गोवा 

माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचे निधन

पणजी :
गोव्याचे माजी खासदार, माजी शिक्षण मंत्री, सिध्दहस्त लेखक आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक प्राध्यापक गोपाळराव मयेकर यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

मयेकर हे गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष होत. ते लोभस व प्रासादिक शब्दकळा लाभलेले कवी होते. मज दान असे हे पडले हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे.

१९८९ साली ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी ७० च्या दशकात ते गोव्यात आमदार व शिक्षण मंत्री होते. विद्वान साहित्यिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, तेजस्वी वक्ता अशी त्यांची गोवा व महाराष्ट्राला ओळख होती. त्यांचे बालपण मुंबई त गेले होते. गोव्यात म्हापसा येथे ते रहायचे. मृत्यूसमयी वय ८७ होते.

शोक संदेश

मडगाव – पणजी – गोव्याचे माजी खासदार मंत्री, विचारवंत, लेखक, शिक्षण तज्ञ व स्वाभिमानी गोमंतकीय प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या निधनाने मला दु:ख झाले. गोव्याच्या भल्यासाठी त्यांनी विवीध क्षेत्रात दिलेले योगदान आम्ही कदापी विसरणार नाही. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यांस सद्गती लाभो.
दिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते

खरा शिक्षक हा फक्त विद्यार्थ्यांना शिकवत नसतो तर एकप्रकारे समाज घडवत असतो. समाजाला दिशा देत असतो. गोपाळराव मयेकर हे असे समाजाला दिशा देणारे हाडाचे शिक्षक होते. प्राचार्य होते. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असलेल्या गोपाळरावांनी आपल्या साध्या, सोप्या आणि सुलभ भाषेत गोमंतकीयांना ज्ञानेश्वरीचे मर्म उलगडून दाखवले. संत साहित्यावर त्यांचाइतका अधिकार गोव्यात अन्य कोणाकडे खचितच असेल. संत साहित्यावर निरतिशय प्रेम असणाऱ्या गोपाळरावांनी राज्याचे शिक्षणमंत्रीपद भूषवताना या पदाचे पावित्र्य वाढवले आणि नव्या पिढीला दिशा दिली. लेखक, कवी, तत्वचिंतक, राजकारणी, समाजहितैषी असा विविध भूमिकांत वावरताना गोपाळराव या आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांचे असे अकस्मात जाणे हा माझ्यासाठी भावनिक पातळीवर धक्का आहे. त्यांना माझी आणि माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
गोविंद गावडे,
मंत्री, कला आणि सांस्कृतिक तथा सहकार खाते, गोवा राज्य.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: