गोवा 

‘कोविड’वर ‘इवरमेक्टीन’ उपचाराला वैज्ञानिक आधार आहे का?

गिरीश चोडणकर यांनी मागितला आरोग्यमंत्र्यांकडे खुलासा 

पणजी :
इवरमेक्टिन (Ivermectin) १२ मिलीग्राम गोळ्या घेतल्यास कोविड संसर्ग दूर राहतो हा सल्ला गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना कोणी दिला? या उपचाराला वैज्ञानिक आधार कोणता आहे? पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय काउंसिल तसेच जागतीक आरोग्य संघटनेची सदर उपचार प्रणालीस मान्यता आहे का हे गोमंतकीयांना कळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी व लोकांसमोर खुलासा करावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
जागतीक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर सदर गोळ्यांचे सेवन हे योग्य आरोग्य तपासणी निदान केल्यानंतरच करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही उपचार पद्धती करण्यास कोणी सल्ला दिला हे कळणे गरजेचे आहे.
आज देशात वा जगात कुठेही ही उपचार पद्धती सुरू आहे का व असल्यास त्याचे परिणाम काय आहेत हे भाजप सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी इवरमेक्टिन (Ivermectin) गोळ्यांचा वापर करुन कोविडवर नियंत्रण आणण्याची काल घोषणा केली होती त्यावर गिरीश चोडणकर यांनी सदर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ivermectinलोकांच्या आजाराचा बाजार करण्याच्या धोरणाखाली अधिक माया जमविण्यासाठी हा उपक्रम जाहिर करण्यात आला आहे का? असा प्रश्न गिरीश चोडणकर यांनी विचारला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनचे युवराज प्रिंस चार्लस हे आयुर्वेदिक उपचारांनी कोविड आजारातुन बरे झाल्याचा दावा करुन आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपले हसे करुन घेतले होते. ब्रिटनच्या युवराजांच्या कार्यालयाने उत्तर गोवा खासदारांचा दावा खोडसाळ असल्याचे सांगुन तो फेटाळून लावला होता. आज भाजपच्या जुमलाबाजीमूळे सरकारवरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
कोविड लॉकडाऊन काळात असाच प्रचार करुन आयुष मंत्रालयाने गोळ्यांचे वाटप केले होते व सदर गोळ्यांच्या सेवनाने कोरोना दूर राहणार अशी ग्वाही दिली होती. आज दुसरी लाट आली असताना व लोक मृत्युमुखी पडत असताना सदर गोळ्यांचा काय उपयोग झाला हे भाजप सरकारने आता लोकांना सांगणे गरजेचे आहे. वैज्ञानिक आधार असलेलीच उपचार पद्धती वा औषधे सरकारने लोकांना द्यावीत हे कॉंग्रेस पक्षाचे ठाम मत आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
गोमंतकीयांनी सरकारच्या जुमलेबाजीला बळी न पडता, उपचार प्रणालीसाठी वैज्ञानीक आधार देण्याची मागणी सरकारकडे करावी. अधिकृत आरोग्य संघटना व अधिकारिणीची परवानगी असेल तरच औषधांचे सेवन करावे असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: