सिनेनामा

‘इफ्फीमध्येही होणार खासगी क्षेत्राचा सहभाग’

51 व्या इफ्फीचा झाला थाटात शुभारंभ

पणजी :
सिनेमाची अनुभूती भाषेच्या पलिकडची असते आणि इफ्फी ही सिनेमाची जादू अनुभवायला देणारे, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिपादन केले. चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचा आज पणजीत शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची या उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर, इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांच्यासह भारत सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद, पुन्हा एकदा दुमदुमला.
इफ्फी कार्यक्रमाला केवळ भारत सरकार आणि गोवा सरकार यांच्यापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षीच्या 52 व्या इफ्फी मध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग असेल अशी घोषणा यावेळी जावडेकर यांनी केली.

 

आशियातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठ्या अशा या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक सुप्रसिध्द अभिनेत्री तिस्का चोप्रा यांनी केले. चित्रपट निर्माते प्रियदर्शन नायर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. त्याशिवाय, इतर अनेक सिने कलाकारांनी देखील सोहळ्याला खास उपस्थिती लावत रसिकांचा आनंद द्विगुणीत केला. भारतीय पॅनोरामाच्या ज्युरीचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


”वंगबंधूं’वर करणार भारत-बांग्लादेश बायोपिक
‘भारत ही एक अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक भूमी असून इथे आपण कोणतीही स्वप्ने बघू शकतो, कारण भारतात काहीही शक्य आहे. अशी प्रतीक्रिया,आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांनी व्हिडीओ संदेशातून व्यक्त केली. या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रानही उपस्थित होते. यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात, बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय, भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे, अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या. 2020 मध्ये आलेल्या आजारावर आपण 2021 मध्ये लस निर्माण केली आहे हे आपल्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे भारतातील 190 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील जावडेकर पुढे म्हणाले की भारत आणि बांगलादेश यांच्या मजबूत संबंधांचे प्रतीक असलेल्या बंगबंधू या चित्रपटाची निर्मिती भारत आणि बांगलादेश मिळून करतील शेख मुजीब उर रहमान यांच्या जीवनावर तो चित्रपट आधारित आहे.

’इफ्फीचा स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म’
51 वा इफ्फी पहिल्यांदाच मिश्र स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष आणी आभासी स्वरूपात होत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रसारणासाठी इफ्फीचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाईन होत असल्याने जगभरातील सिनेरसिक प्रतिनिधी या महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. या सुविधेमुळे यंदा नेहमीपेक्षा जास्त लोक ऑनलाईन माध्यमातून, महोत्सवात सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.

भारतीय तसेच जागतिक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी गोव्याला यावे. इफ्फीमुळे जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना भारताच्या समुद्र किनार्‍यावरच्या या निसर्गसंपन्न राज्यातले सौदर्य अनुभवण्याची संधी मिळते.
– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
इटालियन सिनेमॅटोग्राफर, व्हिक्टोरियो स्टोरारो यांना या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र व्हिक्टोरियो स्टोरारो प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या…… त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेतल्याबद्दल व्हिक्टोरियो स्टोरारो यांनी इफ्फीचे आभार मानले, अनेक नामवंत दिग्दर्शकांनी दिलेल्या उत्तमोत्तम संधींमुळेच आपण इथवर पोहचू शकलो, असे ते म्हणाले. जगभरातील सिनेमॅटोग्राफ्रर्सन सल्ला देताना त्यांनी सांगितले- अभ्यास करा, संशोधन करा, स्वतःला तयार करा.आपल्या कामावर प्रेम करा, आपण जर कशावर प्रेम केले आणि विश्वास ठेवला तरच आपण ते ध्येय साध्य करू शकतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: