गोवा 

दामोदर कासकर मुरगावच्या नगराध्यक्षपदी, श्रद्धा शेट्ये उपनगराध्यक्ष

वास्को :
मुरगाव नगरपालिकेच्या ५३ व्या नगराध्यक्षपदी दामोदर कासकर यांची वर्णी तर ४८ व्या उपनगराध्यक्षपदी श्रद्धा महाले शेट्ये यांची वर्णी लागली. आज शपथविधी सोहळा निर्वाचन अधिकारी राजेंद्र गावस, तसेच मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
मुरगाव वास्को दाबोळीचे आमदार तसेच भाजपा पुरस्कृत पॅनलचे १९ नगरसेवक व दोन अपक्ष यांच्या सहमतीने दामोदर कासकर व श्रद्धा महाले शेट्ये यांची नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. बुधवार (दि. २६) रोजी मुरगाव नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करताना राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर खास उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत दामोदर कासकर व श्रद्धा महाले शेट्ये यांनी आपले अर्ज मुख्याधिकारी जयंत तारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. या दोघा व्यतिरिक्त इतर कोणी अर्ज सादर न केल्याने त्यांची या पदासाठी निवड निश्चित झाली होती. (दि. २७) गुरुवारी फक्त औपचारिकता तेवढी बाकी होती. ती पूर्ण करण्यात आली.
आज सकाळी पालिका इमारतीतील जनता वाचनालय सभागृहात औपचारिकता म्हणून नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी शपथ सोहळा आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता सदर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. या शपथविधी सोहळ्याला निर्वाचन अधिकारी म्हणून राजेंद्र गावस उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी जयंत तारी उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुरगाव पालिकेच्या २५ ही प्रभागाच्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडला. प्रत्येकाला शपथ घेण्यासाठी आपल्या भाषेची निवडक करण्यास अनुमती देण्यात आली.  त्यानुसार मृणाली कोरगावकर (प्रभाग ३), श्रद्धा आमोकर (प्रभाग ८), योगिता पार्सेकर (प्रभाग ९), कलासरीया स्वामी (प्रभाग १०), माताइस मोंतेरो (प्रभाग १४), गिरीश बोरकर (प्रभाग १६), फॅन्ड्रीक हेंन्रिक (प्रभाग १७), अमया चोपडेकर (प्रभाग १८), यतीन कामुर्लेकर (प्रभाग २४), लिओ रोड्रिगीस  (प्रभाग २५) या सर्व नगरसेवकांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. मंजुषा पिळणकर (प्रभाग १), दयानंद नाईक (प्रभाग २), दामोदर कासकर (प्रभाग ४), प्रजय मयेकर (प्रभाग ६), नारायण बोरकर (प्रभाग ११), प्रिया राऊत (प्रभाग १५), सुदेश भोसले (प्रभाग २२) यांनी मराठीतून तर दामोदर नाईक (प्रभाग ५), रामचंद्र कामत (प्रभाग ७), दीपक नाईक (प्रभाग १२), शमी साळकर (प्रभाग १३), देविता आरोलकर (प्रभाग १९), श्रद्धा महाले (प्रभाग २१), विनोद किनळेकर (प्रभाग २३), कातारिना झेवियर (प्रभाग २४) यांनी कोकणीतून शपथ घेतली.
नंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निर्वाचन अधिकाऱ्याने नावे जाहीर करण्यापूर्वी अजून कोणाची या दोघांच्या निवडीबद्दल आक्षेप आहे का अशी विचारणा केली. तसेच त्यासाठी त्यांना पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र कोणी आक्षेप घेतला नसल्याने निर्वाचन अधिकारी राजेंद्र गावस यांनी दामोदर कासकर यांची नगराध्यक्षपदी तर श्रद्धा महाले शेट्ये हिची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर केले व आयोजित विशेष बैठक तहकूब करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
आपली नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दामोदर कासकर यांनी कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे दामोदर कासकर यांनी सांगितले. तसेच तीनही आमदार यांच्या पाठिंब्याने मुरगाव पालिकेची विकास कामे हाती घेण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.
श्रद्धा महाले यांनीही आपण योग्य ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी भाजपा पुरस्कृत पॅनलकडे बहुमत असल्याने व तीनही आमदारांचा पाठिंबा असल्याने स्थिर मंडळ देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी नवीन पालिका मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच नगरसेवकांना शिर्डी, मुंबई व अन्य ठिकाणी नेऊन ठेवले जात असे. तसेच त्यांना नगराध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी वास्कोत आणले जात होते. यंदा तसे घडले नाही. सर्व नगरसेवक बिनधास्तपणे वास्कोमध्ये फिरत होते. दरम्यान बुधवारी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून भाजपप्रणीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दामोदर कासकर व श्रद्धा महाले शेट्ये यांच्या बिनविरोध निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वास्कोतील रखडलेल्या प्रकल्पांना सरकारतर्फे लवकरच चालना देण्यात येईल असे सांगितले. मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक आमदारांच्या सहाय्याने पावले उचलण्यात येणार असे स्पष्ट केले. पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे याची आपणास जाणीव आहे. सातव्या वेतन आयोगामुळे वेतनाचा खर्च ७० लाख आवरून १ कोटी ३० लाखावर गेला. तसेच मुरगाव पालिकेद्वारे सुमारे साडेपाच कोटी मिळत होते. ते आता बंद झाले आहेत. महसूल वाढीसाठी नगरविकास मंत्री वास्कोचे आमदार व वाहतूकमंत्री योग्य ती पावले उचलतील असे तेंडुलकर यांनी सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: