गोवा सिनेनामा

‘…तर IFFI विरोधात काँग्रेस करणार आंदोलन’


पणजी :

गोव्यात २०१२ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टीव्हल मध्ये रुपांतर केले असुन, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे आता एक्स्ट्राव्हेगंट सोसायटीत परिवर्तन झाले आहे. भाजप सरकारने आगामी इफ्फी-२०२१ मध्ये गोमंतकीय कोंकणी व मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्याची घोषणा हा जुमला असुन, इफ्फीच्या अधिकृत विभागात गोमंतकीय चित्रपटांचे प्रदर्शन न झाल्यास गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या प्रखर आंदोलनास भाजप सरकारला तोंड द्यावे लागेल असा इशारा कॉंग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.

आमचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीय चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागात प्रदर्शीत करावेत अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करुनही भाजप सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

गोवा मनोरंजन संस्थेने किमान चार चित्रपट मिळाले तरच इफ्फीत कोंकणी मराठी चित्रपट दाखवू अशी भूमीका घेणे चुकीचे असुन, एक जरी चित्रपट असला तरी त्याचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

आज दिवाळखोर भाजप सरकारकडे गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना देण्यास निधी उपलब्ध नाही. गोवा मनोरंजन संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर असलेल्या इफ्फी-२०२१ साठी गोमंतकीय चित्रपटांच्या निवडीसाठी जारी केलेल्या नियमावलीत कलम ९ नुसार, प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्यास गोवा फिल्म फायनांय योजनेखाली लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन गोवा मनोरंजन संस्थेने घोषीत केलेला गोवा प्रिमीयर विभाग हा इफ्फी-२०२१ चा अधिकृत विभाग नसल्याचे उघड होत आहे असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोवा फिल्म फायनांस योजनेखाली कलम ८ च्या नियम क प्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रदर्शीत झालेल्या फिचर फिल्मला ५ लाख व नॉन फिचर फिल्मला २.५ लाख अर्थ सहाय्य मिळते.

भाजप सरकारने गोवा चित्रपट अनुदान योजना बासनात गुंडाळून ठेवली असुन, इफ्फीचा वापर आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ कंत्राटे मिळवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी करीत आहेत असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. यंदाच्या इफ्फीत सुमारे २५ कोटींचा घोटाळा होणार असुन, आम्ही योग्यवेळी सर्व पुरावे सादर करु असे ते म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: