गोवा 

‘गोव्याला पाहिजे पुर्णवेळ राज्यपाल’

घटकराज्य दिनी कॉंग्रेसचे राष्ट्रपतीना पत्र

पणजी :
गोवा मुक्तीला ६० वर्षे झाली आहेत, भारतीय संघराज्याचे २५ वे राज्य म्हणुन गोव्याला मान्यता मिळाली, आज राज्याचा ३५ वा घटक राज्य दिन साजरा करीत असताना गोव्याला पुर्णवेळ राज्यपाल नाही. भारताच्या राष्ट्रपतीनी गोवा राज्यासाठी गोमंतकीयांचे हित जपणाऱ्या पुर्ण वेळ राज्यपालांची नेमणुक करावी व गोमंतकीयांना न्याय द्यावा असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

आज भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीय गुदमरत आहेत. गोमंतकीयांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी मागील नऊ महिने गोव्यात पुर्णवेळ राज्यपाल नाहीत. राष्ट्रपतीनी गोमंतकीयांचा आवाज ऐकुन गोव्यात पुर्णवेळ राज्यपालांची नेमणुक करावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

कॉंग्रेस पक्षातर्फे आज घटकराज्य दिनी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपतीना एक पत्र पाठवुन गोव्यातील एकंदर परिस्थितीची त्यांना कल्पना दिली व पुर्णवेळ राज्यपाल नेमण्याची मागणी केली.

कोविड महामारीत गोवेकर संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने गोमंतकीयांच्या संकटात भर टाकली आहे. कोविडचा आज पर्यंत १५४४९ जणांना संसर्ग झाला असुन, २५९७ लोकांना मृत्यु आल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. गोव्यात भाजप सरकारने लोकांचा घटनात्मक जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने गोवा राज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर बदनामी झाल्याचे सांगुन, गोमेकॉत प्राणवायुच्या कमतरतेमुळे सुमारे ७५ बळी गेल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

तौक्ते चक्रीवादळात सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला आहे. गोव्याला चक्रीवादळाचा हादरा बसल्या नंतर पंतप्रधानानी गोव्याची हवाई पाहणी करण्याचे टाळले तसेच गोव्यासाठी कसलीच मदत जाहिर केली नाही याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पुर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्रीगण एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने लोकांमध्ये अविश्वास बळावला आहे असे सदर पत्रात नमुद करण्यात आले आहे.

कॉंग्रेस पक्षाने विद्यमान भाजप सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांना दिल्याचेही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणुन देण्यात आले आहे.

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची स्तुती सदर पत्रात करण्यात आली असुन, त्यांनी गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी वेळोवेळी पाऊले उचलली होती हे राष्ट्रपतींच्या लक्षात आणुन देण्यात आले आहे. म्हादई प्रश्न, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा यावर माजी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचे कॉंग्रेस पक्षाने कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत.

गोव्यात आज सरकारी कारभार पुर्णपणे कोसळला असुन, सगळीकडे सावळा गोधळ चालु आहे. अशा कठिण काळात गोव्यात पुर्णवेळ राज्यपाल नेमणे गरजेचे असल्याचे कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला असल्याने पुर्णवेळ राज्यपाल नेमणे हा गोवेकरांचा अधिकार असल्याचे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या नजरेसमोर मांडले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: