महाराष्ट्र

​अटलजींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचे नेहरूंना अभिवादन ​

मुंबई ​(अभयकुमार देशमुख) :​
गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला व यापुढेही होत राहील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात असे म्हटलंय,​ ​“भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे.जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे “ ही आठवण जयंत पाटील यांनी करुन देताना भाजपाला चिमटा काढला आहे.

१९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते असेही जयंत पाटील म्हणाले.

पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे हे सांगतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: