गोवा 

‘हजारो लोक मेल्यावरही टीका ‘उत्सव साजरा’ करणारे असंवेदनशीलच’

मडगाव : 
गोव्यात भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे २७०० लोकांचा कोविडने बळी घेतला. ऑक्सिजनचा पुरवठा बंद करुन सरकारने लोकांचे जीव घेतले. सरकारच्या नाकर्तेपणाने मृत्यु आलेल्या शोकाकुल कुटुंबियांवर घरी समई व मेणबत्त्या पेटवण्याचा प्रसंग आलेला असताना, भाजप सरकारचे मंत्री व पक्षाचे पदाधिकारी दीपप्रज्वलन करुन टीका उत्सव साजरे करतात यावरुन त्यांची असंवेदनशीलता दिसते अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

केपे गट युवक कॉंग्रेसच्या अधिकारग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, एल्टन डिकॉस्ता, उबेद खान, मेल्वीन कार्वाल्हो, प्रशांत वेळीप व ॲड. अर्चित नाईक हजर होते.

केपे मतदारसंघातील नगरपालीका व पंचायत क्षेत्रातील सुमारे ३५० युवकांतर्फे आज सुमारे ३० जणांनी कोविडची बंधने असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात युवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

गोवा युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागील एक महिना कसलीच जाहिरातबाजी न करता शेकडो कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा तसेच इतर मदत करुन लोकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले आहे. फोटो काढुन प्रसिद्धी घेण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांसाठी लोकांचे आशिर्वाद जास्त मोलाचे आहेत हे युवक कॉंग्रेसने सिद्ध केले असे दिगंबर कामत म्हणाले. युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या  बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत कॉंग्रेसचा झेंडा फडकेल याचा मला पुर्ण विश्वास असल्याचे दिगंबर कामत यांनी उपस्थितांना उद्देशुन केलेल्या भाषणात सांगितले.

भाजप सरकारने आज कोविडच्या संसर्गाने मरण आलेल्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकासाठी चार लाख व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकी दोन लाख देण्याची घोषणा केली आहे. युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोविडने मृ्त्यु आलेल्या कुटुंबियांना एकुण सहा लाख रुपये सरकारकडुन मिळवून देण्यास संपुर्ण मदत करावी असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना केले.

कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी करुन केपेतील मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या उप- मुख्यमंत्री बाबू कवळेकरांना स्वाभिमानी केपेकर धडा शिकविण्यासाठी सज्ज असुन, सत्तेत असुनही मागील जिल्हा पंचायत व नगरपालीका निवडणूकांत बाबू कवळेकरांच्या समर्थकांची एकुण टक्केवारी जबरदस्त घटल्याने बाबूंचे वजन कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. संधिसाधू बाबू कवळेकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवीण्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकी राखुन काम करावे असे गिरीश चोडणकर म्हणाले.

कॉंग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत एक नवा इतिहास रचणार असुन, कॉंग्रेस सोडुन भाजपात केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी गेलेल्यांना केपेकर अद्दल घडविणार आहेत असे ॲल्टन डिकॉस्ता यांनी यावेळी बोलताना सांगितले.

युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी सर्व नविन सदस्यांना स्थानिक विषय घेवुन जनतेला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. कोविड महामारीत युवक कॉंग्रेसने केलेल्या कामाने जनता आज आमच्याकडे विश्वासाने पाहत असुन, लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे ते म्हणाले.

नवनिर्वाचीत केपे युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप यांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे कार्य पुढे नेणार असल्याचे सांगितले व युवक कॉंग्रेसची एक मोठी फळी उभी करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. आज प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामागे किमान दहा युवक कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अर्चित नाईक यांनी केले. सुरूवातीला कोविडने मृत्यु आलेल्यांप्रती शांतता पाळुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: