गोवा 

”आयव्हरमेक्टिन’चे सेवन करुन जीव धोक्यात घालू नका’

काँग्रेसच्या जोसेफ डायस यांनी दिला गोमंतकीयांना इशारा

मडगाव :
भाजप सरकारने गोव्यात आजाराचा बाजार मांडला असुन, गोमंतकीयांचा “गिनीपिग” सारखा वापर करुन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपली तिजोरी भरू पाहत आहेत. गोमंतकीयांनी वैद्यकीय चाचणी न करता व डॉक्टरांचा सल्ला न घेता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे सेवन करुन आपला जीव धोक्यात घालू नये असा इशारा दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी दिला आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेला (आयएमए) सुद्धा आरोग्यमंत्र्यानी सदर गोळ्यांच्या सेवनाबद्दल विश्वासात घेतलेले नाही हे आता उघड झाले आहे. कोविड आजारासाठी सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास आम्ही मान्यता दिलेली नाही असे सांगुन, काल आयएमएचे प्रवक्ते डॉ. संदिप नायक यांनी यावर स्पष्टपणे भाष्य करुन आरोग्यमंत्र्याना उघडे पाडले. गोव्याला प्रयोगशाळा म्हणुन वापरणाऱ्या  भाजप सरकारवर आणखी एक थप्पड पडले आहे.

जागतीक आरोग्य संघटना, मेरिलॅंड विश्वविद्यालयाचे संसर्गीक रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहिम युनूस तसेच विज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जाणकारांनी सदर गोळ्यांचे सेवन योग्य आरोग्य चिकीत्सा न करता केल्यास अपायकारक ठरू शकते असा इशारा दिला आहे. गोवा सरकारला सदर गोळ्या लोकांना मोफत वाटण्याचा सल्ला कुणी दिला हे सांगण्याची हिम्मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे ह्या दोघांनाही नाही. सुमारे २२ कोटी ५० लाखांचा गोळ्या खरेदीत घोटाळा असल्यानेच दोघेही गप्प आहेत असा आरोप जोसेफ डायस यांनी केला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सदर गोळ्यांचे वाटप करण्यासाठी महिला व बाल कल्याण खात्यातील कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्याचे जाहिर केले आहे हे धक्कादायक आहे. सदर सरकारी कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी आरोग्यमंत्र्यांच्या गुन्ह्यात सहभागी होऊन डॉ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंच्या पापांचे धनी होवु नये असा सल्ला जोसेफ डायस यांनी दिला आहे.

joe dias
जोसेफ डायस

भाजप सरकारने सदर गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी निवीदा जारी केली होती का? सदर ऑर्डर कुणाला व किती रकमेला देण्यात आली ही माहिती देण्यासाठी सरकार टाळाटाळ करते यावरुनच एकंदर प्रकरणांत घोटाळा असल्याचे स्पष्ट होते.

गेल्या वर्षी आयुष मंत्रालयाने अश्याच गोळ्यांचे वाटप करुन सदर गोळ्यांच्या सेवनाने कोरोना दूर राहिल असे लोकांना सांगुन जाहिरातबाजी केली होती. भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी सदर गोळ्यांच्या नावे भरपुर कमाई केली. आता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा नविन जुमला आरोग्यमंत्र्यांनी आणला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानेच आज फेक उपचार पद्धतीच्या नावे पैसे कमविण्याचा डाव भाजप सरकार परत एकदा खेळत आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सर्वप्रथम कोविड लसीकरण व चाचणी अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा. गोव्यात लसींचा आवश्यक साठा उपलब्ध असेल याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. सरकारी इस्पितळात रुग्णांना खाटी, औषधे, ऑक्सिजन व उपचार योग्य प्रकारे मिळतील याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेचे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: