गोवा सिनेनामा

‘इफ्फी’तील ‘गोवा विभागा’ची अखेर घोषणा

15 नोेव्हेंबर पर्यंत स्वीकारल्या जातील प्रवेशिका

पणजी : 
भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवातील म्हणजेच ‘इफ्फी’तील गोवा विभागाची अधिकृत घोषणा आज गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने करण्यात आली. इफ्फी अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही अद्याप या विभागाबद्दल काहीच हालचाल दिसत नव्हती.दरम्यान आज इएसजीच्यावतीने या विभागाची घोषणा करण्यात आली.

 

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पणजीमध्ये होणार्‍या 52 व्या इफ्फीमध्ये यावर्षी गोमंतकीय सिनेमांच्या प्रतिनिधित्वावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उभारले होते. कारण या सिनेमांना सामावून घेणार्‍या ‘गोवा विभागा’ची घोषणाच करण्यात आलेली नव्हती. त्यातच काल जाहीर झालेल्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातदेखील एकाही गोमंतकीय सिनेमाची किंवा लघुपटाची निवड न झाल्यामुळे गोमंतकीय सिनेकर्मी यावर्षी इफ्फीमध्ये सक्रीयरित्या सहभागी होतील की नाही याबद्दल साशंकता होती. त्यामुळे राज्यातील सगळेच सिनेकर्मीं ‘गोवा विभागा’वर लक्ष ठेवून होते. पण महोत्सव 15 दिवसांवर आला तरी या विभागाची घोषणाच करण्यात आली नव्हती. त्यामुळे विविध सिनेकर्मींनी याबद्दल आपले म्हणणे माध्यमांकडे मांडले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीदेखील ‘गोवा विभागा’बद्दल सरकारला आणि इएसजीला ट्विटद्वारे जाब विचारला होता.


प्रत्येक विभागात पाहिजेत किमान 4 प्रवेशिका
आज दुपारी गोवा मनोरंजन सोसायटीच्या संकेतस्थळावर ‘गोवा विभागा’ची अधिकृत घोषणा करण्यात आली. यात प्रीमिअर आणि नॉन प्रीमिअर असे दोन ठळक उपविभाग असून 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या दरम्यान निर्माण झालेले कोंकणी किंवा मराठी भाषेतील सिनेमे आणि कोंकणी, हिंदी, मराठी, इंग्लीश या भाषेतील लघुपट/माहितीपट यांचा समावेश करण्यात आला आहे. सिनेमा आणि लघुपट विभागामध्ये प्रत्येकी किमान 4 प्रवेशिका आल्या तरच सदर विभाग इफ्फीमध्ये समाविष्ट होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत इएसजीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज भरून आपल्या सिनेप्रवेशिका ‘गोवा विभागा’साठी पाठवता येणार आहेत.

जानेवारी 2021 मध्ये 51 वा इफ्फी झाल्यामुळे गेल्या 10 महिन्यात पुरेसे सिनेमे निर्माण झाले असतील याबद्दल थोडी साशंकता होती. पण तरिही आम्ही इएसजीच्यावतीने हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचवला. आणि आमची त्यावर बैठक झाली त्यामध्ये या इफ्फीमध्ये ‘गोवा विभाग’ असला पाहिजे हे सर्वानुमते ठरल्यामुळे आज अधिकृतरित्या या विभागाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या विभागाचा अधिकाधिक गोमंतकीय सिनेकर्मींनी लाभ घ्यावा आणि आपले सिनेमे, लघुपट, माहितीपट पाठवावेत.
– सुभाष फळदेसाई,
उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन सोसायटी.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: