google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

‘एकवीस स्वर्ग उंच, त्याहून तू वरती’

– डॉ. सुधीर रा. देवरे

महात्मा गांधीबद्दल खरा इतिहास सांगण्याऐवजी अलीकडे जाणून बुजून अफवा पसरवण्यात येत आहेत. नवीन पिढी आणि काही वयस्क लोकही अभ्यासाशिवाय पसरवलेल्या (सोशल मीडिया) अफवा खर्‍या मानू लागल्याचे लक्षात येते. अशा भाबड्या लोकांसाठी (सत्य) आहे तेच सांगण्याचा प्रयत्न.

भगवान महावीर आणि महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्रातील थोडासा अंश जरी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडेल. आजचा हिंसाचार, संग्रह – साठेबाजी करण्याच्या, ओरबाडून घेण्याच्या, नफेखोर प्रवृत्तीमधून बाहेर पडायचे असेल तर भगवान महावीर व महात्मा गांधीजींच्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनर्थदंड या तीन तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. गांधी संत नव्हते, परंतु ते संतप्रवृत्ती असलेले विश्वातील महान व्यक्त‌िमत्व होते. त्यांचे जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या औचित्याने (२ ऑक्टोबर २०२३) त्यांच्या जीवन चरित्रावर आजचे हे भाष्य.

मोहनदास यांचे वडील (करमचंद गांधी) पश्चिम ब्रिटिश भारतातील (आताचे गुजरात राज्य) एका छोट्या संस्थानाची राजधानी असलेल्या पोरबंदरचे मुख्यमंत्री- दिवाण होते. गांधी हे कुटुंब एक वैभव संपन्न वैष्णव कुटुंब होते. लहानपणी श्रावणबाळ आणि हरिश्‍चंद्राच्‍या कथांनी मोहनदास यांच्यावर सत्याचे संस्कार झाले. सत्याचे महत्त्व त्यांना याच कथांतून समजले. आई पुतळाबाई या अतिशय धार्मिक स्त्री होत्या. मोहनदास वैष्णव धर्मात वाढल्याने हिंदू दैवत विष्णूची पूजा करायचे. तसेच अहिंसेवर विश्वास ठेवणार्‍या जैन धर्माचा पगडाही त्यांच्यावर लहानपणापासून होता. अहिंसेचे पालन करत, इतरांना इजा न करता ते लहानाचे मोठे झाले. उपवास, शाकाहार आणि लोकांच्या वेगवेगळ्या धर्मांमधील सहिष्णुता यासारख्या आत्म-शुद्धीशी संबंधित अनेक पद्धतींचा अवलंब त्यांनी आपल्या जीवनात केला.

मोहनदास गांधींचे शालेय शिक्षण गुजरातच्या पोरबंदरमधील प्राथमिक शाळेत सुरू झाले. १८८७ मध्ये बॉम्बे विद्यापीठात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गांधी भावनगरच्या समलदास कॉलेजमध्ये दाखल झाले. गांधींना डॉक्टर व्हायचे होते. पण त्यांनी वकील व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यावेळी इंग्लंड हे शिक्षणाचे केंद्र होते. गांधींना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय झाला. हिंदुंनी समुद्र उल्लंघन करू नये अशा पारंपरिक तत्कालीन समजुती होत्या. म्हणून सुरूवातीला परदेशी पाठवायला आईचा विरोध होता. विदेशात पाठवण्यापूर्वी त्यांच्या आईने एका संताकडून ‘मद्य पिणार नाही, परस्त्रीगमन करणार नाही, मांसाहार करणार नाही’ या तीन शपथा त्यांना दिल्या. त्यांना घडविणारी त्यांची आई होती. लहानग्या मोहनदासच्या मनात श्रद्धा आणि निर्भयता या दोन गोष्टी पेरण्याचे काम त्यांनी केले. सप्टेंबर १८८८ मध्ये ते लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. १८९० मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठात मॅट्रिकची परीक्षा दिली. लंडनमध्ये त्यांनी अनेक परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथल्या जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित केले. इंग्लंडमध्ये त्यांनी एडवर्ड कारपेंटर, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि अॅनी बेझंट सारख्या प्रमुख समाजवादी, फॅबियन आणि थिओसॉफिस्टची भेट घेतली.

mahatma gandhi

१८९४ मध्ये ते २५ वर्षांचे असताना दक्षिण आफ्रिकेत डर्बनला गेले. या काळातही सर्वात गरीब आणि उपेक्षित लोकांना मदत करण्यात गांधी नेहमीच उत्साही होते. दक्षिण आफ्रिकेत ते वकील म्हणून काम करू लागले. तिथे वंश आणि रंगावरून माणसांत फरक करत वंशभेद पाळला जात होता. म्हणून गांधींनी १८९५ मध्ये तिथे नॅटल इंडियन काँग्रेस सुरू केली. यामुळे या परिसरात राहणार्‍या विविध भारतीय आणि काळ्या लोकांना एकत्र आणून ते नेहमी त्यांच्या बाजूने लढायचे. गांधी तिथल्या समाजात एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्यामुळे अनेक भारतीयांचे जीवन सुधारण्यास मदत झाली. एकदा त्यांना स्वत:लाच वंशभेदाच्या घटनेला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या पहिल्या डब्यातून प्रवास करताहेत म्हणून त्यांना बळजबरीने बाहेर ढकलण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील राणी व्हिक्टोरियाच्या वसाहतींपैकी एका वसाहतीमध्ये ते राहत होते. त्यांच्या घराचे नाव त्यांनी ‘लिओ टॉलस्टाय’ ठेवले होते. टॉलस्टाय ह्या रशियन लेखकाचे लेखन वाचून गांधींनी त्यांना मनोमन गुरू मानायला सुरूवात केली.

गांधींनी त्यांच्या आयुष्यातील २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जिथे त्यांनी त्यांचा राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि नेतृत्व कौशल्य विकसित केले. ९ जानेवारी १९१५ च्या सकाळी गांधी भारताच्या अपोलो बंदरात उतरले. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गांधी १८९४ ला दक्षिण अफ्रीकेत गेले होते, त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. भारतात परतले तेव्हा ते ४५ वर्षांचे अनुभवी वकील झाले होते. भारतात आल्यावर भारताबद्दलची सर्व माहिती पुरवली म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांना ते राजकीय गुरू मानू लागले. भारताचा म्हणजे भारतातल्या लोकांचा जवळून परिचय व्हावा म्हणून त्यांनी रेल्वेने जनरल डब्यातून भारतभर प्रवास करून देश जाणून घेतला. यावेळी भारतीयांचे दारिद्रय त्यांनी जवळून पाहिले. महिलांना पूर्ण अंग झाकण्याइतके कपडे नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी आपला पोषाख त्यागून पंचा परिधान करत अर्धनग्न राहू लागले व चरखा चालवून खादी निर्माण करू लागले. भारतीय राजकारणात आल्यावर ‘गांधी म्हणजे राजकारणातले संत आणि संतांतले राजकारणी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

गांधींनी अहिंसक प्रतिकार किंवा सत्याग्रहाचे मार्ग अवलंबले. यामुळे त्यांच्याबद्दलची लोकांची धारणा बदलण्यास मदत झाली. ते इतरांसाठी एक प्रेरणा बनले. लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत झाली. गांधींच्या जीवन-संघर्षाच्या विशिष्ट कृतींनी जगातील लोकांवर सकारात्मक परिणाम झाला. एखाद्याच्या महानतेची जाणीव झाली की त्याचा आदर्श लोकांना प्रभावित करतो. गांधींचे जीवन आणि कार्य देदीप्यमान होते. ब्रिटीशांविरूध्द स्वत:ला क्लेश करून उपोषण करत केलेल्या निशस्त्र आंदोलनांमुळे सरकारला त्यांच्याविरूध्द अतिरेकी दंडेलशाही करता येत नव्हती. तरीही गांधींना अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्या सभांवर लाठीमार- गोळीबार करत अनेक सभा उधळून लावल्या.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक झालेल्या गांधींना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी  “राष्ट्रपिता” ही पदवी दिली. ४ जून १९४४ रोजी सिंगापूर रेडिओवरील प्रक्षेपणात बोस यांनी गांधींचा उल्लेख “राष्ट्रपिता” असा केला. गांधींच्या आदर्शवाद आणि मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे भारताला ब्रिटीश राजवटीविरूध्दच्या स्वातंत्र्य चळवळीला संजीवनी मिळाली. नंतर ६ जुलै १९४४ रोजी रेडिओ रंगूनवर संदेश प्रसारित करतानाही नेताजींनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेने’त ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ नावाच्या बटालियन सुरू करून गांधी व नेहरू यांच्या कार्याचा गौरव केला. गांधींना ‘महात्मा’ या नावाने पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले. मोहनदास करमचंद गांधींना महात्मा, राष्ट्रपिता आणि बापू या नावांनी लोक ओळखतात. बापूचा अर्थ ‘पिता’ असा होतो.

भारताच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे गांधी मानत. ब्रिटीशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी आयुष्य पणास लावले. भारताबाहेरील अनेक देशांतल्या व्यक्तींवरही त्यांचा प्रभाव होता, अजूनही आहे. गांधींनी मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही प्रभाव टाकला. परिणामी आफ्रिकन- अमेरिकनांना आता समान अधिकार आहेत. भारताचे स्वातंत्र्य शांततेने जिंकून त्यांनी जगभरातील इतिहासाचा मार्ग बदलला. भारतात दलितांना मानसन्मान मिळावा म्हणून अनेक दृष्टीकोन दिले, स्वत: स्वच्‍छतेला वाहून घेतले. ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकतावादी होते. ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग पत्करला होता. शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सलग तीन वर्षे त्यांच्या नावाचा विचार होत होता पण इंग्रजांच्या विरोधामुळे तो सन्मान त्यांना मिळाला नाही. नंतर त्यांच्या काही शिष्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

mahatma gandhi

गांधीजींबद्द्ल जगप्रसिद्ध विचारवंत आईनस्टाईन म्हणतात, ‘महात्मा गांधीजींसारखा हाडामांसाचा असाही माणूस या पृथ्वीवर होऊन गेला, यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. (हा मनुष्य पंधराव्या शतकात जन्माला आला असता तर आज लोकांनी त्यांना देवाचा अवतार मानले असते.) गांधी यांची तुलना करायची झाली तर भगवान महावीर, गौतम बुध्द अशा धर्मसंस्थापकांशी करावी लागेल. विसाव्या शतकात सामान्य माणसाप्रमाणे या भुतलावर वावरणारा हा महान मनुष्य ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला त्या लोकांना सुदैवी म्हणावे लागेल. गांधींच्या ‘माणुसकी’च्या महान शिकवणुकीमुळेच भारताच्या तत्कालीन नेत्यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली होती. बालपण श्रीमंतीत गेले असले तरी ते चळवळीत पुढे विरक्त होत गेले. त्यांची पत्नी कस्तुरबा यांनी आयुष्यभर या चळवळींना साथ दिली. २२ फेब्रुवारी १९४४ ला कस्तुरबांच्या मृत्यूनंतरही गांधींनी आपले कार्य सुरू ठेवले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा गांधीवादी नेहरूंसारख्या प्रगल्भ व विज्ञाननिष्ठ नेत्याकडे गेली. म्हणून भारताची धर्मनिरपेक्ष लोकशाही भक्कम होत आजपर्यंत टिकून राहिली. पुढे लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी आदींनी भारताची निधर्मी प्रतिमा यशस्वीरित्या सांभाळली.

महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशा त्यावेळच्या अनेक नेत्यांना वैयक्तीक महत्वाकांक्षा नव्हती. आपल्या खाजगी आयुष्यासह काहींनी खाजगी मालमत्ताही देशाला अर्पण केली होती. तत्कालीन काही मतभेद असले तरी त्यांनी एकमेकांविरूध्द व्देष पसरवला नाही. मतभेद देशहितासाठी होते हे एकमेकांना ज्ञात होते.

बॅरिस्टर महमद अली जिना हे सुरूवातीला पुरोगामी विचाराचे होते. पण ब्रिटीशांनी त्यांच्या डोक्यात व्दिराष्ट्रवादाचा किडा सोडताच त्यांच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि ते धर्मांधळ्याचा मुखवटा घालून हैदोस घालू लागले. यातूनच भारतभर हिंदू- मुस्लीम दंगली उसळू लागल्या आणि जिना वास्तवापेक्षा कारणाशिवाय मोठे झाले. पाकिस्तानच्या मागणीवर ते ठाम होते. त्यांनी भडकवलेल्या दंगली थांबता थांबत नव्हत्या. गांधींसह भारतीय नेत्यांनी त्यांना स्वतंत्र पाकिस्तान न देता भारताचे पंतप्रधानपद दिले असते तरी पुढे लवकरच भारताचे अनेक तुकडे झाले असते. याचे कारण भारत- पाकिस्तान ब्रिटीशांपासून स्वतंत्र होऊन एक वर्षाच्या आत जिना वारले. (त्यांचा आजार त्यांनी लपवून ठेवला होता.) त्यांच्या मृत्यूनंतर केवळ व्दिराष्ट्रवाद नव्हे तर इथे अनेकराष्ट्रवाद फोफावला असता. उदा. त्यानंतरचे लाल डेंगा, सुभाष घेशींग (पूर्वोत्तर), भिद्रनवाले (खलिस्तानवादी) आदींचा उल्लेख करता येईल. (याच कारणामुळे १९७१-७२ च्या युध्दात पाकिस्तान तोडूनही इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तान भारतात सामील न करता त्याला स्वतंत्र ‘बांगला देश’ म्हणून मान्यता दिली.) या पार्श्वभूमीवर ‘अखंड भारत’ नावाची संकल्पना आज अतिशय तकलादू पायांवर उभी आहे.

सगळ्यात भयानक म्हणजे ब्रिटीशांनी भारतीय नेत्यांना स्वातंत्र्य बहाल केले नव्हते, तर भारतातील पारंपरिक अनेक राजे व संस्थानिकांना ते बहाल केले होते. ब्रिटीशांनी संस्थानिकांपुढे तीन पर्याय ठेवले होते. त्यांनी एकतर भारतात, पाकिस्तानात अथवा स्वतंत्र देश म्हणून रहायचे होते. याचा अर्थ गांधींच्या हातात अखंड भारत राखण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. तो अधिकार ब्रिटीशांनी जिनांना दिला होता. संस्थानिकांशी व्यक्तीगत संपर्क साधून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेव्हा जास्तीतजास्त भाग (५६० संस्थाने) भारतात विलीन केली. (ब्रिटीश अंमल पूर्णपणे संपल्यानंतर सैन्य कारवाई करून काही स्वतंत्र संस्थाने विलीन करावी लागली.) यावेळी माणुसकीला काळीमा फासणार्‍या भडकलेल्या क्रूर दंगली शांत करणे एवढेच अनुकंपाचे महत्वपूर्ण काम महात्मा गांधींनी हाती घेतले होते. दंगली थांबाव्यात म्हणून गांधी उपोषण करत होते.

५५ कोटी ही रक्कम पाकिस्तानला इंग्रजांमुळे देणे भाग होते. भावांची वाटणी झाली की घरातली गंगाजळीचीही विभागणी होते, त्याप्रमाणे ही रक्कम द्यावीच लागणार होती. (इतकेच काय पाकिस्तानच्या निर्मितीनंतर काही काळ पाकिस्तानचे चलन भारतात छापले जात होते. भारत स्वतंत्र होताच पाकिस्तानकडून काश्मीरवर पहिले आक्रमण होऊन प्रश्न युनोत नेऊन गुंता करण्यामागेही ब्रिटीश होते. याचे कारण तोपर्यंत भारत- पाकिस्तान सैनिकांच्या प्रमुखपदीही ब्रिटीश होते. भारत – पाकिस्तानचे व्यवस्थापन ब्रिटीश करत होते.) भारताचे शेवटचे व्हाइसराय लॉर्ड माउंटबेटन हे स्वातंत्र्यानंतरही वर्षभर दोन्ही देशांवर दबाव ठेऊन होते.

गांधींचा मृत्यू ही एक खूप दुःखद घटना होती. ३० जानेवारी १९४८ ला संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास गांधी घराजवळच्या बागेत नेहमीप्रमाणे प्रार्थनेला गेले. तेव्हा परधर्मीय वेशभुषा केलेला नथुराम गोडसे नावाचा कपटी- फॅसिस्ट- वंशाभिमानी- विकृत- अडाणी- सायको- देशद्रोही- दहशतवादी गर्दीतून अचानक बाहेर आला आणि या निशस्त्र वृध्द महान हिंदू नेत्यावर- महात्मा गांधींवर त्याने तीन गोळ्या झाडल्या. गांधींनी ‘हे राम’ म्हणत प्राण सोडला.

mahatma gandhi

महात्मा गांधी यांच्या आंदोलनांत महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परंतु स्वत:ला उच्चभ्रू व धर्मात वरच्या पायरीवर समजणारे लोक या महानायकासोबत- गांधींसोबत नव्हते. कारण गांधी हा बहुजनातला बनिया माणूस होता. मानसिक न्यूनगंडात रूतलेल्या अशाच एकाने गांधींचा गोळ्या झाडून खून केला. हा खूनी महाराष्ट्रीयन असल्याने तेव्हापासून महाराष्ट्राची मान लज्जेने खाली गेली. देशातल्या लोकांना महाराष्ट्रीयनांवर विश्वास राहिला नाही. म्हणून योग्यता असूनही महाराष्ट्राला अजून देशाचे नेतृत्त (पंतप्रधानपद) मिळाले नाही.

महात्मा गांधींचे ग्रंथ आणि गांधींविषयी तटस्थ लेखकांनी लिहिलेले ग्रंथ वाचकांनी जरूर वाचावे, ते शक्य नसेल तर किमान अॅटनबरो यांचा ‘गांधी’ सिनेमा जरूर पहावा. गांधीजींचे संपूर्ण जीवन आपल्याला खूप मोठा संदेश देणारे आहे.

गांधींचा शारीरिक पातळीवर खून करणारे लोक आज पुन्हा ‘गांधी विचार’ पुसण्याचा प्रयत्न जाणूनबुजून करताना दिसताहेत. ‘फुटूच लागतात पंख’ या माझ्या कवितासंग्रहातल्या ‘गांधी’ कवितेने लेख संपवतो-
‘‘तुझ्या मागं
उभा नाही
कोणताही धर्म.
उभी नाही
तुझ्या मागं
कोणतीही जात- जमात
आणि वोट बँकसुध्दा.
तुझ्या नालस्तीनं
भावना दुखावून
रस्त्यावर उतरणार नाही
कोणताही  
प्रचंड मॉब.
वीतभर अंतरावरुन
आम्ही गोळ्या झाडतो  
तरी तू मरत नाहीस.
तुला विदुषक रंगवून
आम्ही नाटकं करतो
तरी तू संपत नाहीस.
तुझ्या मारेकऱ्याची
मंदिरं बांधून पाहिली
तरी शमत नाही आमच्या
मस्तकातला शूळ…
तुला
आठवावं लागतं रोज
शिव्या देण्यासाठी का होईना
असा
‘एकवीस स्वर्ग उंच
त्याहून तू वरती’
वैश्विक धर्माचा प्रेषित!
कशावरही उभं राहून-
तुझ्यापर्यंत
पुरत नाही आमचा हात…’’  
*

ताजा कलम : काही ठळक आणि महत्वाचे :
गांधींच्या भारतातील महत्वाच्या सामाजिक व राजकीय चळवळी पुढील प्रमाणे सांगता येतील :
1.चंपारण आणि खेडा आंदोलन
2.खिलाफत चळवळ (1919-1924)
3.असहकार चळवळ (1919-1920)
4.सरकारी महाविद्यालयांवर बहिष्कार
5.सरकारी न्यायालयांवर बहिष्कार
6.परदेशी मॉल्सवर बहिष्कार
7.1919 च्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुकांवर बहिष्कार
8.चौरी चौरा आंदोलन (1922)
9.सविनय कायदेभंग चळवळ
10. दांडी यात्रा – मीठ आंदोलन (1930)
11. भारत छोडो आंदोलन (1942)

गांधींनी १९३० मध्ये दांडी मार्चचे नेतृत्व केले. साबरमती आश्रमापासून दांडी या किनारपट्टीच्या शहरापर्यंत एक निषेध मोर्चा काढला. ते आणि त्यांचे अनुयायी ब्रिटीश कायद्याचे उल्लंघन करण्यास आणि ब्रिटीश व्यापार्‍यांशी व्यापार करण्यास नकार देण्यास पोचले. १२ मार्च १९३० रोजी शेकडो भारतीयांसह दांडी यात्रेने दांडी येथे जाऊन, मुठभर मीठ उचलून भारतीय मीठ कायद्याचे त्यांनी मुद्दाम उल्लंघन केले. ही प्रतिकात्मक घटना अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण होती. हा मोर्चा यशस्वी झाला आणि अखेरीस इंग्रजांनी गांधींशी करार केला. १९४२ ला ‘भारत छोडो आंदोलन’ असेच सर्वव्यापी झाले आणि स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला.

गांधींचे शिक्षणातील योगदान : महात्मा गांधींचे शिक्षणातील योगदान समजून घेण्यापूर्वी त्यांचे शिक्षणाबद्दलचे विचार समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे :
१. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे.
2. अनुभवातून शिक्षण दिले जावे.
3. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी नको केवळ मातृभाषा असावी.
4. यंत्रमाग, उद्योग, हस्तकला इत्यादींमध्ये शिक्षण दिले जावे, ज्यामध्ये शेती, लाकूडकाम, सूतकाम, विणकाम, मत्स्यपालन, बागकाम, मातीकाम, चरखा इत्यादींचा समावेश असेल. (काळानुरूप काही बदल आवश्यक.)

गांधीजींनी स्वावलंबी बनवण्याच्या शिक्षणावर अधिक भर दिला, जेणेकरून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल आणि व्यक्ती स्वतःच्या बळावर आयुष्यात पुढे प्रगती करू शकेल. त्यामुळे त्यांच्याकडे मूलभूत शिक्षण पद्धतीचे जनक म्हणून पाहिले जाते.

गांधींनी लिहिलेली पुस्तके : गांधी एक तेजस्वी स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी तसेच प्रतिभासंपन्न लेखक होते. आरोग्य, धर्म, सामाजिक सुधारणा, ग्रामीण सुधारणा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील त्यांचे लेखन वाचनीय आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांच्या कार्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले आणि त्यांचे शब्द भारताच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग बनले. गांधींनी इंडियन ओपिनियन, हरिजन, यंग इंडिया, नवजीवन इत्यादी मासिकांमध्ये संपादक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी लिहिलेल्या काही प्रमुख पुस्तकांची नावे खालीलप्रमाणे आहेत :
हिंदी स्वराज (१९०९)
माझ्या स्वप्नांचा भारत
गाव स्वराज्य
दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह
सत्याचे प्रयोग (१९२७)
आरोग्याची गुरुकिल्ली
हे देवा (माझा देव)
माझा धर्म
सत्य हाच देव आहे
आदींसह त्यांच्या अनेक पुस्तकांत ते मानवी समाजाचे सत्य सांगत त्यांची दूरदृष्टीही अधोरेखित करतात.

गांधींच्या घोषणा : ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’चे महान पुरुष गांधी यांनी काही महान विचार रूजवले आणि त्यांच्या काही प्रभावी घोषणा होत्या. काही घोषणा :
आज तुम्ही काय करता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.
करा किंवा मरा. – 8 ऑगस्ट 1942
शक्ती शारीरिक क्षमतेने येत नाही, ती अदम्य इच्छाशक्तीने येते.
प्रथम ते तुमच्याकडे अजिबात दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील, मग तुम्ही नक्कीच जिंकाल.
उद्या मरणार असल्यासारखे जगा, चिरकाल जगायचे आहे असे शिका.
कानांनी ऐकून गैरसमज करू नये.
सत्य कधीही इजा करत नाही.
देवाला धर्म नसतो.
आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही चांगला विचार करता, तुम्ही जे काही बोलता आणि जे करता ते सुसंगत असेल.
अहिंसा परमो धर्म
सत्यमेव जयते
हरिजन सेवा

mahatma gandhi

संदर्भ : १. महात्मा गांधी यांची पुस्तके
२. महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके
३. आंतरजाल
४. लेखकाचे स्व आकलन

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!