गोवा 

गोव्यात मिळणार नाही उद्यापासून लस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

पणजी :
देशभरातील १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस (corona vaccines) घेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यासाठी विविध राज्यांनी ऑनलाईन नोंदणी सुद्धा सुरु केली. गोव्यामध्ये सुद्धा मोठ्याप्रमाणात तरुणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. पण राज्यातील १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. कारण १ मेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून गोव्यात अद्याप लस उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिपनुसार, ‘राज्याला सिरमकडून लस मिळणार होत्या. पण आजअखेरपर्यंत राज्याला सदर लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे उद्यापासून सुरु होणारे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर त्यामुळे गर्दी करू नये. जेव्हा राज्याला लसींचा पुरवठा होईल तेंव्हा राज्यातील रुग्णालये, कम्युनिटी सेंटर आदी ठिकाणी नोंदणी करून लवकरच लसीकरण सुरु होईल.’ असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर राज्यातील नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले असून, सदर व्हिडीओखाली मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असतानाही आणि गेल्या महिनाभरात ३०० हुन अधिक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेलेला असताना मुख्यमंत्री लसीकरणाबद्दल असे आवाहन कसे करू शकतात? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर राज्यातील विरोधी पक्षानेही टीका केली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘असंवेदनशील, बेजबाबदार आणि सदोष’ अशा शब्दात ‘ट्विट टीका’ केली असून, ‘गोव्याला सिरम कडून कोविड लस पाहिजे आहे. गोव्याला ‘कोरोनाडेथ डेस्टिनेशन’ करण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची खाली करावी’ अशी मागणीही त्यांनी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अदूर पुनावाला यांना टॅग केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: