गोवा 

‘हे तर भाजपच्या महिला विरोधी संस्कृतीचेच दर्शन’


मडगाव :

कॉंग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना मानाचे स्थान दिले असुन, समाजात महिलांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या पल्लवी भगत यांच्यावर बेजबाबदार आरोप करुन भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी भाजपची महिला विरोधी संस्कृती दाखवली आहे असा सणसणीत टोला महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांनी हाणला आहे.

काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दामू नाईक यांनी कॉंग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांना त्यांनी जारी केलेले पत्रक इतरांनी लेखी स्वरुपात दिले होते असा आरोप केला होता व पल्लवी भगताना राजकारणाचे ज्ञान आहे का? असा प्रश्न विचारला होता त्याचा समाचार घेताना बिना नाईक यांनी भाजपला फैलावर घेतले.

भाजप सरचिटणीस दामू नाईक यांनी पल्लवी भगत यांना ” तथाकथित प्रवक्त्या” असे संबोधुन केवळ त्यांचाच नव्हे तर संपुर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. महिलांना अज्ञानी, मागास व अढाणी समजण्याच्या भाजपच्या मनोवृत्तीचे प्रदर्शन दामू नाईक यांनी केले आहे असे बिना नाईक यांनी म्हटले आहे.

भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी त्वरित पल्लवी भगत व सर्व महिलांची जाहिर माफी मागावी अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.

भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे होते हे पल्लवी भगत यांनी उघड केल्यानेच दामू नाईक यांनी सारवासारव करण्यासाठी लगेच पत्रकार परिषद घेतली. भाजपवाल्यानी हिच तत्परता कोविड महामारीचे गैरव्यवस्थापन, वाढती गुन्हेगारी, किनारी व्यवस्थापन आराखडा, कोळसा हब, पर्यावरण नष्ट करणारे प्रकल्प, म्हादई, शैक्षणिक गैरव्यवस्थापन, कोसळलेली अर्थव्यवस्था यावर सरकारची कान उघाडणी करण्यात दाखविली असती तर आज जनता सुखी झाली असती असे बिना नाईक यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचा वारसदार म्हणुनच विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुत्रे हातात घेतली होती. त्यामुळे पर्रिकरांच्या राजकीय कर्माची फळे त्यांना तसेच भाजपवाले व पर्रिकरांचा वारसा पुढे नेण्याचे सांगणाऱ्यांना भोगावीच लागतील. गोवा लोकायुक्तांनी २१ भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे जे आदेश दिले आहेत त्यातील बहुतेक प्रकरणे स्व. पर्रिकरांच्या कारकिर्दीतली आहेत यावर बिना नाईक यांनी लक्ष ओढले.

केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी स्व. मनोहर पर्रिकरांचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांचे सुडाचे राजकारण, हेकेखोरपणा व गोव्याचा खाण व्यवसाय बंद पाडण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय यावर ही उघड भूमीका मांडणे गरजेचे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: