सातारा 

​बामणोलीत सुरु होणार कोरोना केअर सेंटर

शिवेंद्रसिंहराजेंच्या ​आमदार ​फंडातून ​देण्यात येणार ​निधी

सातारा​ (महेश पवार) :​

जावली तालुक्यातील कसबे बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोना बाधीत रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आ​मदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून बामणोली येथे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यासाठी ४ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.

​​

कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले असून उपचाराविना रुग्ण दगावत आहेत. कसबे बामणोली हा जावली तालुक्यातील अतीदुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. बामणोली परिसरातील अनेक गावे दुर्गम असल्याने या भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपचाराची सोय व्हावी, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आग्रही होते. शासनाकडे निधी नसेल तर यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ३० एप्रील २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना लेखी पत्र पाठवून बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याबाबतचा परिपुर्ण प्रस्ताव तयार करुन त्वरीत जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे पाठवण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही बामणोली येथे कोव्हीड केअर सेंटर सुरु करावे आणि त्यासाठी आमदार फंडातून निधी घ्यावा, अशी सूचना केली होती.

shivendrasigh  bhosle
शिवेंद्रसिंहराजे भोसले

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रस्तावित सुचनेनुसार कसबे बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार फंडातून कोव्हीड केअर सेंटर उभारणी करणे, त्यासाठी लागणारी सर्वप्रकारची यंत्रसामुग्री, साहित्य, ऑक्सिजन सिस्टीम, औषधे आणि वैद्यकीय टीम उपलब्ध करुन देणे या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या फंडातून ४ लाख ८२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत येत्या दोन- तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्र येथे कोव्हीड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार असून हे सेंटर लवकरच सुरु होणार आहे. यामुळे बामणोली आणि परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना कायमस्वरुपी उपचाराची सोय उपलब्ध होणार आहे. बामणोली परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली असून याबद्दल बामणोली आणि परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बामणोलीला रुग्णवाहिका, सोमर्डीला वैद्यकीय पथक ​देण्याची मागणी ​

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगून बामणोलीसाठी कायमस्वरुपी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. तसेच सोमर्डी येथे रुग्ण तपासणी आणि लसीकरण करण्यासाठी पुर्णवेळ वैद्यकीय पथक नेमा, अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. पाटील यांनी या दोन्ही मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: