गोवा 

‘​शू​न्यातून विश्व निर्माण करणारा शिक्षणतज्ञ किमयागार’

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर ):
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहेच त्याचप्रमाणे विद्यादान हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. ​उत्तम काशिराम कोटकर यांनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पाठबळाने पेडण्यात श्री भगवती शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना करुन त्यांनी पेडणेकरांच्या दारी शिक्षणाची आणि ज्ञानाची गंगाच सर्वसामान्य, कष्टाळू कुटूंबियांच्या दारी नेली. शुन्यातून विश्व निर्माण करणारा शिक्षणतज्ञ किमयागार” असे कोटकरांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हणावे लागेल. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर उच्च पदावर पोहोचले. शैक्षणिक कार्याबरोबरच, सामाजिक, सांस्कृतिक व नाट्य चळवळीत ते अग्रणी होते.

श्री रवळनाथ स्पोर्ट्स् आणि कल्चरल क्लब, माऊसवाडा, पेडणे यांनी कै. उत्तम कोटकर यांचे ऋण फेडण्यासाठी पेडण्यात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर आयोजीत करुन ख-या अर्थाने कोटकरांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कोटकरांचे नाव सतत लोकांच्या स्मरणात रहावे, यासाठी त्यांच्या नावाने दरवर्षी एखादी शैक्षणिक स्पर्धा आयोजित करावी. मी आणि माझी मुलेही त्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी होतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ” असे प्रतिपादन लेखा खात्याचे निवृत्त उप-संचालक आनंद एम. नाईक यांनी श्री रवळनाथ स्पोर्ट्स् आणि कल्चरल क्लब, माऊसवाडा, पेडणे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना काढले.

व्यासपिठावर आनंद नाईक यांच्या सोबत प्रसिद्ध चित्रकार, लोकविश्वास प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आणि माजी शिक्षक पी.ए. सुर्यवंशी, व्हायकाउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक केशव पणशीकर व श्री रवळनाथ स्पोर्ट्स् क्लबचे अध्यक्ष नरहरी पेडणेकर उपस्थित होते. पारंपारिक समई प्रज्वलीत करुन व कै. उत्तम कोटकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रक्तदान शिबीराचे उद् घाटन करण्यात आले. आनंद नाईक यांनी सदर क्लबने कोरोना काळात केलेल्या महत्वपुर्ण सामाजिक कार्यांचे व त्याच्या कार्यकर्त्यांचेही तोंडभरुन कौतुक केले. पी.ए.सुर्यवंशी यांनी रक्तदानाबरोबरच देहदानही करण्याचे सर्वाना आवाहन केले. कै. उत्तम कोटकर यांचे सुपुत्र प्रविण कोटकर व डाॕ. राहूल सुर्यवंशी यांनीही या रक्तदान शिबीरात मोलाचे सहकार्य केले. केशव पणशीकर व राजेंद्र बोंद्रे यानीही उद्घाटन प्रसंगी आपले मौल्यवान विचार प्रगट केले. या प्रसंगी एक मिनिटाची स्तब्धता पाळून कोटकर यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

पुष्पगुच्छ देऊन व्यासपिठावरील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नरहरी पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात नवीन रक्तदात्याना स्फूर्ती यावी यासाठी पन्नास वेळा रक्तदान केलेल्या संदीप राणे आणि पंचवीस वेळा रक्तदान केलेल्या शेखर पार्सेकर या पेडण्यातील दोन तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या रक्तदान शिबिरात एकंदर ५१ जणांनी आपले रक्तदान करुन सामाजिक जबाबदारी पार पाडली. या प्रसंगी डिस्ट्रिक हाॕस्पिटल, म्हापसाच्या डाॕक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कौशल पेडणेकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष नरहरी पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: