गोवा लेख

‘सरकार आपल्या दारी’ :
सरकारचा एक यशस्वी उपक्रम

संदेश साधले :


ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले… अशीच काहीशी परिस्थिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या बाबतीत घडतं असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.


राज्य सरकारच्या वतीने सध्या ‘सरकार आपल्या दारी’, हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमास राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या नेतृत्वाखालील काम करत असलेले भाजपचे सरकार लोकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. कोरोना काळात सर्व गोष्टी ठप्प झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण संस्था सर्व काही बंद होते. आता कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे. सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. या पाश्र्वभूमीवर लोकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न समजाऊन घेण्यासाठी भाजप सरकारने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, त्या सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात लोकांनी खूप त्रास सहन केला. तसेच पुरामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक समस्येला सामोरे लागले. यासाठी लोकांचा पालक या नात्याने त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हजारो नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. आणि त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले.


केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने गेली वर्ष दीड वर्ष कोरोनामध्ये होरपळलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. तसेच त्याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, व्यापारी, छोटे उद्योग, मच्छीमार अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांसाठी विविध योजना आखून त्याची अंमलबजावणी केली असून सरकार लोकांना उत्तम आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून काम करत आहे.


समाजातील छोट्यातील छोट्या घटकास कसा फायदा होईल, या दृष्टीने भाजपचे सरकार काम करत आहे. केंद्राच्या असो किंवा राज्याच्या, या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप सरकार आणि पक्षाचे संघटन अहोरात्र झटत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी योजनांपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सरकारी योजनांविषयी जनजागृती केली जात आहे. केवळ शहर नव्हे तर गाव पातळीवर, वाड्यावाड्यावर आणि वस्त्यांवर सरकारी योजनांची जागृती केली जात आहे. पंचायतींच्या माध्यमातून आणि स्वयंपूर्ण मित्राच्या सहकार्याने सरकारी योजनांची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. सरकार केवळ माहिती देऊन थांबत नाही तर अर्ज भरण्यापासून ते लाभार्थींपर्यंत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत लोकांना सहकार्य करत आहे.


सरकार आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत लोकांना इतर सेवाही दिल्या जात आहेत. यामध्ये मतदान कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखले, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृह आधार, समाज कल्याण खात्याच्या योजना, पाणी, वीज जोडणी, जमिनीसंबंधी आवश्यक सोपस्कार, इडीसी च्या योजना, बँक खाती, विमा, शेतकरी क्रेडिट कार्ड, मच्छीमारांना असलेल्या योजना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजना, आरोग्य तपासणी आणि उपचार, मुख्यमंत्री रोजगार योजना, स्टार्ट अप साठी उत्तेजन, कृषी योजना, कामगार कल्याण योजना, नेत्र तपासणी आणि उपचार या सारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता.
सरकार आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री आत्तापर्यंत काणकोण, कुंकल्ली, वास्को, डिचोली, साखळी, थिवी अशा अनेक ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी लोकांच्या समस्या आणि अडचणी ऐकल्या.


मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमास राज्यातील बहुतांश ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभला. सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. केवळ भाजपचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. काणकोण, कुंकळी आणि साखळी येथील प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत भारावून गेले. लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री गहिवरले. भाजपला मिळत असलेला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद हा तमाम विरोधकांना मिळालेली चपराक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकूणच ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम भाजपच्या यशाची पावती आहे. आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला मिळालेली पसंती आहे. म्हणूनच हा उपक्रम मुख्यमंत्र्यांसाठी, ते आले… त्यांनी पाहिले… ते जिंकले… ! ठरले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: