गोवा 

‘नैतिक जबाबदारी घेत आरोग्यमंत्र्यांनी द्यावा राजीनामा’

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली मागणी 

पणजी :
प्रशासकीय चुकाच नव्हे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने आज कोविड आणिबाणीची स्थिती गोव्यात तयार झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आता स्वत:ला निरपराध सिद्ध करण्याचा प्रयत्न करु नये. अनैतीक मार्गाने माया जमविण्याच्या त्यांच्या धोरणाने आज आरोग्यसेवा यंत्रणा कोसळली आहे. कोविडच्या सद्य परिस्थितीची नैतिक जबाबदारी घेत आरोग्यमंत्र्यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या मध्ये कमिशनची टक्केवारी ठरविण्याच्या वादामुळे आज राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा तयार झाला आहे. आज दोघेही एकामेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत व त्याचा परिणाम प्राणवायु अभावी गुदमरुन कोविड रुग्णांचे जीव जात आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम तत्कालिन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संगनमत करुनच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाणीवपुर्वक लांबणीवर टाकले होते. सदर इस्पितळातील दोन मजले खासगी इस्पितळ सुरू करण्यासाठी देण्याचा डाव असल्यानेच ऐन कोविड संकटकाळात रुग्ण जमिनीवर झोपत असतानाही त्यांनी उपयोगात आणण्याचे टाळले हे गोमंतकीयांनी बघितले आहे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

गोव्यातील एका डॉक्टरनी व्हेंटिलेटर खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्पोट एका चित्रफितीतून करुनही त्यावर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही एक शब्द बोलत नाहीत. जीव वाचविण्यासाठी अखेरचा उपाय म्हणुन वापरण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरवर आरोग्यमंत्री कमिशन खातात हे अत्यंत दुर्देवी आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडुन सदर डॉक्टरने केलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.

आज मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या स्वार्थामुळे डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी प्रचंड दबावाखाली आहेत. एकंदर आरोग्यसेवा यंत्रणाच कोसळण्याची भिती समोर दिसते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा छळ सुरू आहे. आज सरकारी इस्पितळातील शौचालये, न्हाणीघरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आज संपुर्ण आरोग्ययंत्रणाच जमीनदोस्त झाली आहे. डॉक्टर्स व नर्सस यांच्याकडे रुग्णांना तपासण्यासाठी आवश्यक साधन सामग्री नाही. त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. आज पर्यंत  अनेक डॉक्टर्सवर संतापाच्या भरात रुग्णांच्या नातेवाईकांकडुन हल्ले झाले आहेत. डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यास आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री दोघेही जबाबदार आहेत. यानी सरकारी इस्पितळातील आरोग्य कर्मचारी वाढवण्यासाठी क़ाहिच प्रयत्न क़ेले नाहित त्यासाठी डॉक्टर्स व नर्सस या सगळ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

congressआज सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्यमंत्र्यानी जनादेश तोडुन केवळ आपल्या स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी केली होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे केवळ सत्ता भोगणे व पैसे कमविणे हे एकमेव ध्येय असुन, त्यासाठीच त्यांनी अनेक राजकीय कोलांट उड्या मारल्या आहेत. आज आरोग्यखात्यातील ऑक्सिजन पुरवठा, जेवण, स्वच्छता कंत्राट, औषधे व कर्मचारी यांच्या बाबतीत आरोग्यमंत्र्यानी एकाधिकारशाही सुरू केल्यानेच सद्य परिस्थिती उद्भवली आहे. भरमसाठ कमिशनची मागणी होत असल्याने अनेक गोमंतकीयांनी आरोग्यखात्याकडील व्यवहार बंद केले आहेत. आज घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या होम आयजोलेशन किट मध्ये घोटाळा असुन कित्येकांना सदर किट न देताच आरोग्यखाते बिले तयार करीत आहे. आरोग्यमंत्री प्रत्येक गोष्टीवर कमिशन खातात हे यातुन उघड होत आहे. असा आरोपही चोडणकर यांनी केला.

उद्योगमंत्री म्हणुनही सेझ प्रवर्तकांना सुमारे १३३ कोटी रुपयांचे व्याज फेडण्याचा निर्णय घेवुन तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर व विश्वजीत राणे यांनी मलई खाल्ली. बेकायदेशीरपणे सेझ प्रवर्तकांना व्याज फेडण्याचा निर्णय घेवुन दोघांनीही सरकारी तिजोरी लुटली असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

आज प्रशासकीय निर्णय घेण्यास विलंब झाल्याने गोव्यात कोविड संकट बळावले याची जाणीव आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना झाली ही चांगली गोष्ट आहे. आता देशहितासाठी अधिक वेळ न घालविता, विश्वजीत राणेंनी स्व. मनोहर पर्रिकरांच्या कपाटात बंद असलेल्या राफेल फाईलचा उलगडा करावा. असे केल्याने त्यांची किमान २० टक्के पापे धुवून जायला मदत होईल, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: