google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘परिवारवादामुळे भ्रष्टाचार फोफावला’

नवी दिल्ली:

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करत त्यांना समूळ नष्ट करावे लागेल असे मत व्यक्त केले. तसेच भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

मागील सरकारच्या काळात जे लोक बँकांना लुटून देश सोडून गेले आहेत, त्यांची सपत्ती जप्त करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीदेखील नरेंद्र मोदी यांनी दिली.



“भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. आधारकार्ड, मोबाईल या आधुनिक साधनांचा वापर करून चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवण्यात आम्हाला यश आले. मागील सरकारमध्ये जे लोक बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोकांना तुरुंगात डांबलं आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत आहोत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

“आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!