गोवा 

गुन्हेगारांवर करणार कठोर कारवाई : मुख्यमंत्री

पणजीः
राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यात पोलिस विभागाची मोठी भूमिका आहे. आम्ही राज्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू करणार आहोत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कोलवाळे पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केलं.

उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड-19 च्या उद्रेका दरम्यान पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. कोविड महामारीच्या गंभीर परिस्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केलेत. या गंभीर काळात गृहखात्याने गोव्याच्या भल्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारने यापूर्वीच पोलीस खात्यातील ९४० रिक्त जागांची जाहिरात दिलेली असून लवकरच २००-२५० हून अधिक रिक्त जागांची जाहिरात केली जाईल आणि ही सर्व पदे सहा महिन्यांत भरली जातील याची खात्री आम्ही देतो. गोवा सरकार गोव्याच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

गोवा क्रांती दिनाच्या या शुभ दिनी गोवा सरकारने राज्यातील दोन नवीन पोलिस स्टेशनच्या इमारतींचं उद्घाटन केलं आहे. तसंच मडगाव येथे असलेल्या मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचं आज कुडतरीत स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले आहेत. शिक्षण क्षेत्रात सरकारने आजपासून कोडिंग आणि रोबोटिक्स सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

या दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी विविध पायाभूत सुविधांचा विकास हाती घेतला आहे आणि कोलवाळे येथे नवीन पोलिस स्टेशनची इमारत बांधण्याची आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असं आमदार निळकंठ हळर्णकर आपल्या भाषणात म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: