देश-विदेश

बनावट ‘रेमडेसिवीर’ची निर्मिती; विहिंप नेत्यांविरोधात गुन्हा

जबलपूर :
बनावट रेमडेसिवीर (Remdesivir) घोटाळ्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या जबलपूर विभागाचे अध्यक्षासह अन्य दोघांविरोधात जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १ लाखांहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात पोलिसांनी यापूर्वी सुरतजवळील एका फार्म हाऊसमधून दोघांना अटक केली होती. या ठिकाणाहून मीठ आणि ग्लुकोजपासून बनविलेले एक लाखांहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते.
सरबजित सिंग मोखा, देवेंद्र चौरसिया आणि स्वपन जैन अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलम आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जबलपूरचे अतिरिक्त एसपी रोहित काशवानी यांनी दिली.
जबलपूर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले सरबजित सिंग मोखा हे सिटी हॉस्पिटलचे मालक आहेत. देवेंद्र चौरसिया त्यांचे मॅनेजर म्हणून काम पाहतात, तर स्वपन जैन हे फार्मा कंपन्यांची डिलरशिप सांभाळतात. स्वपन जैन यांना सुरत पोलिसांनी अटक केली आहे, तर मोखा आणि चौरसिया अद्याप फरार आहेत.
मोखा हे मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदोर येथून ५०० बनावट रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन्स घेऊन ती रुग्णालयात ३५ ते ४० हजारांपर्यंत विकली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, इंदोर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या ११ जणांपैकी सहा जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात (एनएसए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अनेकांनी जबलपूर पोलिसांकडे संपर्क साधत आपली तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने बनावट रेमडेसिवीरच्या रॅकेटची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: