गोवा 

‘कोणत्याही परिस्थितीत ‘ती’ जेट्टी नकोच’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
नदी परिवहन खात्याच्या ‘त्या’ तरंगत्या बोटीविरुद्ध आवाज बुलंद करीत कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जेटी  नकोच असा पवित्रा घेतल्याने चोपडेत शुक्रवारी स्थानिक नागरिकांना समजवीण्यास आलेल्या नदी परिवहन खात्याचे अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. सध्या शिवोली पुलाखाली असलेली ही जेटी दोन दिवसात चोपडे येथे स्थलांतरित करण्याचे स्पष्ट आश्वासन शिवोलीवासियांना दिले असताना आता जेटी कुठे जाते हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कॅप्टन जेम्स ब्रागांझा, उप कॅप्टन प्रेमलाल शिरवाईकर यांच्यासहित नदी परिवहन खात्याचे अन्य अधिकारी चोपडे येथे आले होते. सध्या शिवोलित असलेली ती वादग्रस्त जेटी  चोपडेत स्थलांतरित करण्यास नदी परिवहन खात्याचे अधिकारी चोपडे येथे येणार याची चाहूल लागल्याने स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.त्यात मोर जी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेट गावकर,माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा गोवा फॉरवर्ड नेते दीपक कलांगुटकर ,काँग्रेस युवा नेते सचिन परब,स्थानिक पंच नितीन चोपडेकर , भगीरथ गावकर,माजी सरपंच अमोल राऊत ,रवींद्र राऊत,स्थानिक नागरिक हेमंत चोपडेकर,अरुण कोले,संजय कोले यांच्या सहित अनेकांचा समावेश होता. .उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी योग्य उत्तरे देवू न शकल्याने त्यांनी नमते घेत स्थानिक मच्छीमार तसेच नागरिकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवू असे सांगत त्यांनी काढता पाय घेतला.

जेटीच्या उद्देशाबाबत स्थानिक अंधारात :
यावेळी जेटीच्या प्रयोजना बाबत नदी परिवहन खात्याच्या संचालकांना विचारले असता त्यांनी याबाबत निश्चित असे उत्तर दिले नाही आम्ही ही जेटी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या हितासाठी आणली आहे.राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ” कनेक्टी विटी” म्हणून त्याचा उपयोग होईल तसेच मच्छीमार बांधव ही या जेटीचा उपयोग करू शकतात असे मोगम उत्तर त्यांनी दिले त्यात स्थानिकांचे समाधान न झाल्याने आम्हाला कोणत्याही परिस्थतीमध्ये ही जेटी नको असा पवित्रा सर्वानाच घेतला. स्थानिकांना आधी विश्वासात घ्या ,या विषयावर जन सुनावणी घ्या असा आक्रमक पवित्रा लोकांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना तुमचे एक शिष्टमंडळ तयार करा आम्ही त्यांच्याशी बोलणी करू आणि त्यानंतरच जेटी बाबत निर्णय घेवू असे सांगून अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला मात्र त्याचा उपयोग होवू शकला नाही त्यामुळे  निराश होवून अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.

कॅप्टन ब्रागांझा यांची मुजोर भाषा :
स्थानिकाशी बोलणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना एका युवकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला “तू फालतू ” मला विचारणारा तू कोण ? अश्या शब्दात त्या युवकाची अवहेलना केली असता वातावरण आणखीन तापले तुम्ही जर आम्हाला फालतू समजत असाल तर तुमच्याशी आम्हाला काहीच बोलायचे नाही असे सांगत या जेटी ला आमचा अखेर पर्यंत विरोधच राहील कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ही जेटी नकोच असा आक्रमक पावित्रा घेतला त्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले.या मुजोर अधिकाऱ्यानी  आगरवाडा चोपेडे पंचायतीला पत्र सादर करताना असेच उद्धट उत्तर दिले होते नदीवर नदी परिवहन खात्याचा अधिकार आहे आम्ही जेटी चोपडेतच उभारू .पंचायत काहीही करू शकणार नाही आम्ही आम्हाला पाहिजे ते करूनच दाखवू असे सांगितले होते.आज नागरिकांशी बोलताना आम्ही केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करून करोडो रुपयांचा हा प्रकल्प आणला आहे.तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाहीच अशा शब्दात स्थानिकांना  फटकारले त्यामुळे वातावरण अधिकच तापले.

या प्रकल्पाला विरोध करताना मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर म्हणाले शापोरा नदीत मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गंडांतर येणार असेल तर हा प्रकल्प मुळीच नको
जनतेच्या पैशाने च मच्छीमार बांधवांच्या पोटावर लाथ आम्ही मारू देणार नाही.

माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलांगुट कर म्हणाले डिसेंबर २०१८ मध्ये या जेटी साठी निविदा काढली गेली स्थानिक आमदारांना सुद्धा याची कल्पना नाही तर कोट्यवधी खर्चाची ही जेटी कुणाच्या फायद्यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत जेटी चा उद्देश स्पष्ट करण्याची मागणी केली त्यात समाधान न झाल्याने यावर जनसुनावणी  घेण्याची मागणी केली. मुजोर सरकारचे अधिकारी सुद्धा मुजोर होवून जर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करतील तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही.
युवा नेते सचिन परब म्हणाले, तेरेखोल येथे बेकायदा ड्रेजिंग होताना डोळ्यावर पट्टी बांधून राहिलेले नदी परिवहन खाते स्थानिकावर असेच बेकायदेशीरपणे प्रकल्प लादत असेल तर आम्ही त्याला विरोधच करू.त्यांनी लोकांना ग्रहीत धरू नये.
यावेळी स्थानिकांची बाजू मांडताना स्थानिक पंच नितीन चोपडेकर, भगीरथ गावकर,हेमंत चोपडेकर ,संजय कोले,इत्यादींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत जेटीला तीव्र विरोध केला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: