सिनेनामा

’इन टू डार्कनेस’ सुवर्ण मयुरचा मानकरी

51 व्या इफ्फीचा पणजीत थाटात समारोप

पणजी :
इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या डॅनिश मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट ’इन टू द डार्कनेस’ या चित्रपटाने आज 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या या डॅनिश चित्रपटाने नाझींच्या कब्जात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. नायक कार्लस्कोव्हला सामना करावा लागणार्‍या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. एकीकडे, त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जर्मन बाजारपेठेचे उत्पादन चालू ठेवण्यास आक्रमकांद्वारे भाग पाडले जात आहे तर दुसरीकडे, या निवडीच्या नैतिक अनिश्चिततेमुळे त्याच्या कुटुंबालाही यातना सोसाव्या लागत आहेत.
40 लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. तसेच दोघांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने 17 वर्षीय तझू-चुआन लियू याला गौरविण्यात आले. त्याने चांग चेंग या प्रमुख भूमिकेतून दिव्यांग मुलाचे भावविश्व समर्थपणे उलगडून दाखविले. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या साठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ”आय नेव्हर क्राय” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे ज्यात तिने परदेशातील नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून स्वतःच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेताना स्वतःची वाट चोखाळत करावा लागणारा संघर्ष चपखलपणे मांडला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले.

इफ्फी 51 चा विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ” ब्रिज ”साठी प्रदान करण्यात आला आहे ज्यात ग्रामीण आसाममध्ये दरवर्षी येणार्‍या पुरात सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे शक्तिशाली ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे दरवर्षी येणारा पूर आणि शेतीचे नुकसान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कलिता यांना पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळाले.

51 व्या इफ्फीतील स्पर्धा विभागाचे परिक्षण अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळाने केले. प्रसन्ना विथानाज (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांगलादेश) हे ज्युरीमंडळाचे अन्य सदस्य होते.

चेन-नियन को ठरल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका
तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या 2020 च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणार्‍या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी प्रदर्शन या चित्रपटातून करण्यात आले आहे. कर्णबधिरांच्या जगातील वास्तविक घटनांवर आधारित 108 मिनिटांच्या या चित्रपटात नुकत्याच एका विशेष शाळेत दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. पीडितांना सावज बनवून त्यांचा कसा बळी जातो याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्क्म यांचा समावेश आहे.

‘फेब्रुवारी’ला विशेष ज्युरी पुरस्कार
यावेळी विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या सन 2020 मधील ”फेब्रुवारी” चित्रपटासाठी देण्यात आला आहे. या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐशी या तीन वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारातील सातत्य असून माणसं म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या या विस्तीर्ण मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून सादर करण्यात आला आहे. दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण हा पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सँटोस यांना 2020 मधील पोर्तुगिज चित्रपट ’व्हॅलेंटिना’ यासाठी देण्यात आला आहे. सतरा वर्षांच्या ब्राझीलियन समलिंगी मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि हिंदी तसेच बंगाली सिनेमांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना “इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर“ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रिय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

 

’200 मीटर’ला युनेस्को गांधी पदक
शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा हे महात्मा गांधींचे आदर्श प्रतिबिंबित करणार्‍या चित्रपटासाठी असलेला विशेष आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या 2020 मधील ” 200 मीटर ” या अरेबियन चित्रपटाला मिळाला आहे ज्यात मध्यपूर्वेती लइस्रायलच्या ताब्यात असणार्‍या प्रदेशात राहणार्‍या पॅलेस्टाईन वडिलांची कथा आहे जे दुभाजक भिंतीच्या एका बाजूला आहेत तर त्यांचा मुलगा पलीकडच्या बाजूला रुग्णालयात आहे आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिसच्या सहकार्याने इफ्फीच्या सहभागाचा भाग म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.
….

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: