गोवा 

”तो’ पर्यंत बंद करा ऑनलाईन शिक्षण’

पणजी:
राज्यातील विद्यार्थ्यांना इंटरनेट जोडणीची समस्या जाणवणे बंद होईपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद ठेवावे. सरकारने मोबाईल मनोऱ्यांची व्यवस्था सरकारी जमिनींवर गावागावात करावी. शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्याचे प्रशिक्षण द्यावे, गरजू विद्यार्थ्याना मोफत स्मार्टफोन उपलब्ध करावेत यासाठीच्या आंदोलनास महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आजपासून सुरवात केली. मगोने आज मुख्यमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालकांना तसे निवेदन सादर केले.

मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले, या मागणीच्या पाठपुराव्यासाठी विधानसभा अधिवेशनाआधी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येईल अशी आश्वासने दिली होती. त्याची पू्र्तता केलेली नाही. विधानसभा आश्वासन समितीची दोन वर्षात बैठक झालेली नाही. त्यामुळे लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय़ उपस्थित करणार आहे. सभापतींनी त्याला परवानगी नाकारली तर सभापतींसमोरील हौद्यात बसकण मारणार आहे.

भाजपच्या राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ केला आहे. विद्यार्थी रानावनात, डोंगरावर, झाडांवर चढून शिकत आहेत. दीड वर्षात दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून ही वेळ आली आहे. विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती सरकारने लादली आहे. याविषयी पक्षाचे सरचिटणीस रत्नकांत म्हार्दोळकर आदींनी सर्वांना निवेदने दिली आहेत. तालुका पातळीवरील उपजिल्हाधिकाऱ्यांना मगोचे पदाधिकारी निवेदने देतील. त्यात आणि पणजीतील आंदोलनात पालकही सहभागी होऊ शकतील. यावेळी मांद्रेतील मगोचे नेते जीत आरोलकर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: