गोवा 

‘आतातरी लोकांच्या यातना बंद करा’

 दिगंबर कामत यांचे राज्य सरकारला आवाहन

मडगाव (प्रतिनिधी) :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेचे हाल केले आहेत. भाजप सरकारने आतातरी आपला अहंकार बाजुला करावा व विरोधी पक्षांचा सल्ला मानुन, लोकांच्या यातना बंद कराव्यात अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
कोविड महामारीची तिसरी लाट येणार हे आता जवळ जवळ नक्की असुन, सरकारने आताच तयारी करणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष म्हणुन सरकारला सहकार्य करण्याची आमची तयारी असुन, भाजप सरकारने आमचे म्हणणे ऐकुन घेणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांच्या सुचना ह्या जनतेच्या हितासाठी असतात हे सरकारने लक्षात ठेवावे.

काल तौक्ते वादळाचा गोव्याला जबरदस्त तडाखा बसला. भीषण चक्रीवादळाने कोट्यवधींची हानी झाली. गोवा हा वादळाचा केंद्रबिंदू नसल्याने आम्ही एवढ्यावर सावरलो. मी २ मे २०२१ रोजी सरकारला मॉन्सुनपुर्व कामे जलदगतीने हातात घ्या असा जाहिर सल्ला दिला होता परंतु भाजप सरकारने त्याकडे सवयींप्रमाणे दुर्लक्ष केले असे दिगंबर कामत म्हणाले.

हवामान खात्याने चक्रीवादळाची सुचना देवुनही भाजप सरकारने वादळ आल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीची कसलीच जागृती केली नाही. एरवी भाजप पदाधिकाऱ्यांची जाहिरातबाजी करणाऱ्या गोवा सरकारने चक्री वादळ व आपत्ती व्यवस्थापन याची माहिती देणारी एकही जाहिरात प्रसिद्ध केली नाही यावरुन सरकारचा बेजबाबदारपणा स्पष्ट दिसतो. संकट काळात संपर्क साधण्यासाठी सरकारी संपर्क अधिकारी यांचे फोन क्रमांक सुद्धा सरकारने दिले नाहीत. आमच्या शेजारील महाराष्ट्र राज्यातील सरकारने जारी केलेली वादळ व कोविड व्यवस्थापन जाहिरात मुख्यमंत्र्यानी बघावी व धडा घ्यावा असे दिगंबर कामत म्हणाले.

भाजप सरकारने आता उत्सवी वातावरणांतुन बाहेर येणे गरजेचे आहे. यापुढे नैसर्गिक आपत्ती  व कोविड महामारीत एकाचाही बळी जाणार नाही यासाठी आताच युद्ध पातळीवर तयारी करणे गरजेचे आहे. काल गोमेकॉत वीज पुरवठा काळी वेळ खंडीत झाला होता. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातही वीज खंडीत झाली होती. गोव्यातील विवीध भागातील कोविड कॅअर सेंटरमध्ये वीज गायब झाली होती. यापुढे सरकारी नाकर्तेपणामुळे एकही जीव जाणार नाही याची खबरदारी सरकारने घेणे गरजेचे आहे.

गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या परवाच सुरूवात केलेल्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकमधील कोविड कक्षात पाणी आल्याचे तसेच एका कक्षातील छप्पर कोसळल्याचे पाहुन मला धक्काच बसला. कोविड केंद्रात रुपांतर केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी काचा कोसळल्या हे दुर्देवी आहे. आज तंत्रज्ञान उपलब्ध असताना  गोव्यातील हवामानाचा अंदाज न घेताच कोट्यवधी रुपये खर्चुन प्रकल्प उभारले गेल्याचा हा परिणाम आहे. सरकारच्या सदोष कामाचे वाभाडेच या घटनेने निघाले. नशिब बलवत्तर म्हणुन दोन्ही ठिकाणी दाखल रुग्णांना हानी पोचली नाही. सरकारने या दोन्ही  घटनांची गंभीर दखल घ्यावी व उच्चस्थरिय चौकशी करुन जबाबदार व्यक्तिंवर कारवाई करावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.

digambar kamat
दिगंबर कामत

मडगाव व फातोर्डा शहरात पुढील २० वर्षांचा विचार करुन आम्ही कमी व उच्च दाबाच्या भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या आहेत. मडगाव शहरातील चार वीज उपकेंद्रे आज शेल्डे व फोंडा वीजपुरवठा केंद्रास जोडलेली आहेत. त्यामुळे काल संपुर्ण गोव्यात वीजेचा खोळंबा झालेला असतानाही मडगाव शहरात वीज पुरवठा चालु होता असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.

सरकारने कोविड मृतांच्या कुटूंबियांस तसेच काल चक्रीवादळात प्राण गेलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मी मागणी करतो. कालच्या वादळात भयंकर नुकसान झालेल्यानांही सरकारने ताबडतोब आर्थिक मदत जाहिर करावी व लवकरात लवकर ती त्यांना सुपूर्द करावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: