गोवा 

‘त्यांच्यामुळे गोमतंकीयांची मान शरमेने खाली गेली’

मडगाव :

लोकशाहीत विरोधकांना विधानसभेत आवाज उठवण्याचा अधिकार असला तरी सभापतींच्या दिशेने सुरक्षा रक्षकांच्या टोप्या आणि पुस्तके फिरकावण्याचा प्रकार पूर्णतः निषेधार्ह आहे. मुद्दे संपले की माणूस गुदद्यांवर येतो असे म्हणतात. तसेच काहीसे वर्तन विधानसभेत विरोधी आमदारांकडून घडले. यामुळे गोमंतकीयांची मान शरमेने खाली गेली आहे असे भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

ते म्हणाले, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेने आमदारांना निवडून दिलेले असते. मीही आमदार होतो. आपले म्हणणे मांडण्यासाठी विधानसभेत प्रश्नोत्तर तास, शून्य तास, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना, अर्ध्या तासाची चर्चा असे विविध मार्ग असतात. ते मार्ग चोखाळून आमदार आपले म्हणणे सरकारपर्यंत पोचवू शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनांत खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेवेळी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधता येतात. राज्यपाल अभिभाषणांवरील आभार दर्शक ठरावावेळच्या चर्चेवेळी बोलण्याची आमदारांना संधी असते.

याबाबतीत विचार केला तर विधेयके मांडल्यानंतर आमदारांना बोलण्याची संधी असते. विधेयक विधानसभेत सादर केले जाते. नंतर त्यावर विचार केला जातो शेवटी त्यावर मतदान घेतले जाते. विधेयक विचारार्थ घेण्यावेळी त्यात आमदार दुरूस्ती सुचवू शकतात. विधेयकांत काही त्रुटी असल्या तर त्याकडे सरकारचे लक्ष वेधू शकतात. विधेयकातील तरतुदी मान्य नसतील तर विरोधी मतदान करून आपले मत नोंदवू शकतात. निषेध व्यक्त करू शकतात. ते सारे विधानसभेच्या कामकाजात समाविष्ट होते. तसे काहीही न करता सभापतींसमोर येऊन घोषणाबाजी देणे, सुरक्षा रक्षकांची ढकलाढकली करणे हे लोकप्रतिननिधींना शोभा देत नाही. जनतेने त्यांना अशा वर्तनासाठी निवडून दिलेले नसते. लोकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचवण्यासाठी निवडून दिलेले असते. सभात्याग करून आणि विधेयकांवरील चर्चेवेळी अनुपस्थित राहून काही साध्य होणारे नसते. त्यामुळे या मार्गाचा अवलंब करून आमदारानी काय साधले ते त्यांचे त्यानाच माहित मात्र गोव्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत राज्यातील लोकप्रतिनिधींच्या अशा वर्तनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे नाईक यांनी नमूद केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: