गोवा 

‘कमकुवत कायद्याच्या आधारे जनतेला न्याय कसा देणार?’

नियोजित लोकायुक्तांना काँग्रेस प्रदेश अध्यक्षांचा पत्राद्वारे सवाल 

पणजीः
लोकायुक्त (Lokayukta) ही घटनात्मक संस्था आहे. या संस्थेचा सगळा खर्च जनतेच्या करांतून केला जातो. गोव्याचा लोकायुक्त कायदा अगदी कमकुवत करण्यात आलाय. या कायद्यांतर्गत भ्रष्टाचारावर कारवाई होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत लोकायुक्त पद स्विकारून या कमकुवत कायद्यांतर्गत लोकायुक्तपदी विराजमान होऊन निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी जनतेला कसा काय न्याय देणार, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलाय.
गोवा लोकायुक्त पदाचा ताबा निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी हे शुक्रवारी घेणार आहेत. तत्पूर्वी गिरीश चोडणकर यांनी त्यांना वैयक्तीक पत्र लिहीलं आहे. हे पत्र त्यांच्या गिरगांव- मुंबई पत्त्यावर पाठविण्यात आलंय. तसंच त्यांना ईमेलद्वारेही हे पत्र पाठविण्यात आलंय. या पत्रात गोवा लोकायुक्तासंबंधीची सगळी माहिती देण्यात आलीए. एक निवृत्त न्यायमूर्ती या नात्याने जोशी यांनी आपली प्रतिष्ठा जपावी आणि केवळ नाममात्र हे पद स्विकारण्याबाबत फेरविचार करावा, असंही सूचवलं आहे.

lokayukta
अंबादास जोशी

लोकायुक्त (Lokayukta) कायद्यात दुरूस्ती करून हा कायदा निष्प्रभ करण्यात आलाय. या दुरूस्तीला काँग्रेस तथा इतरांनी विरोध केला होता. कायदा क्षेत्रातील लोकांनीही या दुरूस्तीला हरकत घेतली होती. हा कायदा निस्तेज करून उघडपणे प्रशासनात भ्रष्टाचार करण्यास मोकळी वाट देण्यात आलीए, असंही चोडणकर म्हणाले. कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी गरजेची आहे, असं या कायद्यात म्हटलंय.
लोकायुक्त (Lokayukta) संस्थेवर वार्षिक 1.80 कोटी रूपयांचा खर्च होतो. हा जनतेच्या करांतून होणारा खर्च लोकायुक्त संस्था कशा तऱ्हेने सत्कार्याला लावणार हे लोकायुक्तांनी स्पष्ट करावं, असंही चोडणकर म्हणालेत. यापूर्वी हे पद निवृत्त न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे यांना देऊ केले होते. त्यांनी वैयक्तीक कारण पुढे करून हे पद स्विकारण्यास नकार दिला आणि खऱ्या अर्थाने न्यायपालिकेची प्रतिष्ठा जपली. यानंतर सरकारला नव्या लोकायुक्तांचा शोध घ्वावा लागला आणि त्यातूनच अंबादास जोशी यांनी हे पद स्विकारण्याची तयारी दर्शवलीय. हे पद केवळ भूषविण्यासाठी ते कार्यरत राहणार आहेत की खऱ्या अर्थाने या पदाची शान वाढवणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं चोडणकर आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: