गोवा 

‘भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य हेच काँग्रेसचे ध्येय’

म्हापसा :
राज्यात वाढलेल्या भ्रष्ट्राचाराचा सफाया करून गोव्याला देशातील आदर्श राज्य म्हणून ओळख मिळवून देण्याची सुयोग्य वेळ आली असून, २०२२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस गोव्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकायुक्त कायदा लागू करेल, अशी घोषणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय काँग्रेसप्रणित, म्हापसा येथे उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या ‘स्वतंत्र सेनानी – शाहिद सन्मान दिन’ मध्ये ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप, जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रदेश उपाध्यक्ष धर्मा चोडणकर, गुरुदास नाटेकर, प्रवक्ते महादेव खांडेकर, माजी आमदार प्रताप गवस, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी, सोशल मीडिया प्रमुख हिमांशू तिवरेकर, जिल्हा पदाधिकारी आणि विभाग अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मणराव दत्तात्रय देसाई, राजेंद्र शिवाजीराव देसाई, सिरिओ डायस, लक्ष्मण मुकुंद नाईक, अँटोनियो एरनास्टो डाकोस्ता फ़्राईस, यदुराम नाटेकर, नागेश च्यारी, नंदा वळवईकर, नारायण वेर्णेकर, उल्हास नाईक, फेलिक्स फ्रान्सिस्को वालेस, नारायण शिरोडकर, सुखा शिवडेकर या हयात असलेल्या आणि नसलेल्या स्वांतत्र्यसैनिकांचा ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते दिगंबर कामत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात मजबूत लोकायुक्त विधेयक मांडले होते. दुर्दैवाने, डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकारमध्ये विधेयकावर चर्चा करण्याची आणि मंजूर करण्याची हिंमत नव्हती आणि म्हणूनच या विधेयकाला पटलावर येऊच दिले नाही.

आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड.. रमाकांत खलप यांनी गोवा कायदा आयोगाचे अध्यक्ष असताना या विधेयकाचा मसुदा तयार केला होता. पण, तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे असल्याने त्यांनी हे विधेयक थांबवले.

चोडणकर यांनी नमूद केले कि, आम्ही आता कायदेशीर तज्ञ तसेच स्वयंसेवी संस्थांकडून अधिक सूचना घेऊ आणि गरज पडल्यास कायदा अधिक मजबूत करू. माजी गोवा लोकायुक्तांनी आदेश दिलेल्या सर्व प्रलंबित प्रकरणांची आम्ही चौकशी करून संबधीताना  न्याय देऊ, असेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांकडून गोव्यातील भ्रष्टाचाराला संपवण्याच्या पक्षाच्या दृढ निश्चयाची शपथ घेतली जाईल आणि निवडून आल्यानंतर आमचे सर्व उमेदवार भ्रष्टचारापासून मुक्त राहतील आणि आपली विहित कर्तव्ये ते प्रामाणिकपणे पार पाडतील याबद्दल विश्वास यावेळी चोडणकर यांनी दिला.

ॲड. रमाकांत खलप यांनी या मेळाव्याला संबोधित करताना स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की नागरिकांचे स्वातंत्र्य भाजप सरकारने हिरावून घेतले आहे आणि भाजप भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले, भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विजय भिके, धर्मा चोडणकर, चंद्रकांत चोडणकर, प्रताप गावास, गुरुदास नाटेकर, भोलानाथ घडी, नझीर बेग यांची देखील भाषणे झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: