरू दहशतवादी गोडसेला जे लोक चांगलं म्हणतात ते देशद्रोहीच ठरतात. जनता गांधीजींचा आदर यासाठी करते की, बापूजींसारखा त्यागी देशसेवा करणारा नेता पुन्हा होणं नाही.  फाळणीच्या वेळी म्हणजेच स्वातंत्र्यावेळी महात्मा गांधी नसते तर आज आपला देश कितीतरी तुकड्यांत वाटला गेला असता. 

  आजकाल बरेच जण वाचायला वेळ नाही म्हणण्याऐवजी वाचायला आवडत नाही असं मी ऐकत आली आहे. उलट मलाच सुनावतात ‘कामधंदा सोडून हा काय रिकामटेकडा धंदा?’ पण मला त्याचं काही वाटत नाही. कारण लोकांना कुठं तरी ‘काळा डाग’ दिसतोच. पुस्तक वाचायचं कारण म्हणजे जग कसं आहे? याची माहिती मला घरबसल्या मिळते. तसंच जगात कुठं  आतापर्यंत काय घडलं याची विस्तृत माहिती मिळते. ज्याला खरंच एकटेपणा वाटत असेल त्यांनी फक्त पुस्तकांशी मैत्री करावी असं माझं ठाम मत आहे.

  डॉ. सुधीर देवरे सरांच्या ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ या पुस्तकात विविध विषय ‍चर्चिले गेले आहेत. हे पुस्तक म्हणजे प्रबोधनाचा वैचारिक खजिनाच वाटला मला. वाचून होताच पुस्तकाच्या निमित्ताने त्या त्या विशिष्ट विषयांवर मी माझे काही विचार स्वतंत्रपणे या लेखात मांडले आहेत. विचारांना चालना देणारं हे मार्गदर्शक पुस्तक असल्यानं प्रत्येकानं वाचावं असं मला वाटतं.

…. 

पुस्तक : ब्लॉगच्या जाळ्यातून जग 

लेखक : डॉ. सुधीर राजाराम देवरे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. पुणे- ३०

पृष्ठ संख्या : २९२, किंमत : ४२० रूपये

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!