गोवा 

राज्यभरात योग दिवस उत्साहात साजरा

पणजी :
केंद्रीय संस्कृती मंत्रालय भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाला जोडून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – योग एक भारतीय वारसा” या अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 साजरा करत आहे. या ठिकाणांपैकी गोव्यातील दोन स्थळांची या अभियानासाठी निवड करण्यात आली. त्यात अग्वाद किल्ला, अग्वाद रोड, कांदोळी आणि तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर यांचा समावेश आहे.

किल्ले अग्वाद हा सतराव्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे. हा दीपगृहासोबत गोवा येथे सीनक्वेरिम किनाऱ्यावर अरबी समुद्राकडे पाहत उभा आहे. महादेव मंदिर, तांबडी सुर्ला हे 12 वे शतकातील कदंब शैलीतील शैव मंदिर असून भगवान शिव यांना समर्पित आहे आणि हिंदू उपासना करण्यासाठी ते एक सक्रिय ठिकाण आहे. गोव्यात संरक्षित आणि उपलब्ध असलेल्या बेसाल्ट दगडातील कदंब स्थापत्यकलेचा हा एकमेव नमुना मानला जातो. ही दोन्ही स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत (एएसआय) राष्ट्रीय महत्त्व असलेली संरक्षित स्मारके आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी किल्ले अग्वाद येथे योगासने केली. इंडिया टुरिझमचे रोहन श्रॉफ यांनी सहभागी झालेल्या बारा जणांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. योग सत्रानंतर सांस्कृतिक मंत्रालयाच्या पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्रद्वारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महादेव मंदिर तांबडी सुर्ला येथील योग सत्र, योगशिक्षक स्नेहल तारी यांच्या देखरेखीखाली पार पडले ज्यात  एएसआय कर्मचारी आणि तांबडी सुर्ला येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सकाळी 07.00 वाजता सुरु झाला आणि 07.45 वाजता त्याचा समारोप झाला. त्यानंतर संगीत नाटक अकादमीच्या कलाकारांनी 7.45 ते 8.15 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

या प्रसंगी टी-शर्ट्स, विशिष्ट संकल्पना/टॅगलाइन आणि लोगो असलेले मास्क तयार करून सर्व सहभागींना पुरवण्यात आले आणि कोविड -19 नियमांचे पालन करत  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयडीवाय 2021 ची मुख्य संकल्पना “निरामय आरोग्यासाठी योग” आहे जी सध्याच्या व्यस्त जीवनाशी निगडित आहे. मंत्रालयाने जवळपास 1000 इतर हितधारक संस्थांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या अनेक डिजिटल उपक्रमांमुळे महामारीचे निर्बंध असूनही योगाभ्यास लोकांपर्यंत पोहोचला.

goa yoga day

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: