गोवा 

‘काँग्रेसच्या कोविड योध्यांचा छळ थांबवावा’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला इशारा

पणजी​ :​
गोव्यातील पोलीस खाते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कोविड रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना ऑक्सिजन सिलींडर पुरविणारे कॉंग्रेस (congress) कार्यकर्ते व पदाधिकारी यांची छळवणूक थांबवावी, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी त्रस्त असलेल्या कोविड रुग्णांचा जीव वाचावा म्हणून युवक काँग्रेसचे पदाधिकारी गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवत आहेत. अशा स्वयंसेवी कार्यकर्त्यांना सहकार्य करायचे सोडून गोवा पोलीस त्यांचीच उलटतपासणी घेत आहेत, याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले. सरकार अपयशी ठरते तेव्हा ती कमतरता भरून काढण्याचे कर्तव्य इतरांना करावे लागते. त्यामुळे कॉंग्रेससह अनेक स्वयंसेवी संस्था या गोव्यातील शेकडो कोविड रुग्णांचे आयुष्य वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी हीन दर्जाचे अमानवी राजकारण करणे चुकीचे आहे, असे चोडणकर म्हणाले.
युवक काँग्रेस पदाधिकारी साईश आरोसकर हे ग्लेन काब्राल यांच्या सोबत ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करायला सुरुवात केली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस  सरचिटणीस जनार्दन भंडारी, गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सांतआंद्रे युवक गटाध्यक्ष साईश आरोसकर, युवक काँग्रेस सचिव ग्लेन काब्राल यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी छळवणूक चालवली आहे. कोविड योद्धा म्हणून काम करणार्‍या या कार्यकर्त्यांना आगशी पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. एक पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक एवढ्या अधिकार्‍यांना कामाला लावून मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस स्वयंसेवकांना गरजू लोकांची मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कोविड काळात गरजू लोकांना पुरेशा साधन सुविधा उपलब्ध करून देणे, लोकांचे जीव वाचविण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे आणि इतर घटकांना लोकांच्या मदतीसाठी सहभागी होऊ देणे यापैकी काहीही गोवा सरकार करत नाही. गरजू लोकांना तसेच कोविड रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरविणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करीत राहू. आम्हाला हे समाजकार्य करण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असे चोडणकर म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास डाॕ. प्रमोद सावंत हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सध्याच्या संकटकाळात सिद्ध होत आहे. त्यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी गोमेकॉतील डॉक्टरांच्या पथकात सामील व्हावे. नाही तरी साध्या गोवा सरकार त्यांचे सुपर सीएमच चालवत आहेत. एक डॉक्टर म्हणून सावंत यांनी किमान रुग्णांचे जीव वाचविण्याचे तरी काम करावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: